computer

हे 'मंकडिंग' म्हणजे काय भाऊ ? क्रिकेट मध्ये 'मंकडिंग' वादग्रस्त का आहे ??

काल एका बॉलने राजस्थान रॉयल्सच्या हातून सामना घालवला. किंग्स इलेव्हन पंजाबचा कॅप्टन आणि गोलंदाज आर अश्विनने जोस बटलरला ‘मंकडिंग’ करून आउट केलं. या विकेटने राजस्थान रोयल्सच्या घोडदौडीला जोरदार ब्रेक लागला. शेवटी तर हा सामना किंग्स इलेव्हन पंजाबने जिंकला भाऊ.

मंडळी, कालच्या या सामन्याने पुन्हा एकदा ‘मंकडिंग’ चर्चेत आलं आहे. जे हाडाचे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना ‘मंकडिंग’ म्हणजे काय याबद्दल वेगळं सांगायला नको पण ज्यांना अजून माहित नाही हा काय प्रकार आहे त्यांच्यासाठी आज आम्ही ‘मंकडिंग’बद्दल माहिती घेऊन आलो आहोत.

चला तर जाणून घेऊया ‘मंकडिंग’ म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कुठून झाली.

मंडळी, हा रन आउटचा एक प्रकार आहे. जर नॉन-स्ट्राईकर क्रीजच्या (रेषा) बाहेर गेला असेल आणि बॉलरने बॉल टाकण्यापूर्वी स्टम्पिंग केलं तर अशा रनआउटला ‘मंकडिंग’ म्हणतात. ‘मंकडिंग’ पूर्णपणे बॉलरच्या चलाखीवर अवलंबून असतो. काही केलं तरी ही पद्धत आजही पूर्णपणे मान्य झालेली नाही. खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध असल्याचा आरोप ‘मंकडिंग’ पद्धतीवर केला जातो.

...पण क्रिकेटचे नियम या गोष्टीला मान्यता देतात. क्रिकेटच्या नियमामध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की जर नॉन-स्ट्राईकर आपली रेषा सोडून पुढे गेला असेल तर बॉलरला त्याला आउट करण्याची पूर्ण परवानगी आहे.

‘मंकडिंग’ आलं तरी कुठून ?

मंडळी, ‘मंकडिंग’ पद्धत शोधणारा पठ्ठ्या दुसरा तिसरा कोणी नसून एक भारतीय आहे. त्यांचं नाव विनू मंकड. त्यांच्याच आडनावावरून या पद्धतीला ‘मंकडिंग’ नाव मिळालं. त्यांनी १९४७ च्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात या पद्धतीने ‘बिल ब्राऊन’ या क्रिकेटरला आउट केलं होतं. असं एकदा नाही तर दोनदा झालं. यानंतर ऑस्ट्रेलियन मिडीयाने विनू मंकड यांच्यावर टीका केली होती. मंकड यांच्यावर खिलाडूवृत्ती नसलेला क्रिकेटर असा आरोप पण करण्यात आला होता. खरी गोष्ट तर अशी होती की आउट करण्यापूर्वी विनू मंकड यांनी ‘बिल ब्राऊन’ला एकदा इशारा दिला होता. त्यानंतरही ‘बिल ब्राऊन’ने तीच चूक पुन्हा केली.

राव, गम्मत अशी की ऑस्ट्रेलियाच्या ‘डॉन ब्रॅडमन’ या महान क्रिकेटरने ‘मंकडिंग’ला पाठींबा दिला आहे. त्यांनी आपल्या आत्मवृत्तात ‘मंकडिंग’ क्रिकेटच्या नियमांना धरून असल्याचं नमूद केलं आहे.

१९४७ च्या या घटनेनंतर क्रिकेटच्या नियमांमध्ये अनेकदा बदल करण्यात आले. ‘मंकडिंग’ला क्रिकेटरवर नियंत्रण ठेवण्याचा एक मार्ग म्हणूनही बघितलं जातं. जास्तीच्या धावा घेण्यासाठी क्रीज बाहेर गेलेल्या क्रिकेटरला आवरता यावं म्हणून क्रिकेटच्या नियमांमध्ये ‘मंकडिंग’ला स्थान देण्यात आलं आहे.

तर मंडळी, क्रिकेट मध्ये अधिकृतरीत्या मान्य असलं तरी ‘मंकडिंग’ वर आजही वाद होत आहेत. कालचंच बघा ना. आर अश्विनवर अनेकांनी आरोप केलेत. आता तुम्हीच सांगा तुम्हाला आर अश्विनचं हे कृत्य बरोबर वाटतं का ?? तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required