भारतीय संघासाठी खेळण्यापूर्वी क्रिकेटचा देव खेळलाय पाकिस्तान संघासाठी? वाचा तो किस्सा..
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरला (sachin tendulkar) ओळखत नसेल असा एकही क्रिकेटचा चाहता नसेल. १०० शतकं, सर्वाधिक धावा आणि बरेच विक्रम त्याने आपल्या नावावर केले आणि बरेच विक्रम मोडूनही काढले आहेत. तब्बल २४ वर्ष त्याने भारतीय क्रिकेटला मोलाचे योगदान दिले. यादरम्यान त्याने अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. १९८९ मध्ये वय वर्ष १६ असताना त्याने भारतीय संघाची जर्सी परिधान केली होती. मात्र भारतीय संघासाठी पदार्पण करण्यापूर्वी त्याने पाकिस्तान संघासाठी क्षेत्ररक्षण केले होते, ही बाब खूप कमी लोकांना माहीत आहे. चला तर जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती. (when sachin tendulkar played for pakistan)
ऐकायला विचित्र वाटतंय ना? क्रिकेटचा देव, भारतीय क्रिकेटचा स्टार फलंदाज सचिन तेंडुलकरने पाकिस्तान संघासाठी क्षेत्ररक्षण केले. मात्र ही बाब १०० टक्के खरी आहे. १९८७ साली तो पाकिस्तान संघासाठी सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरला होता.
तर झाले असे की, १९८७ मध्ये पाकिस्तान संघ भारतात मालिका खेळण्यासाठी आला होता. त्यावेळी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये सराव सामना सुरू होता. त्यावेळी पाकिस्तान संघातील काही खेळाडू हॉटेलमध्ये विश्रांती करत होते. हेच कारण होते की, पाकिस्तान संघाकडे मैदानात उतरवण्यासाठी ११ खेळाडू देखील नव्हते. आता करायचं काय? असा प्रश्न पाकिस्तान संघासमोर उभा राहिला होता. त्यावेळी सचिन तेंडुलकरने पाकिस्तान संघासाठी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.
वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी सचिन तेंडुलकर भारतीय संघाविरुद्ध क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्यावेळी इमरान खान हे पाकिस्तान संघाचे कर्णधार होते. पाकिस्तान आणि भारत यांच्यात सामना म्हटलं तर तो हाय व्होल्टेज होणार यात काही शंकाच नसते. त्यामुळे सचिन तेंडुलकरवर देखील दबाव होता. या सामन्यात जावेद मियादाद आणि अब्दुल कादीर यांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता.
हा किस्सा स्वतः सचिन तेंडुलकरने सांगितला होता. त्याने आपल्या ' प्लेइंग इट माय वे..' या आत्मकथेत लिहिले की, "इमरान खानला लक्षातही नसेल की, मी त्यांच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे." भारतीय संघासाठी पदार्पण केल्यानंतर सचिन तेंडुलकरने काय केलं ते संपूर्ण क्रिकेट विश्र्वाने पाहिले आहे.




