computer

भारतीय हापूस जगभर अल्फान्सो या पोर्तुगीज नावाने का ओळखला जातो? उत्तर तर वाचा..

आंबा हा फळांचा राजा. मग हापूस हा आंब्याचा राजा म्हटले तर वावगे ठरणार नाही. हाच हापूस इंग्लिशमध्य अल्फान्सो नावाने ओळखला जातो. हापूस आंब्याला हे नाव कसे मिळाले असावे? हापूस आणि मूळ भारतीय आंबा यांचा काय संबंध? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आज या लेखातून मिळवणार आहोत.

पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी संपूर्ण जग पादाक्रांत करण्याची मोहीम आखली होती. पोर्तुगीजांची ही महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ही जबाबदारी त्यांनी आपला जनरल अल्फान्सो दि अल्बकर्क वर सोपवली होती. भारतीय हापूस जगभर ज्या अल्फान्सो नावाने ओळखला जातो ते नाव याच पोर्तुगीज जनरलच्या नावावरून पडले आहे. आहे की नाही गंमत? फळ भारतीय आणि नाव पुर्तुगीजी!

जगभरातील व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठीच पोर्तुगीज निघाले होते. याच मोहिमेचा भाग म्हणून आशिया खंडात लाल मिरची, टोमॅटो आणि बटाट्याची शेती मोठ्या प्रमणात केली जाईल हे पाहण्याचे काम अल्फान्सो करत होता. आशिया खंडात या पदार्थांचे उत्पादन करायचे आणि ते युरोपमध्ये नेऊन विकायचे अशी पोर्तुगीजांची थिअरी होती.

याच प्रकल्पाचा भाग म्हणून अल्फान्सोने भारतीय आंब्यावरही काही प्रयोग करण्यास सुरुवात केली. मूळ भारतीय आंबा हा मऊ आणि रसाळ होता. हा आंबा फक्त चोखूनच खाता येत असे. पण आल्फोन्सोला असा आंबा बनवायचा होता जो घट्ट असेल आणि तो कापूनही खाता येईल. युरोपमध्ये कुणी आंबे चोखून खाणार नाही, अशी त्याची खात्री होती. यासाठी त्याने भारतीय आंब्यावर प्रयोग सुरु केले. बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला असा आंबा बनवण्यात यश आले.

त्याकाळी गोवा हा पोर्तुगिजांचा बालेकिल्ला होता आणि याच गोव्यात हापूसच्या निर्मितीचा हा प्रयोग यशस्वी ठरला. त्यानंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर याच प्रकारच्या आंब्याची लागवड केली जाऊ लागली कारण याला युरोपात मोठी मागणी होती. अशा प्रकारे एका पोर्तुगीज जनरलने भारतीय आंब्यात सुधारणा घडवून तो जगभरात पोचवण्यास हातभार लावला. अल्फान्सो अल्बकर्कच्या या यशस्वी प्रयोगामुळेच भारतीय हापूस हा उर्वरित देशात अल्फान्सो या नावाने ओळखला जातो.

हापूस तो हापूसच पण आपले देशी म्हणजे कलमी नसलेले आंबे एकेकाळी थेट राणी व्हिक्टोरीयाच्या दरबारात पोहचले होते.
ब्रिटीशांकडे मुंबई आल्यानंतर त्यांनी विक्रोळी, कांजुरमार्ग, पवई, गोरेगाव, या भागातल्या जमिनी श्रीमंत पारशी जमीनदारांना कसायला दिल्या होत्या. या पारश्यांनी पवई, भांडूप परिसरात आंब्याची लागवड सुरु केली. १८३८ साली फ्रामजी कावसजी या पारशी व्यापाऱ्याने व्हिक्टोरिया राणीला खास बॉम्बे मँगोजच्या चार करंड्या भेट म्हणून पाठवल्या. त्यांनतर राणीला आंबे खूप आवडले असे पत्रही थेट राणीच्या दरबारातून पारशाला आले होते.

मेघश्री श्रेष्ठी

https://www.bobhata.com/lifestyle/mango-and-its-mango-diplomacy-2725

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required