computer

इन्कम टॅक्सच्या एका कलमामुळे सचिनने स्वतःला अभिनेता म्हणून सादर केले त्याची गोष्ट! त्याचा प्लॅन फसला की कामी आला??

२०११ सालच्या वर्ल्ड कप भारताने जिंकला होता. या मॅचच्या शेवटी सर्व खेळाडूंनी मैदानावर सचिनला मानवंदना दिली. सचिनच्या कारकिर्दीतला हा शेवटचा वर्ल्डकप होता. १०० कोटीहून अधिक लोक साश्रू नयनांनी हा सोहळा बघत होते. पण त्याच वेळी म्हणजे २०११ साली आयकर अधिकार्‍यांसमोर सचिनचे कर सल्लागार सचिन क्रिकेटर नाही तर तो 'अ‍ॅक्टर' आहे हे सिध्द करण्याच्या प्रयत्नात होते.

आपला सचिन, क्रिकेटचा देव सचिन -क्रिकेटर नाही तर तो एक 'अ‍ॅक्टर' आहे ही कल्पना पण चाहत्यांना सहन होणार नाही. पण ते सत्य होते. सचिनला 'अ‍ॅक्टर' ठरवण्याच्या मूळाशी होते आयकराचे एक कलम 80RR !

काय आहे हे 80RR हे आधी समजून घेऊ या ! कलाकार किंवा मॉडेल्सना देशाबाहेरच्या कंपन्यांकडून पैसे मिळत असतात. या उत्पन्नातून काही वजावट म्हणजे आयकाराची काही सूट मिळते. ही सूट आयकराच्या 80RR कलमाच्या अंतर्गत येते. ही सर्व घटना जरी २०११ साली घडली असली तरी वादाच्या अंतर्गत असलेले सचिनचे विदेशी उत्पन्न २००३ सालाचे होते. त्या वर्षात सचिनला इएसपीएन -पेप्सीको-व्हिसा या 'स्पॉन्सरशिप'चे रुपये ५,९२,३१,२११ (विदेशी चलनात) उत्पन्न झाले होते. सचिनची मागणी अशी होती की त्याच्या उत्पन्नाला 80RR हे कलम लागू होते आणि त्यानुसार एकूण उत्पन्नापैकी रुपये १७७६९३६३ ची वजावट मिळण्यास तो पात्र होता.

ही वजावट मिळण्यासाठी दोन अटींची पूर्तता सिध्द करावी लागते.

१. आयकरदाता लेखक, नाटककार, कलाकार, संगीतकार, अभिनेता, खेळाडू यापैकी कोणत्या श्रेणीत मोडतो हे निश्चित करणे

२. हाती आलेले उत्पन्न यापैकी त्या श्रेणीचे काम केल्यामुळे मिळाले आहे हे निश्चित करणे.

या अटींची पूर्तता करताना आयकर अधिकारी आणि सचिन (आणि त्याचे कर सल्लागार) या दोन्हीत वाद उद्भवला.

सचिनची भूमिका काय होती ?

सचिनच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा व्यवसाय 'अभिनेता किंवा मॉडेल' असाच आहे. त्याला 'अभिनेता किंवा मॉडेल' म्हणता येत नसेल तर त्याला 'कलाकार' म्हणण्यात यावे. क्रिकेट हा त्याचा मुख्य व्यवसाय नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून मिळणारे खेळण्याचे मानधन आणि लोगोचे पैसे हे त्याचे 'इतर उत्पन्न “Income from Other Sources” या सदराखाली मोडते. थोडक्यात त्याचा व्यवसाय 'अभिनेता किंवा मॉडेल' असाच आहे क्रिकेटर नव्हे! १९९७ पासून त्याची व्यावसायिक श्रेणीकरण 'अभिनेता किंवा मॉडेल' असेच आहे. त्यामुळे यावर्षी त्यात आडकाठी घालण्यासारखे काहीही कारण नाही.

अ‍ॅसेसमेंट ऑफीसर आणि इन्कमटॅक्स कमिशनर यांचे म्हणणे वेगळे होते. त्यांनी सचिनचा मुख्य व्यवसाय क्रिकेटर असा आहे आणि मिळालेले उत्पन्न हे अभिनेता किंवा कलाकार या श्रेणीतले नसून क्रिकेटर म्हणूनच मिळालेले आहे हे सिध्द करण्यासाठी ऑक्सफर्ड डिक्शनरीचा आधार घेतला. सचिन हे नाव क्रिकेटसोबतच जोडले गेले आहे आणि तो क्रिकेट खेळतो. तो उत्पन्न मिळवण्यासाठी खेळतो. तो हौशी खेळाडू म्हणून खेळत नाही. त्यामुळे त्याची व्यावसायिक श्रेणी अभिनेता/मॉडेल नसून व्यावसायिक खेळाडू अशीच आहे. 'जर 'सचिनला क्रिकेटर म्हणयाचे नाही तर कोणाला क्रिकेटर म्हणायचे ' असाही सवाल त्यांनी विचारला!

असे म्हणून वर दिलेला एक मुद्दा साहजिकच हे सिध्द करतो की सचिन आणि क्रिकेट वेगळे करता येत नाही. सचिन आणि क्रिकेट हे दोन्ही अविभाज्य आहेत.

दुसरा मुद्दा हाताळताना अ‍ॅसेसमेंट ऑफीसर म्हणाले की सचिनला जाहिरातीत अभिनय करावा लागतो, पण मुळात तो क्रिकेटर असल्यामुळेच त्याला जाहिराती मिळतात. सचिनला लोकं क्रिकेटर म्हणून ओळखतात म्हणून ते जाहिराती बघतात. त्यामुळे मिळालेले उत्पन्न त्याच्या क्रिकेटच्या उपन्नात मोजले जाईल आणि सेक्शन 80RR चा फायदा त्याला घेता येणार नाही.

अ‍ॅसेसमेंट ऑफीसरांचे मुद्दे इन्कम टॅक्स कमिशनर यांनी पण उचलून धरले. इतकेच नव्हे तर त्यांच्या मते सचिनचा अभिनय इतका सुमार दर्जाचा आहे की, बघणारे तो क्रिकेटर आहे म्हणूनच जाहिराती बघतात.

थोडक्यात, सचिनचे सर्व उत्पन्न क्रिकेटर म्हणूनच मोजले जावे आणि त्याला सेक्शन 80RR कलमाद्वारे मिळणारी सूट देता येणार नाही.

सचिनने यानंतर इन्कम टॅक्स ट्रिब्युनलकडे दाद मागीतली. आधी मांडलेले मुद्दे पुन्हा एकदा समोर ठेवण्यात आले. सोबत एक नवा मुद्दा त्यानी उपस्थित केला, तो असा की एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी दोन व्यवसाय करता येतात. सचिन अ‍ॅक्टर आहे आणि क्रिकेटरही आहे. त्याची दोन व्यावसायिक भूमिका आहेत. त्यामुळे अ‍ॅक्टर म्हणून आणि क्रिकेटर म्हणून अशा दोन वेगवेगळ्या स्त्रोतातून त्याला उत्पन्न मिळते. त्याच्या अभिनयातून मिळणार्‍या उत्पनावर सेक्शन 80RR चा फायदा त्याला मिळायला हवा.

इन्कम टॅक्स ट्रिब्युनलने त्यांचा निवाडा सचिनच्या बाजूने दिला आणि असे म्हटले की, क्रिकेटमुळे त्याला वेगवेगळ्या जाहिराती मिळत असल्या तरी जेव्हा तो कॅमेरासमोर उभा राहतो तेव्हा त्याला अभिनय करावा लागतो, दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणे हावभाव करावे लागतात, ठरलेले संवादच म्हणावे लागतात. थोडक्यात तो अ‍ॅक्टर/मॉडेल/अभिनेता आहे असे म्हणायला ट्रिब्युनलची हरकत नव्हती.

परिणामी अ‍ॅक्टर म्हणून सचिनचा व्यवसाय मान्य करून, क्रिकेटचे उत्पन्न हे 'इतर उत्पन्न' म्हणून मान्य करण्यात आले. सेक्शन 80RR चा फायदा त्याला देण्यात आला.

ट्रिब्युनलला काहीही म्हणून देत आपण तर सचिनला क्रिकेटची देवता मानतो हे खरेच आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required