computer

काल गुगलने डुडल केलेले कानो कोण होते? जाणून घेऊया ज्युडोचा जनकाबद्दल सर्वकाही!

आजकाल वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे रस्त्यांवर चालणेही सुरक्षित राहिले नाही. कधी कोण येईल आणि आपल्यावर हल्ला करेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे स्वरक्षणासाठी काही गोष्टी शिकून घेणे फायदेशीर ठरते. मार्शल आर्टचा उदय त्यासाठीच झाला. मार्शल आर्ट म्हणजे बिनाअस्त्र-शस्त्र युद्ध. याचे अनेक प्रकार आहेत. पण सर्वात लोकप्रिय प्रकार आहे तो म्हणजे ज्युडो. ज्युडोचा जन्म जपानमध्ये झाला हे आपल्याला माहीत असेलच. पण त्याचा निर्माता कोण, हा खेळप्रकार नक्की केव्हा अस्तित्वात आला हे माहीत आहे काय? आज Google ने एक खास डूडल बनवले आहे. ते डुडल, जपानी जुडोचे जनक डॉ. जिगोरो कानो यांचे आहे. २९ ऑकटोबरला त्यांचा १६१वा वाढदिवस साजरा केला जात आहे. त्यांच्याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत.

डॉ. जिगोरो कानो हे एक जपानी शिक्षक, खेळाडू आणि ज्युडोचे संस्थापक होते. ज्युडो ही आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवणारी पहिली जपानी मार्शल आर्ट आहे. १९६० मध्ये ज्युडोला अधिकृत ऑलिम्पिक खेळ म्हणूनही मान्यता मिळाली. कानो हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) पहिले आशियाई सदस्य देखील होते. ज्युडोला आंतराष्ट्रीय खेळ बनवण्यात आणि १९१० च्या दशकात जपानी पब्लिक स्कूल प्रोग्राममध्ये ज्युडोला एक भाग बनवण्यातही कानो यांचा महत्वाचा वाटा होता.

कोडोकन ज्युडोची स्थापना कानो जिगोरो यांनी केली होती. त्यांनी आपल्या कमकुवत शरीरात ताकद आणण्यासाठी तरुणपणी जुजुत्सूचा सराव करण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी काही बदल केले आणि या कलेसाठी नवीन नाव तयार केले. जू-जुत्सु शब्दातील जुत्सू म्हणजे तंत्र तिथे डो लावून ज्युडो शब्द तयार झाला आहे. डो म्हणजे मार्ग किंवा पथ. थोडक्यात नवे तंत्र शिकायचा मार्ग.

कानो यांना ज्युडो का शिकावेसे वाटले याची गोष्ट ही रंजक आहे. कानो यांचा जन्म १८६० मध्ये मिकागे (आता कोबेचा भाग) येथे झाला. वयाच्या ११ व्या वर्षी वडिलांसोबत ते टोकियोला गेले. शाळेत असताना त्यांना बऱ्याच मुलांचा त्रास सहन करावा लागला. टारगट मुलं त्यांना मुद्दाम त्रास देत असत. तेव्हा त्यांनी ताकद वाढवण्यासाठी जुजुत्सूच्या मार्शल आर्टचा अभ्यास करण्याचा निर्धार केला. जुजुत्सू शिकवायला अनेकांनी त्यांना नकार दिला, पण बऱ्याच प्रयत्नांनी जुजुत्सु मास्टर आणि माजी सामुराई फुकुडा हाचिनोसुके हे त्यांना जुजुत्सु शिकवायला तयार झाले.

जुजुत्सूचे ज्युडोमध्ये रुपांतर करताना जुजुत्सुमध्ये वापरण्यात येणारी सर्वात धोकादायक तंत्रे कानो यांनी काढून टाकली. त्यांनी ज्युडोमध्ये सेरीयोकू-झेनी म्हणजे आंतरिक ऊर्जेचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर कसा करायचा याचा अभ्यास करून त्याचे तंत्र विकसित केले. ते वापरून ही कला त्यांनी इतरांनाही शिकवायचे ठरवले. १८८२ मध्ये कानोने टोकियोमध्ये स्वतःचे डोजो (मार्शल आर्ट जिम), कोडोकन ज्युडो इन्स्टिट्यूट उघडले, जिथे त्याने वर्षानुवर्षे ही कला विकसित केली आणि शिकवली. १८९३ मध्ये मुली आणि महिलांनासुद्धा या खेळात स्वागत केले.

स्वरक्षणासाठी कानो जिगोरो यांनी ही विकसित केलेली कला किंवा खेळ आजही मोठ्या प्रमाणात जगभरात शिकवला जातो. कोणत्याही वयात आपण ज्युडो शिकू शकतो. अनेकांनी याचा वापर रक्षणासाठी केला आहे. म्हणूनच Google ने खास डूडल बनवून कानो जिगोरो यांचा वाढदिवस साजरा केला आहे.

डॉ. कानो जिगोरो यांना बोभाटाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required