रोहन गावस्कर सुनील गावस्करांसारखा यशस्वी का होऊ शकला नाही?

सुनील गावस्कर, हे नाव जरी ऐकलं तरी सुनील गावस्करांनी भारतीय संघासाठी केलेले विक्रम आठवतात. कसोटी क्रिकेटमध्ये एक वेळ अशीही होती जेव्हा सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम हा सुनील गावस्करांच्या नावे होता. पुढे तो सचिन तेंडुलकरने मोडून काढला. सुनील गावस्कर निवृत्त झाल्यानंतर, त्यांचा हा वारसा रोहन गावस्कर पुढे घेऊन जाईल असे वाटले होते. मात्र 'खोदला डोंगर आणि निघाला उंदीर..' अशीच गत झाली. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, आज बोभाटा रोहन गावस्करबद्दल का बोलतोय. तर कारण असं की, रोहन गावस्कर आज आपला ४७ वा वाढदिवस साजरा करतोय.
सुनील गावस्कर आणि रोहन गावस्कर यांच्यात कुठलंही साम्य नव्हतं. सुनील गावस्कर उजव्या हाताचे फलंदाज तर रोहन गावस्कर डाव्या हाताचा फलंदाज. दोघांची फलंदाजी शैली ही वेगळीच होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर दीर्घ काळ प्रतीक्षा केल्यानंतर त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्याला या संधीचा दोन्ही हातांनी स्वीकार करता आला नाही.
केवळ ११ सामन्यांमध्ये संपली कारकीर्द..
रोहन गावस्करला २००३-०४ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. याच मालिकेत माजी भारतीय गोलंदाज इरफान पठाणला देखील पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मात्र तो अवघ्या २ धावा करत माघारी परतला होता. त्याने झिम्बाब्वेविरुध्द ५४ धावांची खेळी केली होती. ही त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले आणि शेवटचे अर्धशतक ठरले. तो फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरला मात्र, गोलंदाजीमध्ये त्याने महत्वाची विकेट मिळवून दिली. त्याने अँड्र्यू सायमंड्सला बाद करत माघारी धाडलं होतं. हा सामना भारतीय संघाने १९ धावांनी आपल्या नावावर केला होता.
त्यानंतर २००४-०५ च्या हंगामात पुन्हा एकदा भारतीय संघात निवड करण्यात आली. यावेळी त्याला ५ सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र यावेळी देखील तो हवी तशी कामगिरी करू शकला नाही. १९ सप्टेंबर २००४ रोजी तो आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर ११ वनडे सामन्यांमध्ये त्याने केवळ १५१ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याला केवळ १ गडी बाद करण्यात यश आले होते.
भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी त्याने जोरदार प्रयत्न केले. मात्र त्याचे सर्व प्रयत्न फ्लॉप ठरले. शेवटी त्याने २००७ मध्ये झालेल्या इंडीयन क्रिकेट लीग स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत त्याने कोलकाता टायगर्स संघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र या स्पर्धेला बीसीसीआयने मान्यता दिली नव्हती. त्यामुळे या स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर २००९ मध्ये हे निर्बंध काढून घेण्यात आले होते.
काय वाटतं, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर भारतीय संघासाठी खेळताना दिसेल का? कमेंट करून नक्की कळवा.