केव्हा आणि कशी झाली महिला क्रिकेटची सुरुवात? जाणून घ्या रंजक गोष्टी..

 क्रिकेट हा खेळ केवळ पुरुषांपुरता मर्यादित नाही, तर महिलाही हा खेळ तितक्याच जोमाने खेळू शकतात. असं असलं तरी देखील महिला क्रिकेटपटूंना हवी तितकी प्रसिद्धी आणि प्रोत्साहन मिळत नाहीये. पुरुषांच्या क्रिकेटबद्दल आपल्याला अनेक गोष्टी माहीत आहेत. मात्र महिलांचं क्रिकेट कधी सुरू झालं हे माहीत आहे का? नाही ना?  

 आज ८ मार्च, हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या खास दिवशी आम्ही तुम्हाला महिला क्रिकेटची सुरुवात कशी झाली, याबाबत माहिती देणार आहोत. 

 महिला क्रिकेट इतिहासातील पहिला सामना १७ जुलै १७४५ रोजी खेळला गेला होता. मात्र अधिकृत सामना १८८७ मध्ये पार पडला होता. इंग्लंड लेडी क्रिकेटर हा महिला क्रिकेट खेळणारा पहिला संघ होता. त्यानंतर इंग्लंड संघाकडून प्रेरित होऊन इतर देशातील महिला खेळाडूंनी देखील क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आता या खेळाची क्रेझ इतकी वाढली आहे की, ज्या देशातील पुरुषांचे संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात त्याच देशातील महिलांचे संघ देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत.

केव्हा पार पडला पहिला कसोटी सामना

महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिला कसोटी सामना १९३४ रोजी पार पडला होता. हा सामना क्रिकेटचा जन्मदाता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात इंग्लंड महिला संघाने बाजी मारली होती. त्यानंतर महिला संघांच्या कसोटी सामन्यांना सुरुवात झाली होती.

केव्हा पार पडला पहिला वनडे सामना?? 

कसोटी क्रिकेटनंतर १९७३ रोजी महिलांचा पहिला वनडे सामना पार पडला. तेव्हापासून ते आतापर्यंत अनेक सामने खेळले गेले आहेत. तसेच विश्वचषक स्पर्धेबाबत बोलायचं झालं तर, पुरुषांचा विश्वचषक होण्यापूर्वी महिलांची विश्वचषक स्पर्धा पार पडली होती. १९७३ रोजी पहिल्यांदा महिलांची विश्वचषक स्पर्धा आयोजित केली गेली होती. तर १९७५ रोजी पुरुषांच्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

कोण होती भारतीय महिला क्रिकेट संघाची पहिली कर्णधार?

 

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार कोण होतं हे सर्वांना माहीत आहे. मात्र महिला संघाची पाहिली कर्णधार कोण? हे खूप कमी लोकांना माहीत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार शांता रंगास्वामी होत्या. १९७६ मध्ये पहिल्यांदा भारतीय महिला संघ वेस्ट इंडिज संघाविरुद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात आला होता. त्यावेळी शांता रंगास्वामी हे अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत होत्या. शांता रंगास्वामी यांनी १२ कसोटी आणि १६ वनडे सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाचे नेतृत्व केले.

सध्या भारतीय महिला संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय महिला संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा पाहायला मिळाला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required