computer

स्वाभिमानमुळं पुढे आलेले १० कलाकार. तुम्हांला यातला कुठला कलाकार अधिक आवडतो?

एकेकाळी  टीव्हीवर जेव्हा फक्त दूरदर्शनचेच प्रोग्रॅम बघायला लागायचे, तेव्हाही बघण्यासाठी खूप चांगले ऑप्शन्स असायचे. काही मालिका तर अजून आठवतात.  ९०च्या दशकात चालू झालेल्या शांती आणि स्वाभिमाननं तर वेगळाच ट्रेंड सेट केला. शांती आणि स्वाभिमानच्या आधीच्या मालिका म्हणजे सहसा मध्यमवर्गी कुटुंबं, नीतीमूल्यं असले आपले नेहमीचे प्रकार असायचे. या दोन मालिकांनी श्रीमंती कुटुंबं, त्यांची राजकारणं आणि इतर लफडी असा सगळा मालमसाला आणला. असं असलं तरी त्या मालिका बघणेबल होत्या.  आताच्या मालिकांत कुणाचं कितवं लग्न, कुणाचं पोर कुठलं  आणि कुणाची किती हजार करोडोंची जायदाद कुणी हडप केली हे आठवायचं म्हटलं तरी भल्याभल्यांना फेफरं येतं. 

ते जाऊ दे.. रोज संध्याकाळी चार वाजता टीव्हीवर येणारी ’स्वाभिमान’ तुमच्यापैकी किती जणांना आठवतेय? स्वेतलाना, तिचा कधीच न दाखवलेला आणि मनिलामध्ये मेलेला नवरा.. तोपर्यंत भारतातल्या कितीतरी लोकांना मनिला नावाचं शहर आहे हे ही माहित नव्हतं.  त्याचा भाऊ , त्याचं भलं मोठं कुटुंब आणि इतर भानगडी.. बापरे बाप. 

१९९५ मध्ये आलेली स्वाभिमान ही भलीमोठी स्टारकास्ट असलेली मालिका होती.  या मालिकांपर्यंत दूरदर्शनच्या मालिका १३ नाहीतर २६ एपिसोड्सच्या असायच्या.  ५०० एपिसोडची आणि तब्बल दोन वर्षं चाललेली ही भारतातली पहिलीच मालिका.  त्यात बर्‍याच नव्या चेहर्‍यांना छोट्या पडद्यावर झळकण्याची पहिली संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं अक्षरश: सोनं केलं.. 

१. रोहित रॉय-रिषभ मल्होत्रा

बापाच्या दुसर्‍या बायकोवर म्हणजेच स्वेतलानावर सतत रागावलेला  मुलगा रिषभ मल्होत्रा म्हणून रोहित रॉयनं या मालिकेत प्रवेश केला. हा फ्रेश लूकमुळे अगदी चॉकलेट हिरो वाटायचा. पण का कोण जाणे त्याचं सिनेमात आणि मालिकेत दोन्हीकडेही पुढं काही झालं नाही.  त्या मानाने त्याचा भाऊ  रोनित रॉय हुशार निघाला. एक-दोन सिनेमांतच त्याला तिथं आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात आलं आणि मस्तपैकी मालिकांत करियर केलं. 

२. मनोज वाजपेयी-सुनील मल्होत्रा

या मालिकेआधी मनोज वाजपेयीनं ’द्रोहकाल’ या पिक्चरमध्ये एक छोटा रोल केला होता. पण त्याला खरा चेहरा आणि ओळख मिळाली ती सुनील मल्होत्राच्या रोलमधून. स्वाभिमानमध्ये याला महिंद्र मल्होत्राचा मोठा जावई म्हणून रोल मिळाला होता. आधी हा चांगला जावई होता आणि अचानकपणे त्याला खलनायक करून टाकला. आजकालच्या मालिकांत पाणी घालून मालिका कशीही भरकटत नेतात, त्याची सुरूवात नक्कीच या सुनील मल्होत्राच्या रोलपासून झाली असावी.

३. शीतल ठक्कर-रितू मल्होत्रा

तर ही होती महिंद्र मल्होत्रा म्हणजेच दीपक पराशर-कुनिकाची मोठी मुलगी आणि  मनोज वाजपेयी (सुनील)ची बायको. हिला मालिकेत रडूबाईचाच रोल होता. ही अजूनही  छोट्या पडदयावर सास-बहू मालिकांत अधूनमधून दिसते.

४. आशुतोष राणा-त्यागी

स्वाभिमानमुळं ओळख झालेल्या कलाकारांत मनोज वाजपेयी आणि आशुतोष राणा यांचं स्थान सगळ्यात वरचं आहे. गुंड, अशिक्षित पण मनानं खूपच चांगला असलेल्या त्यागीची भूमिका आशुतोषनं केली होती.  रिसभ भैय्या आणि देवकी भौजाई म्हणत रोहित रॉय-चन्नाला लळा लावणारा त्यागी तेव्हाच लोकांना तुफान आवडला होता.

५. संध्या मृदूल -शिवानी

आशुतोष राणाची नायिका म्हणून संध्या मृदूल स्वाभिमान मध्ये दिसली होती. पण ’साथिया’ आणि ’पेज थ्री’ नंतर बाईसाहेब कुठे गायब झाल्या आहेत कोण जाणे.

६. रिंकू करमरकर -नितू

दीपक मल्होत्राची दुसरी मुलगी नितू म्हणून रिंकू स्वाभिमानमध्ये चमकली होती. आधी तिचा रोल बरा होता.  नंतर मात्र कहानीला ट्विस्ट देण्यासाठी सुनीलला खलनायक बनवलं आणि हिला रडूबाई.  रिंकू सध्या काकूबाईच्या भूमिका करताना काही मालिकांमधून दिसते..

७. राजीव पॉल - वॉल्टर

राजीवनं आधी नितू मल्होत्राचा बॉयफ्रेंड आणि नंतर तिच्या नवर्‍याचा रोल केला होता.   पण काही म्हणा हं,  १९९५ मधला वॉल्टर आणि आताचा राजीव यात तसूभरही फरक दिसत नाही. याला नेहमी विचारावंसं वाटतं,  "कौनसी चक्की का आटा खाता है रे भौ?"

८. करण ओबेरॉय-बॉबी

९. अचिंत कौर- सोहा

तब्बल ५०० एपिसोड्स आणि २ वर्षं चाललेल्या या मालिकेत अचिंत कौर तशी उशीराच आली होती.

१०. सिमोन सिंग-गायत्री

स्वाभिमानमधला सिमोन सिंगचा रोल खूप छोटा होता. त्यानंतर ’हीना’ या मालिकेतून तिला मोठा ब्रेक मिळाला.  पण २००६ मध्ये आलेल्या ’बीईंग सायरस’ शिवाय ती म्हणावी तशी कुठं अजून चमकली नाहीय. 

कैसे हम भूल जायें, वो ही हमें याद आयें.. हमेशा..

शाननं गायलेलं हे गाणं तर तुम्हांला नक्कीच आठवत असेल. नसेल तर एकदा हा व्हिडिओ पाहाच, नकळत कधी गाणं गुणगुणायला लागाल हे कळणारसुद्धा नाही. 

सबस्क्राईब करा

* indicates required