computer

कॉपीबहाद्दर आणि त्यांचे कॉपी करण्याचे १२ अतरंगी प्रकार. शिक्षक, IPS, कुटुंबीय.. कुणीच यात मागे नाही!!

यशस्वी होण्याची पहिली पायरी ही शाळेतून जात असते. शाळेपासून तर नोकरी लागेपर्यंत अनेक परीक्षा माणसाला द्याव्या लागतात. या परीक्षांमध्ये चांगली कामगिरी केली तर यश मिळवणे सोपे होते. काही महाभाग यातही कॉपी करून शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात. काहींची कॉपी करण्याची क्रिएटिव्हिटी बघितली तर असे वाटते एवढी क्रिएटिव्हिटी अभ्यासात टाकली असती तर नक्की पास झाले असते. आज अशाच जुगाडू कॉप्यांची काही उदाहरणे आपण पाहणार आहोत.

१) ब्लुटूथ लावलेले स्लीपर घालून कॉपी

राजस्थान येथे नुकतीच राज्यभरातील शिक्षकांची भरती करण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेतली गेली. यात ब्लुटूथ लावलेले स्लीपर घालून पेपर द्यायला गेले म्हणून ५ लोकांना अटक करण्यात आली आहे. हे भाऊ तब्बल ६ लाख रुपये किंमतीचे स्लीपर घालून गेले होते. फक्त परीक्षा द्यायच्या गोष्टीसाठी सहा लाख रुपये, नोकरीचा तर अजून पत्ताच नाही!!

२) एन 95 मास्कमध्ये माईक

राजस्थान येथेच नीट या मेडिकल प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या परिक्षेत एन 95 मास्कमध्ये माईक घालून कॉपी करण्याचा प्रयत्न केला म्हणून काही विद्यार्थ्यांना पकडण्यात आले होते. हे डिव्हाईस इनकमिंग कॉल उचलू शकत होते, ज्यामुळे कॉपी करता येणे शक्य होते.

३) बॉडी लँग्वेजचा वापर करून कॉपी

चंडीगढ येथे वायुसेनेच्या परीक्षेत काही महाशयांनी चक्क सुपरवायजर, लॅब असिस्टंटस अशा जवळच्या लोकांना तिथे नेमले होते. हे लोक तिथे उभे राहून शारीरिक खुणांद्वारे म्हणजेच देहबोलीतून उत्तरे सांगत होते. जर एक हात खिशात घातला तर उत्तर १, जर दोन्ही हात खिशात घातले तर उत्तर २, जर मागच्या एका खिशात हात घातला तर उत्तर ३, जर दोन्ही हातांची घडी बांधली तर उत्तर ४ अशी कोड लँग्वेज वापरून ते कॉपी करत होते. हे म्हणजे क्रिकेटमधल्या स्पॉट फिक्सिंगसारखंच झालं की राव!!

४) दोन नातेवाईक महिला आणि पुरुषाची लॉकेटद्वारे कॉपी

यूपीतल्या रायबरेलीमध्ये एका मुलीने लाकडाचे लॉकेट बनवले आणि त्यात मायक्रोफोन लपवला. बाहेर बसलेला तिचा नातेवाईक तिला सर्व उत्तरे सांगत होता. तिचीही चोरी पकडली जायला काय विशेष वेळ लागला नाही.

५) तोतया परीक्षार्थी बनून कॉपी

मुन्नाभाई सिनेमात दाखवल्याप्रमाणे तब्बल ९ मुले ज्यात ६ मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता, ते दुसऱ्यांच्या जागी तगडी रक्कम घेऊन परीक्षा देत असत. एका विद्यार्थ्याकडून २५ लाख रुपये ते घेत असत. या भावांचा पण बरोबर पितळ उघडं पडलं.

६) आयपीएसने पत्नीच्या मदतीने केलेली कॉपी

हे सर्व चिल्लर वाटावा असा प्रकार म्हणजे चक्क एक आयपीएस ऑफिसर यूपीएससीच्या परीक्षेत बायकोच्या मदतीने कॉपी करताना पकडला गेला होता. आपल्या शर्टाच्या बटनात ब्लुटूथचे गॅजेट लावून हा भिडू कॉपी करत होता. हैदराबाद येथून त्याला मदत करणारी त्याची बायको आणि आयएएसच्या लालसेत कॉपी करणारा आयपीएस दोघेही नंतर तुरुंगाची हवा खायला गेले होते.

७) भिंती ओलांडून कॉपी पुरवली

आपल्या यवतमाळमध्ये मोठमोठाल्या भिंती ओलांडून दहावीच्या परीक्षेला कॉपी पुरवायला अनेक लोक गेले होते. भिंती अर्ध्या बांधलेल्या अवस्थेत असल्याने उड्या मारणे त्यांना सोपे गेले होते.

८) स्टाफ सिलेक्शनच्या पेपरमध्ये कॉपी

हरियाणा येथील ११ उमेदवार मुंबईला स्टाफ सिलेक्शनचा पेपर द्यायला गेले होते. एवढ्या दुरून येऊन ब्ल्यूटूथ आणि मायक्रोफोनच्या साहाय्याने कॉपी करताना ते पकडले गेले होते.

९) डिजिटल रिसिव्हर आणि ट्रान्समीटरच्या साहाय्याने कॉपी

पेपर सुरू असताना बाहेर एक संशयास्पद कार दिसून आली. तिचा शोध घेतला असता त्यात डिजिटल रिसिव्हर आणि ट्रान्समीटर आढळून आले. एका विद्यार्थ्याला या प्रकरणी पकडण्यात आले होते.

१०) स्पायकॅमेरा वापरून कॉपी

नागपूर येथे १० लोकांची गॅंग पैसे घेऊन मुलांना विविध स्पर्धा परीक्षा पास करून द्यायची. यासाठी त्यांनी लढवलेली शक्कल म्हणजे स्पायकॅमेरा आणि ब्लुटूथच्या साहाय्याने मुले प्रश्नाचा फोटो काढून बाहेर पाठवत असत आणि तिकडून मग उत्तर येत असे.

११) मुलांना पास करण्यासाठी कुटुंबाने मारलेल्या खऱ्याखुऱ्या उड्या

बिहार येथील बोर्डाचे पेपर सुरू असताना चक्क मुलांचे कुटुंबीय भिंतीवरून उड्या मारून मुलांना कॉपी पुरवताना सापडले होते.

१२) एकच प्रश्न, एकच उत्तर आणि चुकासुद्धा सारख्या! तेही तब्बल 900 मुलांच्या!!!

गुजरात येथे १२ वीचे पेपर सुरू असताना एक दोन नव्हे, तर तब्बल ९०० पेक्षा अधिक मुलांच्या पेपरमध्ये सर्वच प्रश्नांची उत्तरे ही सारखी होती, एवढेच नव्हेतर पेपर लिहिताना होणाऱ्या चुका पण सारख्या होत्या.

जुगाडू लोक पास होण्यासाठी काय काय दिव्य करतात हेच यातून दिसून येते.

सोबत हे ही वाचा..मुलांना कॉपी करण्यापासून रोखण्यासाठी या शिक्षकाने काय शक्कल लढवली पाहा!!

 

मुलांना कॉपी करण्यापासून रोखण्यासाठी या शिक्षकाने काय शक्कल लढवली पाहा !!

सबस्क्राईब करा

* indicates required