computer

मुलांना कॉपी करण्यापासून रोखण्यासाठी या शिक्षकाने काय शक्कल लढवली पाहा !!

भारतात परीक्षेत कॉपी करणे ही गोष्ट नविन नाही. परीक्षा असली म्हणजे वर्षभर अभ्यास न करणारे गडी भयानक डोक्यालिटी लावून कॉप्या करतात. कोण कुठून कशी कॉपी करेल काहीच सांगता येत नाही. त्यात आपले मुन्नाभाईसारखे सिनेमे आणखी आयडिया पुरवतात.  आजवर भारतात कॉप्या बंद करण्यासाठी खूप प्रयत्न झाले. आपण शाळेत असताना सांगितले जायचे  पुढच्या वर्षीपासून कॉपी करणं पूर्ण बंद होईल, पण तसं काही झालेलं नाही. आणि काही शाळांमध्ये तर शिक्षकच मुलांना कॉप्या पुरवतात.

पण मंडळी, ही समस्या फक्त भारतात आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. हा प्रॉब्लेम पूर्ण जगभर कमी अधिक प्रमाणात आहे राव!! मेक्सिकोत पण मुलांनी कॉपी करणे ही मोठी समस्या आहे, पण तिथे तिथल्या शिक्षकांनी कॉपी रोखण्यासाठी भन्नाट उपाय शोधून काढला आहे.

मेक्सिकोत ग्रॅज्युएशनच्या परीक्षेतसुद्धा कॉपी करण्याचे प्रमाण मोठे आहे. तिथले शिक्षक गेल्या काही दिवसांपासून यावर उपाय शोधत होते. शेवटी एका शिक्षकाने एक वेगळा उपाय शोधून काढला. त्याने चक्क विद्यार्थ्यांना परीक्षेत बसल्यावर कार्डबॉर्ड डोक्यात घालायला लावले. जेणेकरून त्यांना आजूबाजूच्या विध्यार्थ्यांचा पेपर बघता येणार नाही. मंडळी, आयडीया तर चांगली होती, उपयोगीही पडली,  पण लोकांनी त्या शिक्षकावर प्रचंड टीका करायला सुरुवात केली.

त्या वर्गातला फोटो जगभर वायरल झाला. फोटो वायरल झाल्या झाल्या लोकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया यायला लागल्या. काहींनी थेट हे पाऊल म्हणजे मानवाधिकार विरोधी आहे अशी टिका केली तर काहींनी त्या शिक्षकाचे समर्थन केले. 

विध्यार्थ्यांना घातलेल्या कार्डबोर्डला फक्त दोन छिद्रे होती त्याच्यातून त्यांना फक्त पेपर आणि प्रश्नपत्रिका दिसत होती. तिथल्या शिक्षकांना या संबंधी विचारल्यावर ते म्हणाले की हा फक्त कॉपी रोखण्याचा एक प्रयत्न होता. आजवर खूप प्रयन्त करूनही पण मुलं कॉपी करायचे थांबत नव्हते. म्हणून अजून एक प्रयोग करून पाहावा हा आमचा हेतू होता.

तुम्हांला या उपयाबद्दल काय वाटतं? तुमच्याकडेही कॉपी रोखण्यासाठी मस्त सॉलिड आयडिया असतील तर कमेंटबॉक्समध्ये नक्की लिहा..

 

लेखक : वैभव पाटील.

सबस्क्राईब करा

* indicates required