computer

जॅकी चॅनबद्दल या गोष्टी तुम्हांला नक्कीच माहित नसतील...

जॅकी चॅन माहित नसेल असं सहसा व्हायचं नाही. शरीरातलं प्रत्येक हाड त्यानं किमान एकदा तरी मोडून घेतलं असलं पाहिजे असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं. सर्वात जास्त स्वत: स्टंट्स करणारा मनुष्य म्हणूनही त्याच्या नावावर रेकॉर्ड आहे.. हे सगळं तर आपल्याला माहित आहेच. पण तरीही त्याच्याबद्दलच्या या गोष्टी तुम्हांला नक्कीच माहित नसतील. पाहा बरं...

१. जॅकी त्याचं खरं नांव नाही.

जॅकीचं खरं नांव चॅन काँग-संग आहे. ही अशी चायनीज नांवं पाश्चात्यांना उच्चारणं कठीण जातं. त्यामुळे ते सहसा सोपं इंग्रजी नांव घेतात.  त्याचं ॲक्टिंग करिअर काही चांगलं चाललं नव्हतं. तेव्हा तो  ऑस्ट्रेलियात कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणून काम करायला गेला. तिथं त्याला कुणीतरी विचारलं, "तुझं इंग्लीश नांव काय आहे?". याचं काही असं इंग्रजी नांव ठरलं नव्हतं. जॅकीचा एक मित्र तेव्हा अमेरिकन वकिलातीत ड्रायव्हर होता. त्याचं नांव होतं जॅक. त्याच्या नांवावरून जॅकीनं त्याचं नांव घेतलं-जॅक. पुढे हाँगकाँगला ॲक्टिंगमध्ये करिअर करायला गेल्यावर त्याने त्या जॅक-ला ई लावला, आणि तो बनला-जॅकी. 

२. त्याचे बाबा गुप्तहेर होते आणि आई अफूचं स्मगलिंग करायची.

ट्रेसेस ऑफ ड्रॅगन-जॅकी चॅन अँड हिज फॅमिली या डॉक्युमेंट्रीत त्यानं त्याच्या कुटुंबाबद्दल बरंच काही सांगितलंय. त्याची आई अफूची डीलर होती, मस्तपैकी जुगार खेळायची आणि चीनमधल्या अंडरवर्ल्डमधली एक महत्त्वाची व्यक्तीही होती म्हणे. 

नुकत्याच दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये जॅकीनं त्याच्या बाबांबद्दल सांगितलं. त्याचे बाबा चायनीज गुप्तहेर होते. जॅकीच्या बाबांनी आईला एकदा अफूची तस्करी करताना पकडलं होतं आणि तिथंच त्या दोघांची पहिली भेट झाली. नंतर मात्र त्याचे बाबा  जीवाच्या भयाने  हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलियामध्ये लपून राहिले होते. 

३. त्याच्या आईबाबांनी जॅकला गरीबीमुळं जवळजवळ विकलं होतं.

जॅकीचे आईबाबा चीनमधून हाँगकाँगला पळून गेले तेव्हा खूपच गरीब होते. त्याचा जन्म झाला,  त्यांच्याकडे हॉस्पीटलचे बिल भरायलाही पैसे नव्हते. तेव्हा त्यांनी तिथल्या श्रीमंत ब्रिटिश डॉक्टर दांपत्याला हे बाळ विकून बिल भरायचा प्रयत्न केला होता.

४. जॅकीचं पॉव-पॉव हे टोपण नांव होतं.

लहान असताना तो खूपच अवखळ होता. तो सारखा गडबडा लोळत असल्यानं  त्याला प्रेमाने पॉव-पॉव म्हणजेच 'तोफेचा गोळा' म्हटलं जात असे. तो मराठी असता तर कदाचित पॉव-पॉवच्या ऐवजी त्याला गडबडगुंडा म्हटलं असतं, नाही ??
 

५. जॅकी शाळेत खूप हुशार नव्हता.

जॅकी शाळेत असताना खूप भित्रा होता. त्यामुळं इतर मुलं त्याच्यावर भरपूर दादागिरी करत. पण हा कधी त्यांना उलटून बोलत नसे. एकदा मात्र शाळेत आलेल्या नवीन मुलावर दादागिरी होत असताना हा त्याच्या बाजूने उभा राहिला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण या दादागिरीचा विरोधही करु शकतो.

६. जॅकीला सुमारे आठ भाषा बोलता येतात.

जॅकी चॅन इंग्रजीव्यतिरिक्त कँटोनीज, मँडरिन, जर्मन, कोरियन, जापानीज, स्पॅनिश, थाई, तैवानीज आणि आणि अमेरिकन खाणाखुणांची भाषा इतक्या भाषा बोलता येतात.

७. जॅकी लहान असताना ऑपेरा सिंगिंग शिकला होता आणि त्यानं अशियातल्या ५ भाषांमध्ये २० हून अधिक आल्बम रिलीज केले आहेत.

जॅकी लहान असताना पेकिंग ऑपेरा स्कूलमध्ये गाणं शिकायचा. आता इतक्या भाषा येतात आणि गाणं शिकला आहे तर, तो आल्बम्स रिलीज करणारच ना? त्यानं इंग्रजी, कँटोनीज, मँडरीन, जापनीज आणि तैवानीजमध्ये त्यानं गाणी गायली आहेत. बरेचदा तो त्याच्या सिनेमांसाठीही गाणी गातो. ती गाणी सिनेमा संपताना जी क्रेडिट्स दाखवली जातात, तेव्हा वाजवली जातात. 
 

८. जॅकीच्या स्टंटच्या कंपनीला इन्शुरन्स कंपन्यांनी काळ्या यादीत टाकलं आहे.

जॅकीचे सिनेमातले त्याचे वेडे स्टंट्स पाहिले असतील, तर ते किती जीवघेणे आहेत हे तुम्हांला महित असेलच. त्यामुळेच सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांनी जॅकीला आणि त्याच्या पूर्ण टीमला काळया यादीत टाकलं आहे. परिणामी, त्याच्या टीममधलं कुणीही स्टंट करताना जखमी झालं, तर त्याचा खर्च त्याला स्वत:लाच करावा लागतो.

९. जॅकीने बारा काँक्रीटच्या फरशा फोडल्या पण तेव्हा हातात धरलेलं अंडं मात्र फुटलं नाही!!

जॅकीला एकदा एका टॉकशो मध्ये बोलावलं होतं. तेव्हा त्याने एका हाताने तीन भागांत विभागलेल्या बारा  काँक्रीट टाईल्स एका हाताने फोडल्या, पण तेव्हा त्याच हातात त्यानं एक अंडं धरलं होतं, जे १२ फरशा फोडल्यानंतरही तसंच होतं. आहे ना हा माणूस भन्नाट !!

१०. एका सीनसाठी त्याने चक्क २९०० रिटेक्स घेतले.

आपण आमीर खानला मि. परफेक्टनिस्ट म्हणतो पण जॅकी त्याच्याही वरचढ आहे. त्याला १९८२ साली आलेल्या ड्रॅगन लॉर्ड या सिनेमात एक पिसांचा शटलकॉक पायानं उडवायचा होता. त्यानं यासाठी ॲक्रोबॅटिक सिक्वेन्स ठरवला आणि तो त्याला हवा तसा येईपर्यंत रिटेक्स घेत राहिला. शेवटी मनासारखा टेक आला तेव्हा त्यात ४० दिवस गेले होते आणि तब्बल २९०० रिटेक्स झाले होते. 

११. एका सिनेमात सर्वात जास्त क्रेडिट्स असण्याचं रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे.

सर्वात जास्त स्वत: स्टंट्स करणारा मनुष्य म्हणून त्याच्या नावावर रेकॉर्ड आहे, हे तर सगळ्यांना माहित आहे, पण त्यानं चायनिज झोडिॲक या सिनेमासाठी लेखक, दिग्दर्शक, मुख्य भूमिका, निर्माता, एक्झिक्युटिव्ह निर्माता, सिनेमॅटोग्राफर, कला दिग्दर्शक, युनिट प्रॉडक्शन मॅनेजर, केटरिंग कोऑर्डिनेटर, स्टंट कोऑर्डिनेटर, वृद्ध माणूस, संगीतकार, थीम ट्यूनचा गायक, प्रॉप्स आणि स्टंटमॅन अशा तब्बल १५ जबाबदाऱ्या पार पाडल्या. अर्थात हे आपल्या राम रहीम इंसानसमोर काहीच नाही म्हणा. त्यांनी त्यांच्या नुकत्याच आलेल्या सिनेमात अशा ३२ जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.

१२. जॅकीच्या कवटीत एक कायमचं छिद्र आहे.

जॅकीनं त्याच्या सिनेमातले सर्व स्टंट्स स्वत: केलेत आणि त्यासाठी अंगाखांद्यावर तो बऱ्याच जखमाही बाळगतोय. पण यातल्या काही जखमा त्याच्यासोबत आयुष्यभर राहणार आहेत. तर, "आर्मर ऑफ गॉड" या सिनेमासाठी केलेले स्टंट्स त्याला मृत्यूपर्यंत घेऊन गेले होते. या सिनेमातल्या एका सीनमध्ये त्याला उडी मारुन झाडाच्या फांदीला लोंबकळायचं होतं. सीन करताना त्याच्या वजनाने फांदी तुटली आणि त्याच्या कवटीचा तुकडा पडून ती त्याच्या मेंदूत घुसली. आता त्याच्या कवटीत एक छिद्र आहे, ते प्लास्टिकने भरलेय आणि त्यामुळं त्याला उजव्या कानानं ऐकूही कमी येतं. 

१३. त्यानं चक्क विमानातून उडी मारली आणि तो हॉट एअर बलूनवर पडला.

या "आर्मर ऑफ गॉड" मध्ये जॅकीनं भलेभले पराक्रम केले आहेत. यातल्या एका दृश्यात त्याला टेकडीवरुन उडी मारुन हॉट एअर बलूनवर जायचं होतं. पण खरोखरी ही उडी त्यानं विमानातून मारली होती. आणि त्याला विमानातून उडी मारण्याचा अनुभव नसल्यानं त्याच्या टीमला पुष्कळ काळजी घ्यावी लागली होती. 

१४. जॅकीच्या १३० मिलियन डॉलर्सपैकी त्याच्या मुलाला एक पै ही मिळणार नाहीय.

जॅकी चॅनकडे खूप पैसा आहे. तब्बल १३ करोड डॉलर्स!! पण त्याचं म्हणणं आहे की, "जर माझ्या मुलात क्षमता असेल, तर तो स्वत: पैसा मिळवेलच. पण जर त्याच्यात काहीच क्षमता नसेल, तर माझा आयता मिळालेला पैसा तो वाया घालवेल". म्हणूनच त्याचा मुलगा जयसी चॅनला त्याच्या इस्टेटीतला एक पै ही मिळणार नाहीय.

 

६४ वर्षांच्या आयुष्यात या हरहुन्नरी कलाकारानं बरंच काही केलंय. त्याच्या आयुष्यातल्या या १४ गोष्टी तुम्हांला माहित होत्या का? यात नसलेली कोणती भन्नाट माहिती तुम्हांला त्याच्याबद्दल आहे? आम्हांला कमेंटमध्ये नक्की कळवा...

सबस्क्राईब करा

* indicates required