Form 15H : आपल्या आई बाबांसाठी तुम्हाला हे वाचलंच पाहिजे !!

ज्या व्यक्तीला वयाची ६० वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये पूर्ण होणार आहेत फक्त अशा व्यक्तीलाच हा फॉर्म देता येतो. आर्थिक वर्षासाठी ज्याचे करपात्र उत्पन्न ( Total Income as per income tax ) ३,००,००० रुपयांपेक्षा जास्त असेल त्याला हा फॉर्म भरता येत नाही. म्हणजेच फॉर्म देणाऱ्या व्यक्तीचा देय आयकर शून्य असला पाहिजे.

जर तुम्हाला आर्थिक वर्षात मिळणारे व्याज ५०,००० रुपयांपेक्षा कमी असेल तर बँक तुमचा टॅक्स कापू शकत नाही. ही ५०,००० रुपयांची मर्यादा जिथे कोअर बँकिंग आहे तिथे बँकेसाठी असून ब्रँचसाठी नाही !! अन्यथा ब्रँचसाठी आहे. आजकाल कोअर बँकिंग न वापरणारी बँक विरळाच. तेंव्हा शाखेनुसार व्याज मोजत वेळ फुकट घालवू नका.

टीडीएस झाला तरी घाबरून जाण्यासारखे काहीही नाही. आकाश कोसळत नाही. फक्त तो परत मिळवण्यासाठी तुम्हाला रिटर्न फाइल करावे लागेल. ते वेळेत फाईल करा (३१ जुलै पर्यंत) नाहीतर ५००० रुपये किंवा जास्त उशीर केलात ( ३१ डिसेंबर नंतर) तर १०,००० रुपये लेट फी आहे. बँकेने चुकून कापला तर भांडण करून वेळ आणि ऊर्जा घालवू नका. रिटर्न भरा. हल्ली महिन्याभरात रीफंड मिळतो.

स्रोत

फॉर्म भरणे ही तुमची जबाबदारी आहे बँकेची नाही. बँक जर तुम्हाला फॉर्म देत असेल तर ती एक सेवा आहे. तुमचा हक्क नाही हे समजून घ्या. वेबसाइटवर तुम्हाला फॉर्म डाऊनलोड करता येतो. तुम्ही स्वतः करा आणि भरा किंवा तुमच्या सीएची मदत घ्या. जर ५०,००० पेक्षा कमी व्याज असूनही बँका फॉर्म मागत असतील तर त्याचा अर्थ आहे की एकतर त्यांना कायदा कळलेला नाही किंवा तुमचे उत्पन्न करपात्र मर्यादेच्या खाली आहे याची त्यांना खात्री करून घ्यायची आहे. जर ते उत्पन्न ३,००,००० पेक्षा जास्त असेल तर बँक फॉर्म घेणार नाही. एका प्रकारे ती समाजसेवा आहे असे समजा कारण....

जर तुम्ही तुमचे उत्पन्न ३,००,००० पेक्षा जास्त असून केवळ टीडीएस होऊ नये म्हणून फॉर्म दिलात तर तुम्हाला कमीत कमी तीन महिने आणि जास्तीत जास्त दोन वर्षे एका तुरुंगवास होऊ शकतो आणि याशिवाय दंडही लागू शकतो. 

बँका जर नीट सेवा देत नसतील तर उगाच अर्थमंत्र्यांना यात ओढू नका. ज्यावेळी बजेट संसदेत मांडले गेले त्याचवेळी ही पब्लिक अनाऊन्समेंट झाली आहे. अर्थखात्याने किंवा अर्थमंत्र्यांनी वेगळा आदेश देण्याची अजिबात आवश्यकता नाही. ही जबाबदारी प्रत्येक बँकेच्या ऑपरेशन्स डिपार्टमेंटची आहे. 

फॉर्ममधे कॉलम नंबर १५,१६ आणि विशेषतः १७ काळजीपूर्वक भरा. तो एक मोठा सापळा आहे. कारण त्यावरून तुमचे डिक्लेरेशन हे खरे आहे की खोटे आहे हे आयकर खात्याला कळणार आहे. फॉर्म दिलेल्या व्यक्तीचे टीडीएस न झालेले व्याजसुद्धा 26AS स्टेटमेंट मधे दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही रिटर्न भरणे लागत असाल तर भरा. नाहीतर नोटीस येऊ शकते. 

शेवटी पुन्हा सांगतो तुमचे करपात्र उत्पन्न ३,००,००० च्या वर असेल तर हा फॉर्म तुम्ही देऊ शकत नाही आणि प्रत्येक बँकेकडून मिळणारे व्याज जर ५०,००० च्या आत असेल तर तुम्ही हा फॉर्म देणे लागतच नाही. जर चुकून टीडीएस झाला असेल तर लगेच रिटर्न भरा. रिफंड लगेच येतो.

तुमच्या पावसाळी सहलीचा खर्च सुटू शकतो.

 

लेखक - सीए आनंद देवधर

अधिक माहितीसाठी संपर्क : [email protected]