computer

गर्वाने मिश्या पिळणारी स्त्री कधी बघितली आहेत का?

केरळ मधली पस्तीस वर्षांची शायाजा स्त्री पुरुष भेदभावाच्या परंपरेला एका वेगळ्याच पद्धतीने छेद देत आहे. शायजा अतिशय अभिमानाने तिच्या चेहेर्‍यावरच्या मिशा मिरवत आहे. हो जे वाचलत ते अगदी शंभरटक्के खरं आहे.
स्त्रियांच्या चेहेर्‍यावर असणारे केस नेहमी कुरूपतेचं लक्षण मानलं जातं किंवा समाजात अशी स्त्री चेष्टेचा विषय बनते. पण शायजासाठी तिच्या मिशा तिचा अभिमान आहेत. “मला माझ्या मिशा खूप आवडतात” असे ती गर्वाने सांगते. शायजाने तिच्या बीबीस वरील मुलाखतीत सांगितले की, "मला माझ्या मिशा खूप आवडतात मला असे कधीच वाटले नाही की मी सुंदर नाही. माझ्याकडे असे काहीतरी आहे जे की दुसर्‍या कुणाकडे नाही."
 

अर्थातच तिच्या या मिशा ठेवण्यावरून तिला अनेक लोकांनी वेड्यात काढले अनेकांनी नावे ठेवली. मिशा फक्त पुरुषच ठेऊ शकतात स्त्रियांना कशाला हव्यात मिशा? असे प्रश्न देखील तिला विचारले गेले. पण शायजा म्हणते की हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. तिने मिशा ठेवायच्या कि नाहीत हे फक्त तीच ठरवू शकते दुसरे कुणी नाही. तिच्या मिशा तिच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. ती त्यांच्या शिवाय आता राहूच शकत नाही. ज्यावेळी कोव्हीडमुळे सगळ्यांना मास्क घालावे लागले होते तेव्हा अनेकांनी शायजाला ट्रोल केले होते. पण शायजाचे मित्रपरिवार तिचे कट्टर समर्थक आहेत. शायजाची मुलगी ही तिची सर्वात मोठी समर्थक आहे आणि तिची शक्ती देखील. "माझ्या आईला मिशा चांगल्या दिसतात." असे तिचे म्हणणे आहे.
न्यूज रिपोर्टनुसार, शायजाने तिच्या भुवया कोरल्या आहेत, पण तिने तिच्या मिशा काढल्या नाहीत. तिला एवढ्या मिशा येण्याचं आणखी एक कारण म्हणजे तिच्यावर झालेल्या सहा शस्त्रक्रिया देखील आहे. स्तनातील गाठी काढण्यासाठी, अंडाशयामधील गाठी काढण्यासाठी, हिस्टरेक्टोमी सारख्या सहा शस्त्रक्रिया शायजाला कराव्या लागल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून तिच्या चेहऱ्यावर अनावश्यक केसांची वाढ झाली आहे. प्रत्येक वेळी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला असे वाटते की मला पुन्हा ऑपरेशन थेटरमध्ये जायला लागू नये.

सबस्क्राईब करा

* indicates required