computer

श्रीमंतीतून कंगाल झालेले हिंदी सिनेसृष्टीतले सात कलाकार...

सध्या राणू मंडलच्या गाण्याने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. टॅलेंट असेल तर कधी नशीब चमकेल सांगता येत नाही, हेच राणू मंडलच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे. पण राणू मंडल हे जसे गरिबीतून श्रीमंत होण्याचे मोठे उदाहरण आहे, तसेच बॉलिवूडमध्ये असे पण अनेक स्टार्स होऊन गेले ज्यांना श्रीमंतीतून गरीब परिस्थितीचा सामना करावा लागला. यातल्या काहीजणांना सिनेमात घेण्यासाठी  प्रोड्युसर एकेकाळी रांगा लावायचे, पण त्यांचे शेवटचे दिवस खूप हलाखीत गेले. अशाच प्रतिकूल परिस्थितीतून गेलेल्या काही सिनेताऱ्यांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मिताली शर्मा

ही मूळची नेपाळची असलेली मिताली शर्मा सुरुवातीच्या दिवसात खूप यशस्वी झाली. भोजपुरी चित्रपटांमध्ये तर ती सुपरस्टार म्हणून ओळखली जाऊ लागली. पण नंतर तिला चित्रपट मिळणे बंद झाले आणि काही दिवसांपूर्वी ती मुंबईच्या रस्त्यांवर भीक मांगताना दिसली होती. एकदा मुंबई पोलिसांनी तिला चोरी करताना सुद्धा पकडले होते.

परवीन बाबी

परवीन बाबीबद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही. ७० च्या दशकात परवीन बाबी बॉलीवूडची टॉपची हीरोइन होती. पण नंतर तिचा आजार, काही लोकांबद्दल वाटणारी भीती या सगळ्या प्रकरणात ती ड्रग्सच्या आहारी गेली आणि तिचे वाईट दिवस सुरु झाले. तिचे अमिताभ बच्चन आणि महेश भट सोबतच्या अफेयरच्या चर्चांनी त्याकाळचे बॉलिवूड गजबजलेले असायचे. नंतर तिचा आजार एवढा वाढला की ती काहीबाही बोलायला लागली. तिला असे वाटायचे की अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी तिचा खून करतील. जगातल्या सर्व शोध एजेंन्सीज तिच्या मागावर आहेत असे पण तिला वाटायला लागले होते. २००५ साली तिच्या घराबाहेर दुधाच्या पिशव्या दोन दिवस तशाच पडून होत्या. पोलिसांना घरात ती मेलेली सापडली आणि पोस्टमार्टेममध्ये दिसून आलं की तिचा मृत्यू तीन दिवसांपूर्वीच झाला होता आणि मृत्यूपूर्वी तीन दिवस तिनं काही खाल्लं नव्हतं. ती खूप गरीब झाली असेल असं वाटत नाही कारण तिच्या मृत्यूनंतर इस्टेटीवर हक्क सांगणारे बरेचजण उपटले होते.

राज किरण

जवळपास १०० होऊन अधिक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलेल्या राज किरणची नंतर काम न मिळाल्याने आणि खाजगी आयुष्यातल्या गोष्टींमुळे एकदम परवड झाली. त्याची परिस्थिती इतकी खालावली होती की त्याला नंतर अमेरिकेत टॅक्सी चालवावी लागत होती. त्याला शोधण्यासाठी दीप्ती नवल आणि ऋषी कपूर हे खूप प्रयत्न करत होते. ऋषी कपूरला राजकिरणच्या भावाने तो अटलांटांच्या मानसिक रुग्णालयात आहे असं २०११ मध्ये सांगितलं होतं. पण त्यावर्षी राजकिरणच्या मुलीने एक पब्लिक स्टेटमेंट काढून राजकिरण अटलांटामध्ये नाहीय असं सांगितलं होतं. तिने बाबाला शोधण्यासाठी काही खाजगी गुप्तहेरांची मदतही घेतल्याचं कळतं. पण गेल्या आठ वर्षांत त्याची काहीच खबरबात नाहीय. 

ए. के. हंगल

शोलेमधला "इतना सन्नाटा क्यूं है भाई?" हा एक डायलॉग आजही लोकांना आठवतो. शोलेमधला त्यांचा रहीम चाचाचा रोल अमर झाला होता. तुम्हांला माहित आहे का, ज्या वयात लोक रिटायर होतात, या वयात त्यांनी पहिला सिनेमा केला. त्यावेळी त्यांचे वय ५३ होतं. नंतर पुढची ५० वर्षे ते बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. खरंतर सुरुवातीला ते दिल्लीत टेलर म्हणून काम करायचे. भगतसिंगला फाशी झाली तेव्हा हंगल तरुण होते. त्या घटनेने प्रेरित होऊन ते स्वातंत्र्यसंग्रामात पडले. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर ते समाजवादी विचारांमुळे तीन वर्षं पाकिस्तानच्या तुरुंगात होते. 

तसं सिनेमांचं म्हणाल तर ए. के. हंगल २०१२ पर्यंत, म्हणजे वयाच्या ९८व्या वर्षापर्यंत सक्रिय होते. पण नंतर त्यांना पैशांची चणचण भासायला लागली. त्यांचा मुलगा बॉलीवूडमध्येच फोटोग्राफर होता. त्यालाही तितकंसं काम मिळत नव्हतं. तो स्वत: ७५ वर्षांचा आणि पाठीच्या दुखण्याने आजारी होता. त्यामुळे हंगल यांना आर्थिक मदत करा अशी आवाहनं करण्यात आली आणि त्यांना हॉस्पिटल खर्चासाठी दुसऱ्यांकडून मदत घ्यावी लागली. हंगलांचा मृत्यू दवाखान्यातच, आशा पारेख हॉस्पीटलमध्ये झाला. 

गीतांजली नागपाल

गीतांजली नागपाल हे मॉडेलिंगमधले एक मोठे नाव होते. पण इतर अनेक मॉडल्सप्रमाणे पैसा आणि प्रसिद्धी डोक्यात गेली आणि बाईला ड्रग्सचे व्यसन लागले. एवढे की नंतर तिला पण भीक मागावी लागली.

मीना कुमारी

६० च्या दशकातली सर्वात मोठे नाव असलेली अभिनेत्री म्हणजे मीना कुमारी. ट्रॅजेडी क्वीन म्हणवल्या जाणाऱ्य गेलेल्या मीना कुमारीचा अंतसुद्धा ट्रॅजिक झाला. मीना कुमारीच्या यशाच्या त्याकाळी अनेक सुपरस्टार हेवा करत होते. अयशस्वी लग्न, निद्रानाश यातून मीना कुमारीला दारुचे व्यसन लागले आणि ती प्रचंड कर्जबाजारी झाली. असंही म्हणतात की तिने मिळवलेले सगळे पैसे नवरा काढून घ्यायचा आणि मग शंभर रुपयांसाठी दुसऱ्यांकडे मदत मागण्याचे बरेच किस्से ऐकायला मिळतात.  तिच्या मृत्युनंतरसुद्धा तिच्यावर कर्ज होते. 

भगवान दादा

भगवान दादा माहित नाहीत असा माणूस सापडायचा नाही.  भारताचा पहिला डान्सिंग सुपरस्टार अशी त्यांची आजही ओळख आहे. आजही काशीनाथ घाणेकर श्रेष्ठ की भगवान दादा अशी चर्चा रंगते. एकेकाळी मुंबईत भगवान दादांचे अनेक बंगले आणि बऱ्याच कार्स होत्या. सात दिवसांसाठी सात कार बाळगण्याइतकी चैन ते करू शकत होते. दादर आणि चेंबूरच्या आशा स्टुडिओसारख्या परिसरात त्यांचे बंगले होते. जुहू बीचजवळ २५ खोल्यांचा बंगला होता. पण नंतर त्यांचे सिनेमे चालले नाहीत, गोरेगावमधल्या त्यांच्या मोठ्या गोदामाला आग लागली आणि त्यांच्या सगळ्या सिनेमांच्या कॉप्या त्यात जळाल्या. कालांतराने त्यांचे असे दिवस फिरले की त्यांचा मृत्यू एका झोपडपट्टीत झाला.

मंडळी, इतर अनेक क्षेत्रांपेक्षा नाटक-सिनेमातलं करियर हे सर्वात असुरक्षित मानलं जातं. मुळात काम मिळेल की नाही, मिळालं तर नाटक-सिनेमा  चालेल का, चालला तर आता पुढचं काम कधी मिळेल.. अशा अनेक समस्या इथे असतात. फॅशन, हिरॉईन सारख्या सिनेमातून या  झगमगाटामागची खरी दुनिया कशी असते याची कल्पना येते.  प्रचंड अनिश्चिततेमुळे कधी काळी देशभर चाहते असलेले सुपरस्टार अक्षरशः कंगाल होतात.

त्यामानाने आजची पिढी हुशार आहे. सिनेमातलं करियर चालत असो वा नसो, इतर उद्योगधंद्यांत पैसे गुंतवून ते पुढची तजवीज करुन ठेवत आहेत. त्याकाळच्या लोकांपैकी आशा पारेख एक हुशार बाई होती. पैसे उडवून न टाकता तिने डान्स ॲकॅडमी काढली आणि गरीबांसाठी हॉस्पिटल चालू केले. तुम्हांला या सगळ्या लोकांबद्दल काय वाटतं? सहानुभूती तर अर्थात असेलच. पण श्रीमंत असताना पैसे विचार न करता खर्च करणे, विनाकारण ऐतखाऊ गोतावळा पोसणे आणि शेवटी कंगाल झाल्यानंतर इतरांकडून मदतीची अपेक्षा करणे हे तुम्हांला कितपत पटतं?

 

आणखी वाच :

बिस्मिल्लाह खान : रसिकांच्या मनामनात गूंजणाऱ्या सनईचा एकाकी अंत !

सबस्क्राईब करा

* indicates required