computer

एटीम मशिनच्या लोच्याने या माणसाला करोडोपती बनवले पण शेवटी काय घडले ते वाचाच !

आपण सगळेच एटीएममधून पैसे काढत असतो.अगदी २०० रुपये काढले तरी मिनिटभर जे आवाज येतात त्यावरून असं वाटतं की हे मशिन आता आपल्याला दोन लाख देणार का काय ? पण तसं काही होत नाही आपल्याला २०० रुपयेच मिळतात. पण ऑस्ट्रेलियातल्या एका माणसाला मात्र एक भन्नाट अनुभव आला जो वाचण्यासारखा आहे. 

ही घटना २०११ सालची आहे. डॅन साँडर्स नावाचा एक माणूस रात्री पबमध्ये ढोसत बसला होता. साधारण १ वाजल्यानंतर खिशातले पैसे संपल्यावर तो एकदम टुण्ण् टाइट होऊन बारच्या बाहेर पडल्यावर त्याला वाटलं थोडेसे पैसे एटीएममधून काढावेत.कार्ड वापरून पैसे काढायचा प्रयत्न केला पण खात्यात पैसेच नव्हते. मग त्याने त्याच्या क्रेडिट कार्डवरून बचत खात्यात २०० डॉलर टाकले पण ते ट्रान्सफर झालेच नाहीत.त्याने पुन्हा एकदा डेबिट कार्ड वापरून पैसे काढायचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य त्याला चक्क २०० डॉलर मिळाले.मग तो पुन्हा बारमध्ये गेला आणि ते पैसेही संपवले. पुन्हा एकदा बाहेर पडून त्याने क्रेडिट कार्डावरून ४०० डॉलर टाकण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा ट्रँझॅक्शन कॅन्सलचा मेसेज आला. मग त्याने डेबिट कार्ड वापरून बघितले आणि एटीएम मशिनने त्याला मुकाट ४०० डॉलर दिले. हाच प्रयोग त्याने पुन्हा केला आणि ६०० डॉलर मिळाले.

तर्र झाला असल्याने काय घडतं आहे त्याचं गणित काही केल्या कळेना पण सकाळी तो शुध्दीवर आल्यावर त्याच्या लक्षात आलं की  क्रेडिट कार्ड पैसे देत नाही म्हणजे त्याच्या क्रेडिट कार्डावर डेबिट पडत नाही पण बँकेच्या खात्यात मात्र पैसे जमा होतात. हे लक्षात आल्यावर त्यानी दुसर्‍या रात्री पुन्हा तोच खेळ करून बघितला. खात्यात ४००० डॉलर जमा केले. हळूहळू त्याच्या लक्षात आलं की रात्री १ ते ३ दरम्यान हा लोच्या होतो. 

मग काय या इसमानं हळूहळु १० लाख डॉलर खात्यात फिरवले. मित्रांना दणादण पार्ट्या दिल्या. प्रायव्हेट जेट भाड्याने घेऊन भटकंती केली.लक्झरी बोट घेऊन फिरायला गेला.मित्रांची कर्जं फेडून टाकली.बायकोला काही कळेना पैसा येतो कुठून कसा ? एखाद दोन मित्रांच्या लक्षात आलं की हा पैसा काही सरळ मार्गाने येत नाहीये. त्यांनी त्याला आवर घालण्याचा प्रयत्न केला पण हा गृहस्थ थांबेचना  ! जवळ जवळ ५ महिने मौज केल्यावर मात्र त्याची त्यालाच भीती वाटायला लागली. रात्री पोलीस घराच्या दारात उभे आहेत अशी स्वप्नं पडायला लागली.त्याचा अपराध त्यालाच टोचायला लागला. दारुची नशा पण त्याला पुरी पडेना.शेवटी तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने त्याला जबाबदारी स्विकारून बॅंकेकडे जाण्याचा सल्ला दिला. हा गेला बँकेत पण त्यांनाही काय नेमकं घडलंय हे कळेना. ही पोलीस केस आहे असं म्हणून बँकेने खांदे झटकले पण त्यानंतरही दोन वर्षं पोलीस काही करेनात.याचं मन त्याला गप्प बसू देईना म्हणून तो शेवटी माध्यमांकडे गेला आणि   मुलाखत दिली. पेपरवाल्यांना गाठून बातमी पुरवली. हे सगळं झाल्यावर पोलीसांना जाग आली आणि त्यांनी याला ताब्यात घेऊन कोर्‍टात हजर केलं.

कोर्टात आणखीनच गमतीजमती घडल्या.सरकारी वकील आणि जज्ज यांना काहीच कळेना.बँकवाल्यांनीही सक्षम पुरावे दिले नाहीत.शेवटी या गृहस्थाने दिलेल्या निवेदनाचा आधार घेऊन एक वर्षाची सजा दिली पण  १८ महिने समाजसेवा करण्याची सवलत देऊन त्याला सोडून दिले. आता हा गृहस्थ बार टेंडर म्हणून काम करतोय आणि त्याची कथा त्याच्या तोंडून ऐकायलाच लोकं गर्दी करत आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required