सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एकटा दिनेश कार्तिक ४ परदेशी खेळाडूंना देतोय टक्कर, पाहा संपूर्ण यादी..

आयपीएल  २०२२ (IPL 2022) स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलीय. आतापर्यंत या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला आहे. तसेच गोलंदाजांनी देखील आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. येत्या काही दिवसांत या स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होईल. त्यामुळे प्लेऑफमध्ये प्रवेश करणारे ४ संघ कुठले असतील? सर्वाधिक धावा कुठला फलंदाज करेल? सर्वाधिक गडी कुठला गोलंदाज बाद करेल? असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात असतील. चला तर पाहूया कोण आहेत या स्पर्धेतील आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारणारे टॉप ५ फलंदाज.

१) जोस बटलर: 

राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर याने या हंगामात जबरदस्त फलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत एकूण १२ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ६२५ धावा केल्या आहेत. आतापर्यंत तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तसेच सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील जोस बटलरच्या नावे आहे. त्याने आतापर्यंत एकूण ३७ षटकार मारले आहेत.

२) आंद्रे रसल :

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसल सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत नसला तरीदेखील सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा दबदबा कायम आहे. जोस बटलरनंतर सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत आंद्रे रसल दुसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत एकूण २८ षटकार मारले आहेत.

३) लियाम लिविंगस्टन :

आयपीएल २०२२ स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत लियाम लिविंगस्टन तिसऱ्या स्थानी आहे. पंजाब किंग्स संघाकडून खेळणाऱ्या या फलंदाजाने आतापर्यंत आयपीएल २०२२ स्पर्धेतील ११ सामन्यात एकूण २५ षटकार मारले आहेत.

४) शिमरोन हेटमायर : 

आयपीएल २०२२ स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कॅरेबियन स्टार फलंदाज शिमरोन हेटमायर चौथ्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळताना त्याने महत्वाची खेळी करून आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढले आहे. शिमरोन हेटमायरने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यात एकूण २१ षटकार मारले आहेत.

५) दिनेश कार्तिक :

आयपीएल २०२२ स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दिनेश कार्तिक हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. तो या यादीत पाचव्या स्थानी आहे. या हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी संकटमोचक ठरत आहे. अनेकदा त्याने शेवटी येऊन रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सामना जिंकून दिला आहे. त्याने आतापर्यंत १३७ चेंडूंचा सामना करत एकूण २१ षटकार मारले आहेत.

तुम्हाला दिनेश कार्तिकचा कोणता षटकार सर्वात जास्त आवडला आहे किंवा लक्षात राहिला आहे? आम्हालाही सांगा..

सबस्क्राईब करा

* indicates required