computer

इडली अम्माला आनंद महिंद्रांनी दिली मातृदिनाची भेट!! यांना इडली अम्मा का म्हणतात?

‘मदर्स डे’ म्हणजे आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. समाजात काही अशाही व्यक्ती असतात ज्या संपूर्ण समाजाची आई होतात. काही लोकांना असं भव्यदिव्य काम करता आलं नाही तरी आपल्या परीने जमेल ते आणि जमेल तितकं करण्याचा त्यांचा अट्टहास असतो. खाद्यपदार्थांचे भाव आकाशाला भिडलेले असताना एक रुपयात लोकांना इडली खाऊ घालणारी इडली अम्मा देखील आपल्या कर्तृत्वाने समाजाची आई बनली. सोशल मिडीयावर दररोज काही ना काही व्हायरल होतच असते. असेच २०१९ मध्ये एक रुपयात इडली विकणाऱ्या इडली अम्माची कहाणी व्हायरल झाली होती. तिच्या या कामाने उद्योजक आनंद महिंद्रा इतके प्रभावित झाले की त्यांनी कमलथल ऊर्फ इडली अम्माच्या या अविरत कार्यातील अडचणी कमी करण्यासाठी पुढाकार घेतला.

पहाटेपासून राबून कमलतल अम्मा इडली बनवून विकते. विशेष म्हणजे इडलीचे पीठ तयार करण्यासाठी ती पाटावरवंट्याचा वापर करत असे आणि चुलीवर इडली शिजवत असे. सांबारदेखील चुलीवरच बनत असे. आजूबाजूच्या गावातून मोलमजुरीसाठी येणाऱ्या लोकांची केवळ पैशाअभावी उपासमार होऊ नये म्हणून कमलतल आजींनी एक रुपयात इडली विकण्याचा उद्योग ना नफा ना तोटा तत्वावर सुरु केला. तिच्या या कामाची कहाणी व्हायरल झाल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी तिच्यासाठी गॅस शेगडी आणि मिक्सरची व्यवस्था करून दिली होती. आपल्या या कामामुळे आजूबाजूच्या परिसरात इडली अम्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमलतल यांना लवकरच त्यांचे हक्काचे घर बांधून देण्याची घोषणा त्यावेळी आनंद महिंद्रा यांनी केली होती.

अनेक मोठे लोक अशा सोशल मिडियावरून व्हायरल होणाऱ्या लोकांसाठी खूप काही करण्याचे आश्वासने देतात. पण सोशल मिडियाचे वारे जरा बदलले की त्यांची आश्वासनेही हवेतच विरून जातात. पण आनंद महिंद्रा असे खोटे आश्वासक नाहीत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यांनी इडली अम्माला दिलेला आपला शब्द पूर्ण करून दाखवला. विशेष म्हणजे आताच होऊन गेलेल्या मदर्स डे दिवशी इडली अम्माने तिच्यासाठी बनवलेल्या हक्काच्या घरात गृहप्रवेश देखील केला.

आनंद महिंद्रा यांनी या सुंदर क्षणाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. इडली अम्माला दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती झाली तेही मदर्स डेच्या दिवशी... अशा आशयाचे ट्विट त्यांनी या व्हिडीओ सोबत शेअर केले आहे. आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी उदंड प्रतिसाद देत त्यांच्या कामाला डोक्यावर घेतलं आहे.

 

आनंद महिंद्रा यांच्यासारखी चांगली काम करणारी लोकं आहेत म्हणून अजूनही आपल्याला पाउसपाणी बघायला मिळत असल्याचे काही लोकांनी म्हटले आहे.

आनंद महिंद्रा हे असे उद्योजक आहेत ज्यांनी नेहमीच सामान्य माणसांतील चांगुलपणाचे कौतुक केले आहे, त्यांना प्रोत्साहन दिले आहे. सर्वांचे भले होवो अशा विचाराने जाणारे ते उद्योजक आहेत. त्यांच्या या कार्याला बोभाटाचाही सलाम आहे.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required