computer

कोणत्याही इंधनाशिवाय आणि अविरत धावणारी इन्फिनिटी रेल्वे.. कसं आणि कुठे साध्य होतंय हे?

कोणत्याही इंधनाशिवाय वाहने धावली तर किती छान होईल याची कल्पना करा! रशिया-युक्रेन युद्धामुळे रोजच इंधनाचे दर वाढत असताना तर असे आता प्रकर्षाने वाटत असेल. कल्पनारंजन सोडा. रस्त्यावर धावणारी वाहने इंधनाशिवाय कधी धावतील हे सांगता येत नाही. पण कोणत्याही पारंपरिक इंधनाशिवाय धावू शकेल अशी एक रेल्वे अशी बनवली जात आहे. या रेल्वेला इन्फिनिटी ट्रेन असे म्हटले जात आहे. ही रेल्वे धावण्यासाठी कोळसा किंवा डिझेलची गरज भासणार नाही. ही पर्यावरणपूरक रेल्वे मग धावणार कशी, तसेच ती कुठे बनवली जात आहे. या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर शेवटपर्यंत जरूर वाचा.

ही मालवाहू रेल्वे असेल. ऑस्ट्रेलियाच्या फोर्टेस्क्यू (Fortescue) नावाच्या एका खाण कंपनीने ही इन्फिनिटी ट्रेन बनवली आहे. या खाण कंपनीने विल्यम्स ॲडव्हान्स इंजिनिअरिंग पद्धत विकत घेतली आहे. म्हणजे आजकाल आधुनिक गाड्यांत रिजनरेटिव्ह ब्रेकिंग असते, हेच तंत्रज्ञान आता रेल्वेसाठी वापरण्यात येणार आहे. यामध्ये ब्रेक लावताना घर्षणातून ऊर्जा निर्माण होते. तसेच ही रेल्वे गुरुत्वाकर्षणाने रिचार्ज होईल आणि न थांबता धावेल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातानाच ती चार्ज होईल आणि ही ऊर्जा त्याच्या बॅटरीमध्ये साठवली जाईल. ट्रॅकवर धावतानाच ते चार्ज होणार असल्याने तिची ऊर्जा कधीच संपणार नाही. म्हणून कधीच न थांबणारी म्हणजे infinity असे नाव ठेवले आहे.

अशा रेल्वेचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रदूषणाची पातळी कमी होईल आणि इंधन भरण्याचा त्रासही संपेल. ऑस्ट्रेलियाच्या या प्रकल्पातून शून्य उत्सर्जन होणार असून कमीत कमी खर्चात लोहखनिज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे शक्य होईल. या रेल्वेला २४४ बोगी असतील आणि या बोगींमध्ये ३४,४०४ टन लोह खनिज भरले जाईल. माल चढवल्यानंतर आणि उतरवल्यानंतरही बॅटरी सहज चार्ज होईल.

येणाऱ्या भावी पिढीसाठी इंधनबचत तसेच पर्यावरणपूरक पर्याय आता तयार होणे गरजेचे आहे. त्यामुळे निसर्गाचा तर ऱ्हास थांबेलच, पण आर्थिक फायदाही होतील. ऑस्ट्रेलियात ही रेल्वे धावल्यावर इतर देश नक्कीच त्याचे अनुकरण करतील. काही वर्षांनी हे भारतातही सुरु होण्यास हरकत नाही. तुम्हाला ही कल्पना कशी वाटते?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required