computer

जगभरात ताजमहालच्या ९ प्रतिकृती आहेत. तुम्ही यातल्या किती पाहिल्या आहेत?

जगातील ८ आश्चर्यांपैकी एक ताजमहाल भारतात आहे ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. प्रत्येकाला एकदा तरी ताजमहाल पाहायचा असतोच. परदेशातले मोठे सेलब्रिटी देखील भारतात आले की ताजमहालला जाऊन फोटो काढतात. हा ताजमहाल १९८३ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आला आणि त्यानंतर जगभर ताजमहालबद्दल अधिकच कुतूहल निर्माण झाले.

इतिहास सांगतो की १६३२ ते १६५६ अशी तब्बल २० वर्षं २०,००० लोक ताजमहालचे बांधकाम करत होते. तिबेट, इजिप्त, सौदी अरेबिया येथून साहित्य आणून ताजमहालचे बांधकाम करण्यात आले. आता प्रत्येक प्रसिद्ध गोष्टीची प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न तर होतोच. ताजमहालही त्याला अपवाद नाही. ताजमहालसारखी हुबेहूब दिसणारी ठिकाणे जगात कुठे आहेत याची आपण माहिती घेऊया.

१) ताजमहाल, चीन

'चले तो रात तक, नहीं तो चाँद तक' अशा ओळखल्या जाणाऱ्या चीनच्या वस्तू टिकत नसल्या तरी इकडून तिकडून आयडिया कॉपी करण्यात त्यांचा हात कोणी धरणार नाही. या पठ्ठयांनी ताजमहालचीही कॉपी करून टाकली. 'विंडो ऑफ द वर्ल्ड' या नावाने प्रसिद्ध असलेला हा मिनी ताजमहाल शेंझेन या शहरात आहे. या ठिकाणी सर्वच प्रसिद्ध ठिकाणांच्या प्रतिकृती त्यांनी बनवून ठेवल्या आहेत. आयफेल टॉवर, पिसाचा झुलता मनोरा यांच्याही प्रतिकृती तेथे आहेत.

२) रॉयल पॅव्हिलियन, ब्रायटन युके

इंग्रज साहेब भारतात २०० वर्ष राहिला. या काळात घेऊन जाण्यासारखी इथली प्रत्येक चांगली गोष्ट ते घेऊन गेले. आता ताजमहाल तर घेऊन जाता आला नाही. तसेही प्रयत्न झाल्याच्या कहाण्या आहेत. मग त्यांनी स्वतःचा ताजमहाल उभा केला. हा महाल बांधण्यात आला होता चतुर्थ जॉर्ज, प्रिन्स ऑफ वेल्स याच्यासाठी. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजेच १८२३मध्ये समुद्र किनारी हा महाल बांधण्यात आला होता. याला ब्रायटन पॅव्हेलियन म्हणूनच ओळखले जाते. या बांधकामावर त्याकाळी प्रसिध्द असलेल्या इंडो-सारासेनीक पद्धतीचा प्रभाव होता. प्रिन्सला डॉक्टरांनी समुद्रकाठी घर बांधून आराम करायला सांगितले होते. तर त्यांनी ताजमहालच उभारला. कारण हा प्रिन्स कला, शिल्पकला यांचाही रसिक होता.

 

३) ताज अरेबिया, दुबई

दुबई म्हटले म्हणजे लोकांच्या आवडीचे शहर आहे. शहराचा कायापालट कसा करावा हे दुबईकडे बघून समजते. पर्यटनासाठी दुबई हे लोकांचे आवडते स्थळ आहे. लोकांना दुबईत ताजमहलची कमतरता भासू नये याचीही त्यांनी सोय करून ठेवली आहे. विशेष गोष्ट म्हणजे ही ताजमहलची प्रतिकृती खऱ्या ताजमहालपेक्षा ४ पट मोठी आहे. २,१०,००० चौरस फूट इतक्या प्रचंड परिसरात हे बांधकाम पसरले आहे.

ताज अरेबिया हे २० मजली हॉटेल आहे. या हॉटेलात ३५० खोल्या आहेत. या ठिकाणी रेसिडेंशियल आणि कमर्शियल असे दोन्ही जागा आहेत. लोक फक्त हॉटेल पाहण्यासाठी जाऊ शकतात इतके हे भारी आहे.

४) ताजमहाल, बांगलादेश

बांगलादेशी सिनेनिर्माते अहसनुल्ला यांनी सिनेमाचा सेट म्हणून बांगलादेशची राजधानी ढाका येथे थेट डुप्लिकेट ताजमहाल उभारला होता. १९८० साली जेव्हा हा निर्माता खरा ताजमहाल बघून आला होता, तेव्हा असाच सुंदर महाल आपल्या देशात असावा अशी त्याची इच्छा होती. अहसनुल्ला यांच्या म्हणण्यानुसार, "बांगलादेशी लोकांना ताजमहल पाहण्याची खूप इच्छा असते. पण खूप कमी लोकांना तो खर्च पेलता येतो. याचसाठी आपण ही प्रतिकृती तयार केली."

५) हुमायुनचे थडगे, दिल्ली

हुमायुनचे हे थडगे ताजमहलपेक्षा देखील जुने आहे. दिल्ली येथे १५६० साली बांधलेले हे भारतीय उपखंडातील पहिले बागेतले थडगे होते. एवढंच नव्हे, तर उलट ताजमहल बांधताना या थडग्यापासून प्रेरणा घेऊन आणि त्याचा अभ्यास करून बांधण्यात आला आहे. हे थडगे पहिली बायको हाजी बेगम हिच्या स्मृती प्रित्यर्थ बांधण्यात आले होते. यासाठी पर्शियन आणि भारतीय असे दोन्ही देशातले लोक बांधकामात उतरले होते. त्याआधी जगात बांधण्यात आलेले एकही थडगे इतके भव्य नव्हते. या बागेत मुघल कुटुंबातल्या १५०हून अधिक सदस्यांना दफन करण्यात आले आहे. या थडग्यालादेखील युनेस्कोने १९९३ साली जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला होता. शेवटी ताजमहाल हे ही मुमताजमहलचे थडगेच तर आहे!!

६) ताजमहल हाऊसबोट, कॅलिफोर्निया

१९७० च्या दशकात एक वाईन उद्योजक बिल हरलन भारतात आले होते. ताजमहल बघितला आणि असाच महाल आपल्या देशात असावे अशी इच्छा त्यांना झाली. यातही कश्मीर येथील दल सरोवरात फिरत असताना ताजमहलची ही प्रतिकृती एका बोटवर तयार करायची हे त्यांनी ठरवले.

या बोटीवरील महालासाठी त्याने २ मिलियन डॉलर खर्च करून संगमरवरी फरशा, वाईनसाठी तळघर, ध्यानधारणेसाठी खास कक्ष, एक सिक्रेट लिफ्ट असा सगळा तामझाम करून हा ताजमहाल उभे केले. बिल अनेक वर्ष येथेच राहत असे. शेवटी २०१६ ला त्याने हा महाल विकून टाकला.

७) बिवी का मकबरा, औरंगाबाद

आपल्या मराठी लोकांना ताजमहलच्या इतर प्रतिकृती माहीत असोत नसोत, मात्र बिवी का मकबरा सर्वांना माहीत असतो. आता देखील वाचताना बिवी का मकबरा कधी येईल असा विचार तुम्ही केला असेल. १७ व्या शतकात औरंगजेबाचा मुलगा आजम खान याने त्याची आई रबीआ उद दुराणीच्या स्मरणार्थ हे बांधकाम उभे केले होते. या मकबऱ्याभोवती अनेक बागा आहेत.

याचे आर्किटेक्ट हे अताउल्ला तर इंजिनिअर हंसपंत राय हे होते. जयपूरहून संगमरवर मागवून या मकबऱ्याचे बांधकाम करण्यात आले होते.

८) मिनी ताजमहल, मध्य प्रदेश

आनंद प्रकाश चोक्सी या सामान्य शिक्षकाने आपल्या बायकोच्या स्मरणार्थ हा ताजमहाल उभा केला आहे. खरा ताजमहाल जिच्यासाठी बांधला त्या मुमताजमहलने ज्या ठिकाणी शेवटचा श्वास घेतला, त्याच बुऱ्हाणपूरात हा मिनी ताजमहल उभा आहे.

चोक्सींनी पत्नी मंजुषाच्या प्रेमापोटी हा ४ बेडरूमचा छोटेखानी ताजमहल उभा केला आहे. यात एक लायब्ररी आणि एक मेडिटेशन रूम देखील आहे. तब्बल अडीच वर्ष मेहनत घेऊन इंजिनियरने ही प्रतिकृती उभी केली आहे.

९. बुलंदशहर येथील ताजमहल

फैजुल हसन कादरी या निवृत्त पोस्टमनने आपली बायको ताजमुली बेगम यांच्याकरिता थेट ताजमहल उभा केला. त्यांच्या बायकोचे निधन झाल्यावर आयुष्यभराची पुंजी लावून आणि जमीन विकून त्यांनी ५,५०० चौरस फुटाचे हा ताजमहाल बांधला आहे. जागा लहान असली तरी त्यांचे प्रेम मोठे होते.

तुम्हाला यापैकी कुठल्या ठिकाणी भेट द्यायला आवडेल हे आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required