computer

३३ लाखाची नोकरी मिळवणारा १० वीतला नागपूरकर वेदांत देवकाते!!

कोडिंग आणि प्रोग्रामिंगबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. भरभक्कम पगार आणि देश-परदेशातील विविध कंपन्यांमध्ये होणारी खोऱ्याने भरती यामुळे साहजिक आयटीकडे ओढा वाढत आहे. आयटीत मुलांनी करियर करावे म्हणून अगदी कमी वयात त्यांना कोडिंगचे प्रशिक्षण आता पालक द्यायला लागले आहेत. अनेक १०वी -१२ वी देखील न झालेल्या मुलांचं प्रोग्रॅमिंग चांगलं असल्याचं दिसून येत आहे. नागपूरच्या अवघ्या १० वी त शिकणाऱ्या वेदांत देवकाते या विद्यार्थ्याला त्याच्या कोडिंगच्या हुशारीमुळे तब्बल ३३ लाखांचे पॅकेज मिळाले. पण नंतर त्याचे खरे वय समजल्यावर त्याची संधी गेली.
 

नागपूरच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक असणाऱ्या राजेश आणि अश्विनी देवकाते यांचा वेदांत हा मुलगा. घरात शैक्षणिक वातावरण असल्याने वेदांत तसा हुशार. त्याने आपल्या आईच्या लॅपटॉपवर चांगल्या पद्धतीने कोडिंग शिकून घेतले. यासाठी त्याने जवळपास दोन डझन ट्युटोरीयल्सचा अभ्यास केला.

वेदांतला एका अमेरिकन आयटी कंपनीकडून वेब डेव्हलपमेंट कॉम्पिटीशन आयोजित करण्यात आल्याची माहिती समजली. आपण यात सहभागी व्हायला हवे असे त्याला वाटले आणि तो सहभागी झाला. दोन दिवसांत त्याने २०६६ लाईन्सचा कोड लिहिला. जवळपास हजार आयटीतज्ञांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या सर्वांना मागे टाकत त्याने अवघ्या १५ वर्षे वयात ही स्पर्धा जिंकली.

 

या कंपनीने वेदांतला तब्बल ३३ लाख वार्षिक पगाराची नोकरी ऑफर केली. पण या कंपनीला नंतर समजले की वेदांतचे वय खूपच कमी आहे. तेव्हा त्यांनी ही नोकरीची ऑफर मागे घेतली. तरीही या कंपनीने वेदांतसोबत संपर्क करून निराश न होता शिक्षण पूर्ण कर तुझे शिक्षण पूर्ण झाले की आम्ही तुला संपर्क करूच, असा सकारात्मक निरोप दिला आहे.

वेदांतचे आईवडील देखील आपल्या मुलाच्या या कामगिरीने प्रचंड खुश आहेत. एवढ्या कमी वयात या पद्धतीने त्याने मिळवलेले यश त्यांना निश्चितच अभिमानास्पद वाटत आहे. आईच्या जुन्या लॅपटॉपवर तो आजवर कोडिंग शिकत होता. आता मात्र त्याला गिफ्ट म्हणून नवा लॅपटॉप घेऊन देण्याचे त्याच्या आईवडिलांनी निश्चित केले आहे.

वेदांतचे हे यश निश्चितच सोपे नाही. कोडिंग शिकत असताना लागणारी शिस्त आणि बुद्धिमत्ता वेदांतने मेहनतीने मिळवली असणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आता जरी त्याला नोकरी मिळाली नसली तरी आपले पुढील शिक्षण पूर्ण करून तो यापेक्षा मोठ्या पगाराची आणि हुद्द्याची नोकरी मिळवून दाखवेल यात शंका बाळगण्याचे कारण नाही.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required