पाहा हे गिनिजबुक विक्रम करणारे ७ सेलेब्रिटी!! बिग बी आणि ज्यु. बच्चन, कतरिना, शाहरुख, आशाताई यांच्याही नावावर गिनिजबुक रेकॉर्ड आहेत?
गिनीज बुकमध्ये आपले नाव असावे यासाठी अनेकजण हटके प्रयोग करताना दिसतात. जुने विक्रम मोडीत काढत काहीजण यशस्वी होतात, तर काहीजणांना निराशा येते. आपले बॉलीवूड कलाकारही यात मागे नाही बरंका! या कलाकारांना आपण अभिनय करताना पाहतोच, पण याशिवायही त्यांच्यात असे अनेक गुण आहेत ज्याची माहिती फारशी कोणाला नसते. या गुणांमुळे त्यांचे नाव चक्क गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे. आज अशा कलाकारांची यादी पाहूयात ज्यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे
अमिताभ बच्चन हे नाव तमाम रसिकांच्या मनावर गेले चार दशक राज्य करत आहे. अभिनयाबरोबरच त्यांनी अनेक चित्रपटात गाणी देखील गायली आहेत. त्यांचा विश्वविक्रम हा गाण्यातच आहे. अमिताभ बच्चन यांनी हनुमान चालीसा गाऊन विश्वविक्रम केला आहे. त्यांच्यासह १९ गायकांनी चालीसा गायली होती. शेखर रविजानी यांनी ते संगीतबद्ध केले होते. त्यांच्यासोबत आदेश श्रीवास्तव, अभिजित भट्टाचार्य, बाबुल सुप्रियो, हंसराज हंस, कैलाश खेर, केके, कुमार सानू, कुणाल गांजावाला, मनोज तिवारी, मुकुल अग्रवाल, प्रसून जोशी, रूपकुमार राठोड, सोनू निगम, शंकर महादेवन, सुखविंदर सिंग, सुरेश महादेवन, यूके, कुमार सानू. नारायण आणि विनोद राठोड यांनीही आवाज दिला होता
बिग बीप्रमाणे अभिषेक बच्चनचे नाव गिनीज बुकही ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. २००९ मध्ये अभिषेकने त्याच्या दिल्ली-६ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हा विक्रम केला होता. अभिषेकने अवघ्या १२ तासांत ७ शहरांमध्ये चित्रपटाचे प्रमोशन केले. या कामासाठी त्यांनी गाझियाबाद, नोएडा, फरिदाबाद, दिल्ली, गुडगाव, चंदिगड आणि मुंबई या शहरांमधून खासगी जेटने सुमारे १८०० किमी अंतर प्रवास केला होता. त्याचे हे कष्ट वाया गेले नाहीत आणि हा चित्रपट हिट झाला होता.
शाहरुख खान याचे स्टारडम किती आहे हे वेगळे सांगायला नको. त्याचे चित्रपट पहायला रसिकांच्या तिकीट खिडकीवर रांगा लागायच्या. गेले अनेक वर्ष तो नंबर एकवर राहिला आहे. या फॅन फॉलोइंगमुळेच २०१३ मध्ये तो सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता बनला होता. शाहरुखने २०१३ मध्ये २२०.५ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.
शाहरुखप्रमाणेच कतरिना कैफच्या नावावर असाच विक्रम होता. ती महिला विभागात २०१३ मध्ये सर्वाधिक कमाई करणारी कलाकार बनली होती. कतरिनाने २०१३ मध्ये ६३.७५ कोटींची कमाई करून हा विक्रमही केला होता. कतरिनाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री फारशी जोरदार नव्हती. तिच्या हिंदी बोलण्यामुळेसुद्धा तिला टीका सहन करावी लागली होती. पण तिने कष्ट करत बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला.
एकाच कुटुंबातले सर्वाधिक जण कलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत काम करतात असाही एक विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदवला गेला आहे. तुम्हाला नक्कीच माहिती असेल हे कुटुंब? होय! बरोबर ओळखलेत. आम्ही कपूर कुटुंबाविषयी बोलत आहोत. बॉलिवूडमध्ये पृथ्वीराज कपूर, राज कपूरपासून ते रणबीर कपूरपर्यंत आतापर्यंत कपूर कुटुंबातील २५ कलाकार बॉलिवूडचा भाग बनले आहेत, त्यामुळे या कुटुंबाचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे. थोडक्यात कपूर राज कायम राहणार आहे.
दबंग गर्ल आणि शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी म्हणून सोनाक्षी सिन्हाला आपण सगळेच ओळखतो. सोनाक्षी सिन्हाला नेल आर्ट करायला आवडते. म्हणून २०१६ मध्ये तिने नेल पेंटिंग स्पर्धेत भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम होता त्यात १३२८ महिलांनी सहभाग घेतला होता. हा एक विक्रम ठरला होता.
संगीतप्रेमींच्या मनावर सहा दशकांहून अधिराज्य गाजविणा-या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे नावही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आहे. १९४३ पासून आपली गायन कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या आशाताईंनी २० पेक्षा अधिक भाषांत तब्बल ११ हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. त्यांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा हा जागतिक विक्रम ठरला आहे.
भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांनीही १९७४ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात जास्त गाणी रेकॉर्ड केल्याचा दावा रसिकांनी केला होता. त्यांचे नाव नोंदवले गेले होते. पण नंतर हा दावा गायक आणि संगीतकार मोहम्मद रफी यांनी खोडून टाकला. त्यामुळे १९९१ मध्ये ही नोंद काढून टाकण्यात आली.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली? याशिवाय आणखी कुठल्या कलाकारांचे विक्रम तुम्हाला माहिती असतील जर जरूर कमेंट करून सांगा.
शीतल दरंदळे




