computer

एका हवेलीच्या अनेक प्रियकरांची गोष्ट - गुलाबो सिताबो

कोरोनामुळे अख्ख्या जगाचं गणित चुकलंय. आपल्या मनोरंजनसृष्टीतील निर्मात्यांची झोप उडालीय. तसं बघितलं तर चित्रपटसृष्टी दोन-दोन वर्ष आधीपासून आपली सिनेमा रिलीज डेट पकडून ठेवत होती. कोरोना संकटामुळे ‘लॉकडाऊन’ लागला आणि चित्रपटांच्या प्रदर्शनाची गणितं पार विस्कळीत झाली. चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे व ती कधी उघडणार याची काहीच शाश्वती नसल्याने काही निर्माते तिसऱ्या पडद्याकडे वळले. अमिताभ बच्चन व आयुष्मान खुराना अभिनित व सुजित सरकार दिग्दर्शित ‘गुलाबो सीताबो’ हा चित्रपट नुकताच ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर गाजावाजा करीत प्रदर्शित झाला. सुजित व आयुष्मान आणि अमिताभ व सुजित अनुक्रमे ‘विकी डोनर’ आणि ‘पिकू’ साठी एकत्र आले होते व ते दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते व समीक्षकांनाही आवडले होते. त्यामुळे हे तिघे एका चित्रपटासाठी एकत्र आले आहे म्हटल्यावर प्रेक्षकांच्या अपेक्षा खूपच वाढल्या. चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी झालेली ‘हवा’ कधीकधी त्यास मारक ठरू शकते व हाच प्रत्यय ‘गुलाबो सीताबो’ बाबत अनुभवायला मिळतो.

नजीकच्या काळात हिंदी चित्रपटही सशक्त कथांना प्राधान्य देऊ लागले आहेत. आजचा प्रेक्षक जाणकार झालाय व तो जागतिक सिनेमात, शोज मध्ये काय-काय चाललंय हे जाणून आहे. ‘गुलाबो सीताबो’ बऱ्याच अंशी सामान्य वाटतो व निर्मात्यांनी तो तिसऱ्या पडद्यावर प्रदर्शित केला हा उत्तम निर्णय होता याला दुजोरा देतो. प्राचीन  काळापासून उत्तरेकडे ‘गुलाबो सीताबो’ नावाचा कठपुतली खेळ प्रसिद्ध होता परंतु आता तो नजरेआड झालाय. या खेळात दोन सवती, ज्यांची नावे गुलाबो व सीताबो आहेत, एकमेकांशी सतत भांडत राहतात. हा खेळ जरी लयास गेला असला तरी दिग्दर्शकाने त्याचा प्रतीकात्मक वापर या चित्रपटासाठी केला आहे. चित्रपटातील दोन प्रमुख पात्रे एकमेकांशी सतत भांडत असतात. या भांडणांमागे दोघांचेही वेगवेगळे सुप्त हेतू आहेत व त्या हेतूपूर्तीसाठी त्यांचे प्रयास म्हणजे हा चित्रपट.

 

मिर्झा चुन्नन नवाब (अमिताभ बच्चन) हा पंचाहत्तरीतला नवरा आपल्या बेगमच्या (फारुख जफर) नावे असलेल्या लखनौस्थित हवेलीची निगराणी करीत असतो या आशेवर की त्याची ९५ वर्षांची ती बायको, फातिमा बेगम, गचकल्यावर ती हवेली त्याच्या मालकीची बनू शकेल. खरंतर, त्याचा हा आयुष्यभराचा हव्यास असतो आणि त्याने आपल्यापेक्षा १७-१८ वर्ष वयाने मोठी असलेल्या फातिमाबीसोबत केवळ हवेली मिळावी यासाठीच लग्न केलेले असते. त्यांच्या हवेलीत काही भाडेकरू असतात ज्यात बांके रस्तोगी (आयुष्मान खुराना) असतो. वडिलांच्या अकाली निधनामुळे लहानपणीच शाळा सोडून त्याला पिठाची गिरणी चालवावी लागतेय व आई आणि तीन बहिणींची जबाबदारी त्याच्यावर आहे. मिर्झा सर्व भाडेकरूंना हाकलण्यासाठी, त्यांचे लहानमोठे सामान चोरी करत, प्रयत्न करीत असतो जेणेकरून पुढे जाऊन हवेली त्याच्या नावावर होण्यासंबंधात काही समस्या निर्माण होऊ नयेत. बांके तरुण असल्यामुळे शारीरिक बळाची धमकी देत मिर्झाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो कारण त्यालाही हवेलीत त्याचा वाटा हवा असतो. या त्यांच्या नेहमीच्या तंट्यात पुरातत्व विभागातील अधिकारी, वकील आणि बिल्डर सामील होतात. सर्वांनाच हवेली खुणावत असते. सर्वजण शेरास सव्वाशेर वागण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु अंततः घडते काही विपरीतच.

जुही चतुर्वेदीच्या या कथेत काळ थांबल्यागत वाटत असला तरी वयाच्या कुठल्याही टप्प्यावर मनुष्य आपल्या ईर्षा सोडत नाही हे अधोरेखित होते. किंबहुना तो काळ व आताच काळ यात काहीच फरक नाही व आताही प्रत्येक व्यक्ती आपल्या आकांशापूर्तीसाठी समोरच्यावर आपापल्या परीने मात करण्याचा प्रयत्न करीत असतो. कोण जिंकतो कोण हरतो (यात नियतीही आली) ही गोष्ट अलाहिदा. ‘गुलाबो सीताबो’ च्या कथेचा जीव छोटा आहे व पटकथाही फक्त मुख्य पात्रांभोवतीच फिरत राहिल्यामुळे त्यात संथपणा येत जातो. पहिली चाळीसेक मिनिटं पात्रपरिचयातच खर्ची पडल्यामुळे चित्रपटाला ‘हेड-स्टार्ट’ मिळत नाही. त्याहीनंतर फार गमतीजमती न घडल्यामुळे कथानक एकसुरी झाल्यागत वाटते. संवाद काही ठिकाणी चमकदार वाटले तरी त्यातील सूक्ष्म व उपरोधिक विनोद सामान्यांना ‘बम्पर’ जाऊ शकतो. संगीत (शंतनू मोईत्रा) लोकसंगीतावर आधारित असून फारसा प्रभाव पाडू शकत नाही. 
संपूर्ण चित्रपट सतत ‘डिप्रेसिंग’ भाव प्रेरित करीत असल्यासारखे जाणवत राहते. दिग्दर्शक अधेमधे चमक दाखवतो परंतु सुजित सरकारचा हा सर्वात अशक्त चित्रपट असावा. 

आयुष्मान खुराना चांगले काम करून जातो. तो लखनवी ढंगात संवाद बोलतो हे त्याचे भूमिकेबाबत ‘वर्किंग’ असले तरी जे त्या लकबीबद्दल अनभिज्ञ आहेत ते याकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहतील. विजय राज (पुरातत्व विभाग अधिकारी), बिजेंद्र कालरा (वकील) यांनी चांगले काम केले आहे व बांकेची बहीण झालेली सृष्टी श्रीवास्तव प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालीय. 

या चित्रपटातील एकमेव खणखणीत नाणे म्हणजे अमिताभ बच्चन. त्यांनी आपल्या भूमिकेत जान ओतलीय. त्यांचे दिसणे, वागणे, बोलणे, चालणे लाजवाब. त्यांनी भूमिका इतकी रंगतदार केलीय की काही वेळेपुरता चित्रपटातील त्रुटींकडे दुर्लक्ष करावेसे वाटते. महत्वाचं म्हणजे चित्रपटभर त्यांचा चेहरा गमच्छाने झाकलेला असल्याकारणाने त्यांनी भावना फक्त डोळ्यातून व्यक्त केल्या आहेत जे अभिनय शिकणाऱ्यांसाठी उत्तम उदाहरण आहे.

‘गुलाबो सीताबो’ हा केवळ अमिताभ बच्चन यांचा चित्रपट आहे आणि त्यांच्याच साठी पहाण्यायोग्य आहे.

 

लेखक : कीर्तिकुमार कदम 

सबस्क्राईब करा

* indicates required