व्हिडीओ ऑफ दि डे : तुंबाडचा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज!!

Subscribe to Bobhata

आपल्याकडे अनेक हॉरर सिनेमे येऊन गेले. पण त्यातले बरेचसे बिपाशा बसू छाप हास्यास्पद ठरले. बॉलीवूडमध्ये आणि मराठीत चांगला हॉरर सिनेमा नाही असं अनेक वर्षांपासून म्हटलं जात होतं. मराठीतली ही कमी ‘लपाछपी’ या सिनेमाने भरून काढली आहे आणि आता असं वाटतंय की हिंदीमध्ये सुद्धा ती कमतरता आता उरणार नाहीय.  

तुंबाड या बहुचर्चित सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झालाय. मराठी माणसाला तुंबाड म्हटलं की श्री. ना. पेंडसे यांची तुंबाडचे खोत ही भलीमोठी कादंबरी आठवेल. पण या सिनेमाचा आणि कादंबरीचा काहीही संबंध नाही. ही गोष्ट नारायण धारपांच्या कथेवरुन सुरु झाली होती. आता तिच्यात बरेचसे बदल झाले असले तरी धारपांची कथा म्हणजे काय असेल हे वाचकांच्या लक्षात येईलच. सिनेमाची ही कथा पुण्यातल्या तीन पिढ्यांच्या अवतीभवती फिरते. 

स्रोत

चित्रपट एक वेगळा अनुभव देऊन जाईल हे टीझरच्या एकेका फ्रेम वरून दिसतंय. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तब्बल ६ वर्षांचा अवधी लागल्याचं चित्रपटात मुख्य पात्र साकारणाऱ्या सोहम शहा याने सांगितलं होतं. सिनेमाचा दिग्दर्शक राही अनिल बर्वेंनी कथा कधीपासून त्यांच्या मनावर गारुड करुन होती आणि हा सिनेमा बनवताना काय अनंत अडचणी आल्या, हे वेळोवेळी सोशल मिडियावर लिहिलेलं आहेच. या सर्व लोकांची ६ वर्षांची मेहनत या छोट्याश्या टीझर मधूनही दिसतेय. तुंबाडचं स्पेशल स्क्रीनिंग झाल्यानंतर राजकुमार हिरानी यांनी चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं होतं. अनुराग कश्यपने तुंबाडला ‘गेम चेंजर’ म्हटलंय. असा हा रहस्यमयी गूढ तुंबाड १२ ऑक्टोबरला रिलीज होतोय.

....पण त्या आधी जास्त वेळ न दवडता तुंबाड काय आहे हे तुम्ही प्रत्यक्षच बघा. भीतीने अंगावर काटा नक्कीच येईल.

सबस्क्राईब करा

* indicates required