computer

आपल्या मुलांसाठी सुरू केलेले व्हिडिओ ते जगातलं दुसऱ्या नंबरचे यूट्यूब चॅनल हा कोकोमलनचा रंजक प्रवास

तुमच्या घरी लहान मूल आणि इंटरनेट दोन्ही गोष्टी आहेत का? मग तर तुमच्यासाठी आमचा आजचा विषय अगदी जिव्हाळ्याचा असेल. आजच्या काळात कोकोमलनचा जेजे आणि त्याचा परिवार मोबाईल स्क्रीनमधून अगदी घराघरांत पोहचला आहे. नुसता पोहचला नाहीये तर अगदी राज्य करतोय. तुमच्या घरात युट्यूबवर कोकोमेलनची गाणी लागतात का? तुमचं मूल या गाण्याचे फॅन आहे का? नसलं तरी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एका जोडीने आपल्या मुलांसाठी सुरू केलेले व्हिडिओ ते जगातलं दुसऱ्या नंबरचे यूट्यूब चॅनल हा कोकोमलनचा प्रवास!!

प्रवासाला सुरावात करण्यापूर्वी आपण समजावून घेऊया कोकोमेलन आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे बडबडगीतं आणि लहान मुलांच्या इतर गाण्यांवर असलेल्या अनिमॅशन व्हिडिओजचं चॅनल. तुमच्या लहानपणी कदाचित तुम्ही जिंगलटून्स या मराठी बडबडगीते असणाऱ्या सिडीज पाहिल्या असतील, त्याचेच हे मोठे भावंडं म्हणावे लागेल. आजच्या घडीला यूट्यूबवर या चॅनलचे १२ कोटी सबस्क्रायबर्स आहेत. सगळ्यात जास्त व्हिडिओ व्ह्यूजचा टप्पा या चॅनलने गाठला आहे. एवढेच नाही तर यूट्यूबवरून बाहेर पडून हे चॅनल आता Netflix सारख्या माध्यमावर आपला ठसा उमटवत आहे. कोकोमेलनचा शो हा अमेरिकेत सर्वात जास्त काळ टॉप टेनमध्ये राहणारा शो म्हणून ओळखला जातोय. पण या सगळ्याची सुरुवात अगदी साधीच म्हणावी लागेल. 

ऑरेंज काऊंटी कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या जे जियन (jay Jeon) आणी त्याची पत्नी या दोघांना आपल्या मुलांना कसे बिझी ठेवायचे हा प्रश्न नेहमी पडायचा. जे कडे सिनेमा बनवायचा आणि लेखनाचा अनुभव होता, तर त्याची पत्नी ही लहान मुलांच्या पुस्तकांसाठी चित्रं काढायची. आपल्या मुलांसाठी त्यांनी काही व्हिडिओज् बनवले. त्यांच्या मुलांना हे व्हिडिओ खूप आवडले. तेव्हा त्यांनी हे व्हिडिओ ThatsMEOnTV नावाच्या एका यूट्यूब चॅनलवर अपलोड केले, यावेळी साल होते २००६. दरम्यान त्याने treasure studio नावाची एक कंपनी स्थापन केली. 

आधी २D animation असणारे व्हडिओ काही काळाने ३D मध्ये तयार करण्यात आले. २०१३ मध्ये या चॅनलचे नाव बदलून ABCKidsTV करण्यात आले. याच काळात कोकोमेलनला त्यांचे खरे यश मिळायला सुरुवात झाली आणि जन्म झाला मुख्य कॅरॅक्टर जेजेचा. खरं तर एक लहान रांगणारे बाळ, त्याचे आई बाबा, योयो नावाची बहीण, तर टॉमटॉम  नावाचा भाऊ असा परिवार तयार झाला. बोबा, वॉली, एला, पेपे, मोची, किकी असा प्राण्यांचा मित्रपरिवार तयार झाला. एका पाठोपाठ एक गाण्याचे व्हिडिओ तयार करण्यात आले आणि जेजेची लोकप्रियता वाढू लागली. जेजे मोठा कधी होणार आणि त्याला केस कधी येणार असे प्रश्न लोक कमेंटमध्ये विचारायला लागले. 

२०१८-२०१९ मध्ये चॅनलचे पुन्हा एकदा नाव बदलण्यात आले. नवं नाव होतं CoCOmelon. जे चं म्हणणे होते की नवं नाव हे सर्व समावेशक असावं आणि जास्तीत जास्त मुलांना याची गंमत वाटावी. आपल्या २० लोकांच्या टीमसोबत त्यांनी आणखी व्हिडिओज बनवले. कालांतराने जेजे मोठा झाला, शाळेत जाऊ लागला. त्याचे प्राणी मित्र जाऊन शाळेतले खरे मित्र आले. या सगळ्या प्रकारची लोकप्रियता पाहता Netflix ने आपल्या प्लॅटफॉर्मवर जेजे आणि त्याच्या मित्रांना आमंत्रण दिलं. तिथंसुद्धा जेजेनं  धुमाकूळ घातलाय. 

२०२० च्या जुलै महिन्यात मूनबग या कंपनीने जाहीर केलं की त्यांनी कोकोमेलन विकत घेतलं आहे. मुनबग ही कंपनी लहान मुलांच्या कंटेंटमध्ये दादा मानली पाहिजे. मुलांचे लाडके ब्लीपी, लिटिल बेबी बूम, गो बस्टर, असे अनेक टॉप चॅनल्स त्यांच्या मालकीचे आहेत. यातल्या ब्लीपीची कहाणी बोभाटा लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. मूनबगने विकत घेतल्यानंतर कोकोमेलन इतर अनेक भाषांत घेऊन यायचा त्यांचा प्लॅन आहे. त्यातल्या स्पॅनिश भाषेत जेजेचे व्हिडीओज यायला सुरूवत झाली आहे.  आता कोकोमेलनचे खेळणे आणि इतर merchandise बाजारात उपलब्ध आहेत.  एवढं सगळं खरं, पण यशाचं खरं कारण म्हणजे मुलांना हे व्हिडिओ तुफान आवडतात. पण असे काय आहे या व्हिडिओमध्ये?

जर तुम्ही हे व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की या मागे एक विज्ञान आहे. या व्हिडिओजमध्ये सर्व पात्रांची डोकी आणि डोळे मोठे असतात. भडक रंग आणि सतत होणारी हालचाल यांमुळे लहान मुलांच्या मेंदूला विविध प्रकारच्या संवेदना (sensory input) मिळत असतात. या सगळ्यात महत्त्वाच्या कारणामुळे मुलं या व्हिडिओजना चिकटलेली असतात. पण हे मुलांसाठी कितपत चांगले आहे याबद्दल तज्ञांचे म्हणणे आहे की मुलांना मिळणाऱ्या सततच्या sensory stimulus म्हणजेच संवेदी प्रेरणा किंवा थोडक्यात संवेदनांच्या माऱ्यामुळे मुलांमध्ये अस्वस्थता किंवा हायपर ॲक्टिव्हिटी वाढू शकते. ते म्हणतात ना, "कोणतीच गोष्ट अती करू नये", तसे आहे. आपल्या मुलांना कोकोमेलनचा आनंद घेऊ द्या, पण ते किती वेळ पाहत आहेत त्याकडे लक्ष असू द्या. 

युट्यूबच्या लोकप्रियतेच्या चढाओढीत आपली भारतीय संगीत कंपनी टी सिरीज आणि PewDiePie हे पहिल्या दोन स्थानांवर होते तेव्हा  PewDiePie आणि टी-सिरीजच्या चाहत्यांमध्ये युद्धही रंगले होते आणि PewDiePie ने टी-सिरीजविरुद्ध एक अपमान करणारं गाणं काढलं होतं. लोकप्रियतेच्या बाबतीत सध्या टी-सिरीज खालोखाल युट्यूबवर नंबर येतो कोकोमेलनचा. PewDiePie याने तर कोकोमेलनलाही सोडले नव्हते. त्यांनी चक्क कोकोमेलनचे टर उडवणारे गाणे बनविले होते. पण सध्या ते स्वत:च चौथ्या स्थानावर गेले आहेत आणि कोकोमेलन दुसऱ्या नंबरवर दिमाखात उभं आहे..

पण हे सगळं करुनही कोकोमेलनच्या यशाचा अश्वमेध कोणी रोखू शकले नाही. Love it or hate it, but you can't ignore it!! हेच कोकोमेलनच्या बाबतीत म्हणावं लागेल!!

सबस्क्राईब करा

* indicates required