computer

PewDiePie आणि टी-सिरीजचे भांडण आता तुम्हांआम्हांला महाग पडू शकते. तुमच्या कंप्युटरमध्ये तर नाही ना हे Ransomware??

मंडळी गेले काही दिवस झाले PewDiePie आणि टी सिरीज यांचं मोठं भांडण चालू आहे. हे  भांडण आहे युट्यूबवरचं सर्वात मोठं चॅनल बनण्याचं. खरंतर गेले अनेक महिने हे भांडण चालू आहे. यात काल परवा टी-सिरीज पुढे गेलं होतं, आता परत PewDiePie पुढे गेला आहे. पण आता या सगळ्या प्रकरणात PewDiePie च्या बाजूने काही हॅकर्स उतरले आहेत. त्यांनी तुमच्या कंप्युटरमधल्या फाईल्स गोठवायला म्हणजेच टेक्निकल भाषेत इन्क्रिप्ट करायला सुरवात केली आहे. त्यांची मागणी आहे की तुम्ही PewDiePie ला जिंकवावे. ते झालं, की तुम्हांला तुमच्या फाईल्स परत मिळतील.

कोण आहे PewDiePie??

हा एक स्पॅनिश युट्युबर आहे. एकट्याने चालू केले चॅनल ते आज युट्युबवरचं सर्वाधिक प्रसिद्ध चॅनल हा त्याचा प्रवास आहे. टी-सिरीज एक कंपनी आहे आणि ती आपल्या आर्टिस्टला योग्य मोबदला देत नाही म्हणून तुम्ही मला पाठिंबा द्यावा असं त्याचं म्हणणं आहे. जगभरातून त्याला पाठिंबा पण मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने टी-सिरीजच्या हेडक्वार्टरसमोर जाऊन एक गाणं पण रिलीज केलं होतं. तसे त्यानं भारताला नावं ठेवायचे बरेच उद्योग केले आहेत.

टी-सिरीजचं यावर काय म्हणणं आहे??

टी-सिरीज ने सुरवातीला या गोष्टीवर काही ऑफिशियल स्टँड घेतला नव्हता. पण भारतातल्या इतर यूट्यूब चॅलन्सनी त्यांना पाठींबा दिला. काही दिवसांपूर्वी टी-सिरीज चे मुख्य भूषण कुमार यांनी भारतीयांना चॅनल सबसक्राईब करायचे आवाहन केलं होतं. एकूणच त्यांनी भारतीयांच्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेला हात घातला. अर्थातच त्याचा त्यांना बऱ्यापैकी फायदा पण झाला.

सध्याचं प्रकरण काय आहे??

सुरुवातीपासूनच अनेक हॅकर्सनी PewDiePie ला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. काही लोकांचे प्रिंटर हॅक करून त्यावर PewDiePie चॅनल सबस्क्राईब करा असा संदेश प्रिंट करण्यात आला. त्यानंतर आता दोन Ransomware समोर आले आहेत. त्यातला एक तुमच्या कंप्यूटर वरच्या फाइल्स लॉक करते. जोपर्यंत हे चॅनल १० करोड सबस्क्राईबर्सचा टप्पा गाठत नाही तोपर्यंत तुमच्या फाईल लॉक ठेवल्या जातील. यात पण मेख आहे राव!!  जर t-series ने PewDiePieच्या आधी   १० करोडचा टप्पा गाठला तर तुमच्या फाईल डिलीट करून टाकण्यात येतील. हे झालं पहिल्या Ransomwareबद्दल. दुसरा Ransomware तर  सरळ तुमच्या फाइल डिलिट करून टाकण्यात येतात. पहिल्या प्रकारावर एका सेक्युरिटी कंपनीने काही तोड बाजारात आणलेली आहे. 

काय असते Ransomeware?

Ransom म्हणजे शब्दश: खंडणी. आधी लोक कुणाला तरी पळवून नेऊन किंवा जीव घेण्याची भीती घालून खंडण्या मागायचे. आजच्या युगात मात्र खंडणी दिली नाही तर डेटा डिलिट करु अशी धमकी दिली जाते. 

तर, Ransomeware म्हणजे तुमच्याकडून खंडणी मागण्यासाठीचे एक सॉफ्टवेअर आहे. तुम्ही जर खंडणी दिली तर तुमचे फाईल्स आणि डेटा तुम्हांला परत मिळतील.  नाहीतर काहीच नाही. काही हॅकर तर खंडणी देऊन सुद्धा तुमचा डेटा परत करत नाहीत. अनोळखी ठिकाणाहून सॉफ्टवेअर किंवा फाइल्स डाउनलोड न करणे हे या पासून वाचण्याचे सगळ्यात योग्य पाऊल आहे.

प्रकरण खूपच गुंतागुंतीचं झालंय राव!!

हे टी-सीरीज आणि  PewDiePie यांच्यातलं भांडण गोष्टी हाताबाहेर घेऊन जाऊ शकते. Ransomeware हे तर एक उदाहरण झालं. पण परवा न्यूझीलंडमध्ये मशिदीवर झालेल्या हल्लेखोरानेसुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये PewDiePie ला सबस्क्राईब करायचा संदेश दिला होता. एकूणच हे भांडण आता कुठल्या थराला जाईल हे सांगता येत नाही. तरीही ही सगळ्या जगाचा पाठिंबा असलेलं  एक चॅनल आणि फक्त भारतीय भाषांचे एक चॅनल असा हा रंगतदार सामना आहे. दोन्ही बाजूंनी सनदशीर मार्गांचा वापर करावा असे आम्हाला वाटते. तुम्हाला जर भारतीय म्हणून टी-सीरीजला सबस्क्राईब करावे वाटत असेल तर जरूर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required