computer

IPLचा थरार : पहिला सामना चेन्नई विरुद्ध बंगलोर !! कसे आहेत दोन्ही संघ, काय आहे सामन्याची वेळ आणि कुठे बघू शकता??

तर मंडळी दरवर्षी एप्रिल मे महिन्यात एक सर्कस पाहायला मिळते. द ग्रेट इंडियन सर्कस म्हणजेच आपल्या आयपीएल. यावर्षी आपला देश निवडणुकीत बुडून गेलेला असला तरी आयपीएल मात्र होणार आहे. यंदा एप्रिलच्या ऐवजी आयपीएल मार्चमध्ये सुरू होणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत पहिला सामना गतविजेत्या चेन्नई आणि विराट कोहलीच्या बंगळुरू या संघांमध्ये होणार आहे. आजवर या संघांची २२ वेळा  एकमेकांशी लढत झाली आहे, त्यात १४ वेळी बंगळुरुने विजय मिळवला आहे. खरंतर धोनी आणि कोहली यांच्यातल्या कॅप्टनशीपचा हा सामना आहे. तर बघूया आजच्या सामन्यात दोन्ही संघ कसे आहेत.

गेल्यावर्षी मॅच फिक्सिंग आरोपातून मुक्त झालेली चेन्नई टीम जेव्हा मैदानात उतरली, तेव्हा म्हाताऱ्यांचा संघ म्हणून त्यांची अवहेलना करण्यात आली.  पण याच म्हातार्‍यांनी सर्व तरुणांना लाजवत आयपीएलवर आपले नाव कोरले. यावर्षी संघात केदार जाधवचा समावेश झालेला आहे. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग, तसेच चकवणारी बॉलिंग करणारा जाधव 'की फॅक्टर' ठरू शकेल. याशिवाय सुरेश रैना, ब्रावो आणि जडेजा हे काही महत्त्वाचे खेळाडू आहेत. सलामीला येणारा वॉटसन हा तर ट्रम्प कार्डच म्हणावा लागेल. या संघात हरभजनसारखा अनुभवी बॉलर आहे आणि हे सगळे म्हणून कमी काय तर या सगळ्यांचा लगाम धोनीच्या हाती आहे.

आता आपण बंगळुरूकडे वळूया. जगातले सगळ्यात दोन उत्कृष्ट फलंदाज म्हणजेच आपला विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स बंगलोरच्या संघाचे मुख्य शिलेदार आहेत. या दोघांनी ठरवलं तर चेन्नईच्या बॉलिंगच्या चिंधड्या उडवून शकतात. आरसीबीच्या मिडल ऑर्डरमध्ये शिवम दुबे आणि मोइन आली हे दोन ऑलराऊंडर सुद्धा आहेत. उमेश यादव आणि टीम साऊदी या वेगवान गोलंदाज याशिवाय चहल आपलं फिरकीचं कसब दाखवू  शकतो.

हे सगळे पाहता आरसीबीचा संघ कितीही तगडा असला तरी ऐनवेळी माती खायची त्याची सवय आहे. हे बघता आजचा सामना चुरशीचा नक्की होईल. आजचा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह बघु शकता. आणि अर्थातच हॉटस्टारवर स्ट्रिमिंग करू शकता.

तर आयपीएल पाहण्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे का? असलास तर आजचा सामना कोण जिंकेल असं तुम्हांला वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required