'चड्डी'ला मिळालं ऑक्सफर्ड डिक्शनरीत स्थान....पण हा शब्द का निवडला असेल भाऊ ??
ऑक्सफर्ड डिक्शनरीत भारतीय शब्दांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे भाऊ. ही मोजकी उदाहरणं पाहा. दादागिरी, जुगाड, नाटक, फंडा, अच्छा, टाइमपास (हो हा भारतीय शब्द आहे), गुलाब, चमचा, अब्बा एवढंच काय पकोडा, सामोसा हे भारतीय शब्द आज ऑक्सफर्ड डिक्शनरीत जाऊन बसले आहेत. गेल्याच वर्षी दक्षिण भारतीय “अय्यो” हा शब्द पण ऑक्सफर्डने निवडला. यावर्षी असाच एक अस्सल भारतीय शब्द ऑक्सफर्डने निवडला आहे. हा शब्द बघून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. तसा तो तुमच्या आमच्या जवळचा शब्द आहे भाऊ.
हा शब्द आहे ‘चड्डीज’.....
जंगल जंगल बात चली है पता चला है,
अरे चड्डीज पहन के फुल खिला है, फुल खिला है...
राव, या गाण्यात चड्डी हा शब्द ऐकून त्याकाळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, पण आज २०१९ साली हाच शब्द चक्क ऑक्सफर्ड डिक्शनरीत जाऊन बसलाय. ऑक्सफर्डने या शब्दाला निवडण्यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊया.
‘चड्डीज’चा अर्थ ऑक्सफर्ड डिक्शनरीत “शॉर्ट ट्राउजर, शॉर्ट्स” असा देण्यात आला आहे. या शब्दाचा पहिला वापर Blackwood Edinburgh मासिकात करण्यात आला होता. त्यानंतर नव्वदीत आलेल्या “Goodness Gracious Me“ या काहीशा भारतीय आणि ब्रिटीश धरतीच्या इंग्रजी टीव्ही मालिकेत हा शब्द पहिल्यांदा उच्चारण्यात आला. या मालिकेत एक वाक्य होतं - “'Kiss My Chuddies”. हे वाक्य आणि त्यापाठोपाठ चड्डी जगभर फेमस झाली होती भाऊ. त्यानंतर तो सर्रास वापरला जाऊ लागला. याच कारणाने तो ऑक्सफर्ड डिक्शनरीत सामील करण्यात आला आहे.
(Goodness Gracious Me)
ऑक्सफर्ड डिक्शनरी तर्फे 'Words Where You Are' ही मोहीम चालवण्यात आली होती. ऑक्सफर्डने लोकांना नवीन शब्द सुचवायला सांगितले होते. या मोहिमेला लोकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. लोकांनी सुचवलेल्या शब्दातून काही मोजक्या नवीन शब्दांना ऑक्सफर्ड डिक्शनरीत स्थान मिळालं आहे. अशा प्रकारे मार्चच्या नव्या आवृत्तीत ६५० नवीन शब्द सामील करण्यात आले आहेत. अर्थात यात भारतीय “चड्डीज” पण असणार आहे.
तर मंडळी, ‘चड्डी’ला मिळालेल्या या बहुमानाबद्दल तुम्हाला काय वाटतं ? प्रतिक्रिया आल्याच पाहिजेत भाऊ !!




