f
computer

लॉरेन आणि अॅडवर्ड वॉरेन.....कॉंज्यूरिंग आणि अॅनबेल भयपटांचे खरे हिरो !!

मंडळी, तुम्हाला जर भयपट आवडत असतील तर तुम्हाला कॉंज्यूरिंगची माहिती नक्कीच असेल. सध्याच्या भयपटांच्या रांगेत अॅनबेल आणि कॉंज्यूरिंग युनिव्हर्स पहिल्या क्रमांकावर आहेत. लवकरच या दोन्ही सिरीज मधले पुढील भाग प्रदर्शित होणार आहेत.

हे भयपट ज्यांनी खऱ्या आयुष्यात जगले आणि ज्या स्वतः या गोष्टींचा एक भाग होत्या त्या ‘लॉरेन वॉरेन’ यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी नुकतंच निधन झालं. कॉंज्यूरिंग मध्ये जे प्रसिद्ध जोडपं आपण पाहतो ते लॉरेन आणि त्यांचे पती अॅडवर्ड वॉरेन यांच्यावर आधारित आहे.

चला तर यानिमित्ताने या दोघांच्याही कामावर एक नजर टाकूया.

१९५२ साली दोघांनी मिळून भूत-पिशाच्चावर संशोधनासाठी न्यू इंग्लंड सोसायटीची स्थापना केली होती. कॉंज्यूरिंग मध्ये दाखवलेल्या केसेस याच संशोधनातून तयार झाल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पॅरॉन  फॅमिली. याच केसवर कॉंज्यूरिंगचा पहिला भाग आधारित आहे.

पॅरॉन नावाच्या एका कुटुंबाने इंग्लंडच्या रोड आयलंडवर एक घर घेतलेलं. त्यांना ५ मुली होत्या. नवीन घरात आल्यानंतर काही दिवसांनी घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या. जसे की विचित्र आवाज येणे, घरात कोणीतरी असल्याचा भास होणे. काही दिवसांनी त्यांना एक धक्कादायक गोष्ट माहित झाली. ती म्हणजे या घरात भूतांचा वावर आहे आणि ते या नवीन कुटुंबावर नाखूष आहेत.

पॅरॉन कुटुंबातील कॅरोलीन यांना असा शोध लागला की या एकाच घरात बऱ्याच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे आणि ते सगळे घरात वावरतायत. त्यापैकी त्यांना सर्वात जास्त उपद्रव झाला तो बाथशेबा नावाच्या भुताचा. हे प्रकरण वाढल्यानंतर त्यांनी अॅडवर्ड आणि लॉरेन यांना बोलावलं. पुढे काय झालं ते सांगत नाही कारण आपल्यातील बरेच जणांनीसिनेमा पहिला नसेल, त्यामुळे त्यांच्या आनंदात विरजण नको.

अॅनबेल

कॉंज्यूरिंग सोबतच अॅनबेल सिरीज अंगावर काटा आणणारी आहे. त्या बहुलीबद्दल सोशल मिडीयावर एक एक फोटो पण फिरत असतो. खरी बाहुली पांढरी आणि गोल तोंडाची दाखवली आहे. ही बाहुली वॉरेन यांच्याकडे आली ती १९६८ साली. काही रूममेट्सने त्यांना सांगितलं की या बाहुलीत एक लहान मुलगी आहे. वॉरेन दंपतीने ही बाहुली घेऊन ऑक्युल्ट म्युझियम मध्ये ठेवली. या बाहुलीचं खरं नाव होतं Raggedy Ann.

Amityville Horror

कॉंज्यूरिंग आणि अॅनबेल शिवाय अॅडवर्ड आणि लॉरेन यांच्या शोधावर आधारित Amityville ही सिरीज पण गाजली होती. हे त्याकाळचं एक गाजलेलं प्रकरण होतं. या प्रकरणाने अॅडवर्ड आणि लॉरेन यांना प्रसिद्धी मिळवून दिली. ही गोष्ट आहे १९७६ ची. न्युयॉर्कच्या जॉर्ज आणि कॅथी नावाच्या नवराबायकोने आपल्या घरात भूत असल्याचं सांगितलं होतं. या भुताच्या शोधात असलेल्या संशोधकांमध्ये अॅडवर्ड आणि लॉरेन होते. पुढे जाऊन ही केस खोटी असल्याचा आरोप करण्यात आला पण अॅडवर्ड आणि लॉरेन यांनी ही गोष्ट खरी असल्याचं सांगितलं आहे. याच गोष्टीवर आधारित The Amityville Horror नावाचं पुस्तक पण प्रसिद्ध झालं. पुढे १९७९ ते २०१५ पर्यंत The Amityville Horrorवर अनेक भागांमध्ये फिल्म्स बनल्या आहेत. कॉन्जुरिंगचा दुसरा भाग (२०१६) हा याच गोष्टीवर आधारित होता.

मंडळी, अॅडवर्ड वॉरेन यांचा २००६ साली मृत्यू झाला. २०१३ साली कॉंज्यूरिंग सिरीजची पहिली फिल्म तयार झाली तेव्हापासून लॉरेन वॉरेन या कॉंज्यूरिंग सिरीजसाठी सल्लागार म्हणून काम करत होत्या.

 

मंडळी, या गोष्टी आम्ही फक्त सांगितल्या आहेत, यावर विश्वास ठेवायलाच हवा असं आम्ही म्हणणार नाही. तुम्हीच सांगा, तुमचा भुतांच्या गोष्टीवर विश्वास आहे का ? तुमचा एखादा किस्सा ऐकायला आम्हाला नक्की आवडेल !!

सबस्क्राईब करा

* indicates required