बिल गेट्सचा ५० वर्षांपूर्वीचा रेझ्युमे पाह्यलात का? आताचे CV याहून बरे असतात असं खुद्द बिलचं म्हणणं आहे!!
एकदा का आपण कोणतीही नोकरी मिळवण्याक्षम वयाचे झालो की तेव्हापासून ते कोणतेही प्रमोशन किंवा नवी नोकरी मिळवण्याच्या वयापर्यंत एक गोष्ट आपला पिच्छा कधी सोडत नाही. ती म्हणजे रेझ्युमे. आता रेझ्युमे, बायोडेटा आणि करिक्युलम विटे ही प्रकरणं काय आणि त्यात काय फरक असतो हे नंतर कधीतरी पाहू.
तर, रेझ्युमे ही आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. कॉलेज पूर्ण करून नोकरी मिळेपर्यंतचा मधला काळ आपला सर्वात जवळचा सोबती म्हणजे आपला रेझ्युमे. तो रेज्युमे बनविण्यापासून तर तो ठिकठिकाणी फिरवण्यापर्यंत कित्येक आठवणी रेझ्युमेसोबत आपल्या जुळलेल्या असतात.
आपल्याला अनेकवेळा असेही वाटते की रेझ्युमे घेऊन फिरण्यापेक्षा थेट यशस्वी होता आले असते तर किती भारी झाले असते. पण आपण ज्यांना आयडॉल मानतो त्यांनीही कधीकाळी रेझ्युमे तयार केला असतो. बिल गेट्स नावाच्या जगातील बहुतांश लोकांचा आयडॉल असलेल्या उद्योगपतीने नुकताच त्याचा 'संघर्ष' काळातील रेझ्युमे ट्विट केला आहे.
हा रेज्युमे जवळपास ५० वर्ष जुना आहे. स्वत: बिल मात्र एक गोष्ट मान्य करतो ती म्हणजे आताचे रेझ्युमे हे त्याच्या रेझ्युमेपेक्षा अधिक आकर्षक असतात. ६६ वर्षीय बिल अजूनही त्याच्यातील ह्युमर जपून आहे याचा पुरावा वेळोवेळी मिळत असतो. हा रेझ्युमे ज्यावेळी बिल हॉवर्डमध्ये पहिल्यावर्षी शिकत होता तेव्हाचा आहे. या रेझ्युमेवर त्याचे नाव दिसते- विल्यम एच गेट्स!! आज अब्जाधीश असलेल्या बिलने यात त्याने केलेल्या कोर्सेसची यादी दिली आहे. यात ऑपरेटिंग सिस्टम्स स्ट्रक्चर्स, डाटाबेस मॅनेजमेंट, कंपायलर कन्स्ट्रक्शन आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स असे कोर्सेस त्याने केल्याचे तो नोंदवतो.
एक गोष्ट मात्र नक्की की हा रेझ्युमे बघितल्यावर बिल इतरांपेक्षा न्यारा होता याची खात्री पटते. PDP-1, PDP-8,PDP-10, PDP-11 अशा आर्किटेक्चर्सवरती त्याने काम केले होते. तो Fortran, COBOL, Algol, Basic अशा तत्कालिन प्रमुख भाषांवर त्याला असलेले प्रभुत्व नमूद करतो. हा रेझ्युमे तयार केला त्यावेळी बिलचे वय १८ वर्ष होते. त्याला नोकरीचा देखील अनुभव त्यावेळी होता. टीआरडब्ल्यू सिस्टम ग्रुपसोबत सिस्टम प्रोग्रामर म्हणून त्याने काम केले होते.
बिलने रेझ्युमेमध्ये नोंद केलेली अजून एक विशेष गोष्ट म्हणजे तो लेकसाईड स्कुलमध्ये को-ओनर म्हणून त्याने केलेले काम. ट्रॅफिक इंजिनियर्सच्या माध्यमातून ट्रॅफिक फ्लोचे आकलन करण्यासाठी एक सिस्टम त्याने डिझाईन केली होती हे देखील हा रेझ्युमे बघिल्यावर समजते.
बिल गेट्स हा अफलातून माणूस आहे आणि तो आज तयार झाला नाही तर त्याचा पाया लहानपणीच रचला गेला होता. याचा अनुभव या निमित्ताने सर्वाना आला आहे.
उदय पाटील




