computer

महेश मांजरेकरांची सई कलाकार नसती तर कोणत्या क्षेत्रात गेली असती? वाचा तिची मुलाखत..

प्रसिद्ध अभिनेता, चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांची मुलगी सईने दबंग ३ मधून सलमान खानची नायिका म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. 

सई मांजरेकरचा सिनेसृष्टीत प्रवेश आणि आईबाबांचा पाठिंबा-

सईने बोभाटाचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम सोबत गप्पा मारताना सांगितले की तिची पूर्वीपासूनच सुप्त इच्छा होती ‘हिरॉईन’ होण्याची, परंतु तिने हल्लीहल्लीच पालकांकडे ती इच्छा व्यक्त केली. त्यांना कल्पना होतीच व त्यादृष्टीने त्यांनी पावलं उचलायला देखील सुरुवात केलेली होती. जेव्हा सईने आपली आई, अभिनेत्री मेधा मांजरेकरकडे, अभिनेत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा ‘सलमान खान तुला त्यांच्या ‘दबंग ३’ मध्ये घेण्याचा विचार करीत आहे’ असे सांगितले. खरंतर सईची लहानपणापासूनच ‘सलमान खानची नायिका’ होण्याची  मनीषा होती. ती इतक्या सहजपणे पूर्ण होईल असे वाटले नव्हते. परंतु अजून काही नक्की नव्हते म्हणून ती मनात मांडे खात बसली नाही. सलमान खानकडे सिनेसृष्टीचा प्रचंड अनुभव आहे. तसेच त्याची व्यवसायदृष्टी कमालीची उत्तम आहे. त्यामुळेच त्याने सर्व बाबींचा शहानिशा करूनच सईला चित्रपटात घेण्याचे ठरविले. तसा त्याने सईला फोन केला तेव्हा तिला आकाश ठेंगणे झाले होते. जेव्हा तो फोन आला तेव्हा सईचा भाऊ सत्या घरीच होता. ही बातमी कळल्याबरोबर तो तडक रूमच्या बाहेर गेला. सईला आश्चर्य वाटले परंतु काही सेकंदातच तो परतला ते दोन मोठाले चॉकलेट्सचे बार्स घेऊनच. ते देत त्याने तिचे तोंड गोड करत अभिनंदन केले. सईसाठी तो खूप भावनिक क्षण होता.

सलमान खान- सईचा मार्गदर्शक!

सई सलमान खानला पाहातच लहानाची मोठी झालीय. तिचे वडील महेश मांजरेकर सलमान खानच्या अनेक चित्रपटांतून अभिनय करीत आले आहेत. त्यामुळे मांजरेकर-खान कुटुंबांचा घरोबा आहे. पनवेलमधल्या फार्म हाऊसवर त्याने सईला सायकल चालवायला शिकविले आहे आणि आता आयुष्याची गाडी हाकायलाही शिकवत आहे. चित्रपट साईन केल्यानंतर सलमान सईचा ‘मेंटॉर’ आहे हे चित्रपटाच्या प्रोमोशन्सवेळी दिसून आले. सलमानबाबत व्यक्त होताना ती म्हणाली ‘इतकी वर्ष चित्रपटसृष्टीत काम करूनही ते अतिशय मेहनत करताना दिसतात. अत्यंत प्रोफेशनल रीतीने वागतात व त्यामुळे त्यांची सिनेमावरची निष्ठा भक्तिभावपूर्ण आहे हे नक्कीच दिसते. तसेच त्यांच्या सान्निध्यात असलेले सर्व कलाकार उत्तमोत्तम काम करण्यास उद्युक्त होतात’. सलमानसोबत हिरॉईन म्हणून ‘लाँच’ होण्याबाबत सई म्हणाली, "सलमान सरांसोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण हे स्वप्नवत आहे. कित्येक अभिनेत्री त्यांच्यासोबत काम करण्यासाठी आतुर असतात. मला पदार्पणातच ही संधी मिळाली या सौभाग्याबद्दल मी ईश्वराची ऋणी राहीन. माझ्या रोलबद्दल सांगायचं तर मी एका गावातील मुलीचा रोल केलाय. तसं पाहिलं तर मी पक्की मुंबईकर, शहरी मुलगी. परंतु माझ्या व्यक्तिमत्वाच्या विरुद्ध भूमिका साकारताना मला माझा थिएटरचा अनुभव कामी आला. तसेच मला लोकांना ‘स्टडी’ करायला आवडते, जे विभिन्न भूमिका साकारताना उपयोगी पडते".

सईचे नृत्य आणि अभिनय गुण-

सई मांजरेकर एक अप्रतिम नृत्यांगना आहे. तिने पाश्चिमात्य तसेच भारतीय शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच तिने ‘बॉलिवूड डान्सिंग’ चे प्रशिक्षण  प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून घेतले आहे. नृत्यातही अभिनय असतो व त्याचाही फायदा तिला कॅमेरासमोर झाला हे निश्चित. सलमानच्या ‘मेगा-स्टारडम’ चे वलय भल्याभल्यांना भयचित वाटते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना सई बोलली, "मी खरंतर सलमान सरांना लहानपणापासून ओळखते. त्यामुळे तो ‘कम्फर्ट-झोन’ माझ्याकडे असल्यामुळे कुठलंही दडपण नव्हतं. माझा पहिला शॉट त्यांच्यासोबत होता हे माझ्यासाठी खूप दिलासादायक होतं. त्यांच्यासोबत काम करणे ही पर्वणी आहे व तो क्षण मी आयुष्यभर कधी विसरणार नाही. त्यांच्या वागण्यातून कळते की कठोर परिश्रमास पर्याय नाही. ते बरेच मस्तीखोर आहेत व सेटवरचे वातावरण खेळीमेळीचे ठेवतात. परंतु एकदा कॅमेरा ‘ऑन’ झाला की आपले काम अत्यंत तन्मयतेने करतात".

कलाकार आईबाबांची कलाकार सई-

सईचे आई-वडील कलाकार आहेत व त्यांच्या अनुभवातून शिकण्यासारखे खूप काही आहे असे ती मानते. ‘ॲक्टिंग इस रिॲक्टिंग’ असे तिचे बाबा सांगतात तर आई ‘डोळ्यातून अभिनय करावा’ असे तिला सांगत असते. तिची आई चित्रीकरणादरम्यान हजर असायची व एखादा सीन ठीक वाटला नाही तर ती तसे स्पष्टपणे सईला सांगायची. या चित्रपटात मेधा मांजरेकर सईच्या मावशीच्या रोलमध्ये आहेत. सईने लहानपणीची सलमानसोबतची आठवण सांगितली, "मी सात-आठ वर्षांची असेन. बाबांचे ‘बॉडीगार्ड’ चे शुंटिंग चंदीगडला होते व मी त्यांच्यासोबत चालले होते. विमानात मला भूक लागली, तीही गोड खाण्याची. सर्वांची जेवणं झाली होती त्यामुळे विमानात खायला काहीच नव्हते व त्यामुळे माझी चिडचिड झाली होती. काही वेळाने सलमान सरांनी, माझा त्रागा त्यांच्या कानावर गेला होता, माझ्यासमोर ‘तिरामिसु’ केक ठेवला तेव्हा माझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता. माझ्यासाठी त्यावेळी ते जादूगार होते’. त्यांना पाहून असे नेहमी वाटते की ‘तुम्हाला स्क्रीनवर चांगले दिसायचे असेल तुम्ही आतून सुंदर असायला हवं".

सईची प्रेरणास्थानं-

आवडत्या कलाकारांबद्दल सांगताना सई म्हणाली, "मला स्मिता पाटील व वहिदा रहमान यांची अदाकारी खूप भावते. हल्लीच्या अभिनेत्रींनपैकी मला सोनाक्षी सिन्हा, आलिया भट, दीपिका पदुकोण आवडतात. (थोडेसे लाजत) माझा सर्वात लाडका नट आहे वरुण धवन". तिला तिच्या आजी व आईचा आवडता देव आनंद देखील आवडतो. फावल्या वेळात सई अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट, वेब सिरीज, शोज बघते परंतु ती बॉलिवूड चित्रपटाची प्रचंड मोठी ‘फॅन’ आहे. कलाकार नसती तर काय झाली असती असे विचारल्यावर ती आत्मविश्वासाने म्हणाली ‘गणितज्ञ!! खरंच. गणित नेहमीच माझा आवडता विषय होता. माझे बरेच नातेवाईक गणिताचे प्राध्यापक आहेत, होते. आमच्या घराण्यात ती जणू परंपराच आहे. अभिनेत्री बनण्यापूर्वी माझ्या आईलादेखील गणिताची प्रोफेसर व्हावयाचे होते’.

सईला आपले वडील महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली काम करायचे आहे आणि तिच्या रूपात चित्रपटसृष्टीला एक सुंदर, चतुरस्त्र अभिनेत्री मिळाली आहे हे मात्र नक्की.

 

लेखक : कीर्तिकुमार कदम (बोभाटा प्रतिनिधी)