फिनलंडमधली फोन फेकण्याची स्पर्धा!! एकाने तर नीरज चोप्राच्या भाल्यापेक्षा दूर मोबाईल फेकला म्हणे!!
आधी घरचे सारखा मोबाईल वापरण्यावरून रागवायचे. अगदी पोट दुखतंय म्हटलं तरी "वापर अजून मोबाईल!" असं विचित्र उत्तर मिळायचं. किंवा जन्मखूण म्हणून "एका हातात सतत फोन"लिहा असे जोक्सही भरपूर ऐकले असतील. पण तोही काळ बदलला आणि आता आई-आजीला जरा व्हाटसअप कमी कर, बाबांना जेवताना मोबाईलवर मॅच पाहू नका असं सांगायची वेळ आली.
त्यातही सारखा मोबाईल वापरण्यावरून घरच्यांचे टोमणे ऐकावे लागले, कुणीतरी काही तरी बिनडोक व्हाट्सअप फॉरवर्ड सेंड केला, कुणी उगीचच अति गोड कमेंट देऊन किंवा तिरकस कमेंट देऊन सतवायला लागलं, बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडने सगळीकडे ब्लॉक करून टाकलं, महत्वाच्या वेळी महत्वाचा संदेश देण्यासाठी कुणाला फोन लावत असू आणि तो फोन आउट ऑफ रेंज किंवा स्वीच ऑफ असेल तर, अशा बऱ्याच प्रसंगी तुम्हाला फोन फेकून देऊ वाटत असेल हो ना? किंवा तुम्ही फेकला देखील असाल. पण तुम्ही तो असाच फेकला असाल ना की त्याला काही फारशी इजा होऊ नये. कारण राग क्षणिक असला तरी फोन जान से प्यारा आहे याचं भान असतं. समजा फोन फेकण्याची जर राष्ट्रीय स्पर्धा भरवली तर?
"काहीही काय लिहिताय? असली चक्रम स्पर्धा कोण कशाला भरवेल?" असा प्रश्न तुम्हाला पडला तर नवल नाहीच. आपल्याकडे अशा काही स्पर्धा भरवल्या आत नाहीत त्यामुळे तुम्हाला ही कल्पना एकदम खुळचट वाटणे साहजिक आहे. पण वाचकहो, जगातल्या एका देशात अशी ही खुळचट, येडचाप वाटणारी स्पर्धा भरवली जाते. तो देश म्हणजे फिनलंड!
फक्त टाईमपास म्हणून किंवा लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून हा खेळ खेळला जात नाही, तर हा खेळ त्यांच्या राष्ट्रीय खेळाचा भाग आहे. फिनलंडच्या राजधानीत हा खेळ खेळण्यासाठी अक्षरश: हजारो लोक जमलेले असतात आणि पाहण्यासाठी तर त्याहून अधिक लोक जमलेले असतात. इतर खेळांप्रमाणेच या खेळाचेही काही नियम आहेत आणि प्रत्येक स्पर्धकाने हे नियम गंभीर पूर्वक लक्षात घेऊन त्यांच्याशी प्रमाणिक राहूनच खेळायचं आहे.
या स्पर्धेसाठी वापरायचे फोन हे खेळाडूंनी आणायचे नसतात. हे फोन दान दिलेले किंवा या खेळाला प्रोत्साहन मिळावे म्हणून फंडिंगद्वारे मिळवलेले असतात. खेळात भाग घेण्यासाठी आलेल्या स्पर्धकांनी यातील एक फोन स्वतःहून निवडायचा असतो. काहींच्या मते जड फोन जास्त दूर जातात, तर काहींच्या मते हलके फोन जास्त दूर जातात. त्यामुळे कुणी कुठला फोन घ्यावा याचे स्वातंत्र्य त्यांनाच दिले जाते.
या स्पर्धेचा निकाल ठरवण्यासाठी एक अधिकृत पॅनेल परीक्षकाचे काम करते. या पॅनेलने दिलेला निकाल हा अंतिम असतो आणि त्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. त्यामुळे अंतिम निकालाला कुठलाही स्पर्धक आव्हान देऊ शकत नाही. २००० पासून फिनलंडमध्ये ही स्पर्धा भरवली जाते. आतापर्यंतचा सर्वात जास्त पल्ला – ९७.७३ मीटर्सचा होता. आपल्या नीरज चोप्राचा भालादेखील ८८.०७मीटर्सचा होता. आता बोला!!
हा सगळा प्रकार हास्यास्पद वाटत असला तरी तो तितक्याच गंभीरतेने पार पाडला जातो. आता तुम्ही म्हणाल फेकलेल्या फोनमुळे किती ती पर्यावरणाची हानी होत असेल? तर हेच आपल्या नागरिकांना पटवून देण्यासाठीच उपहासात्मक पद्धतीने ही स्पर्धा भरवली जाते. या खेळासाठी जे फोन वापरले जातात ते रिसायकल करून पुन्हा वापरात आणले जातात.
आपण टाकून देत असलेला इ-कचरा पर्यावरणासाठी घातक असतो त्यामुळे तो तसा न फेकता त्याचा पुनर्वापर करावा हा संदेश देण्यासाठीच फिनलंड सरकार ही नसती उठाठेव करत असते.
फिनलंड सरकारचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला? कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा.
मेघश्री श्रेष्ठी




