computer

धोनी, गंभीर, उतप्पा, आगरकर... २००७ वर्ल्डकपचे खेळाडू सध्या काय करतात?

आज जगात T-20 क्रिकेटचा बोलबाला आहे. २००७ साली पहिल्यांदा या T-20 क्रिकेटची सुरुवात झाली होती. त्याचवर्षी झालेल्या पहिल्याच वर्ल्डकपमध्ये भारताने विजय मिळवत इतिहास घडवला आहे. त्यावेळी संपूर्ण टीम ही नवखी होती. त्यातले काही पुढे जाऊन क्रिकेटचे मोठे शिलेदार ठरले, तर काही विशेष चमक दाखवू शकले नाहीत. आज आपण तेव्हाचे सर्व खेळाडू काय करतात हे जाणून घेणार आहोत.

१) महेंद्र सिंग धोनी

सध्या कॅप्टन कूल असणारा माही पहिल्यांदाच T-20 वर्ल्डकपमध्ये कॅप्टन झाला होता. या विजयाने त्याचा सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये कॅप्टन बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता पुन्हा एकदा निवृत्त झाल्यावर तो संघाला विजयी करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून दाखल झाला आहे.

२) वीरेंद्र सेहवाग

२००७ T-20 वर्ल्डकपनंतर २०११ वनडे वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करून संघाला विजयी केल्यावर सध्या वीरुदादा निवृत्तीचा आनंद घेत आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये वीरु नेहमी दिसतो आणि भन्नाट किस्से सांगून जुन्या काळात लोकांना घेऊनही जातो.

३) गौतम गंभीर

गंभीर सध्या राजकारणात उतरून खासदार झाला आहे. कॉमेंट्रीबॉक्समध्ये पण तो नेहमीच दिसतो. अधूनमधून भडक व्यक्तव्ये करून तो चर्चेत येत असतो.

४) रॉबिन उतप्पा

पुढे जाऊन बॅटिंग करणारा खेळाडू म्हणून ओळख असणारा उतप्पा फॉर्मात असला म्हणजे जबरदस्त बॅटिंग करत असे. सध्या तो चेन्नईकडून आयपीएल खेळतो. अजूनही त्याचा फॉर्म कमी झालेला नाही.

५) रोहित शर्मा

सध्या रोहितदादा मोठ्या फॉर्मात आहेत. डोके भनकले म्हणजे पठ्ठ्या २०० च्या खाली धावा करत नाही. सध्याचा काळ हा रोहित शर्माचा सुवर्णकाळ म्हणता येईल.

६) युवराज सिंग

२००७ च्या वर्ल्डकपचा खरा हिरो होता तो युवराज सिंग. ६ बॉल्सवर ६ सिक्स करून त्याने जगात हवा केली होती. सध्या तो भारताकडून तर निवृत्त झाला आहेच, पण २०१९ नंतर आयपीएल पण खेळत नाही. काही छोट्या मोठ्या लीग सामन्यांमध्ये मात्र तो दिसतो.

७) दिनेश कार्तिक

हा भाऊ कधीकधी जबरा बॅटिंग करायचा, पण संघात साक्षात धोनी विकेटकिपर म्हणून असल्याने त्याला विशेष संधी मिळत नाही. सध्या तो आयपीएलमध्ये कोलकाताकडून खेळतो.

८) इरफान पठान

इरफान पठाण २००७ वर्ल्डकपमधील फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. सध्या तो कॉमेंट्रीबॉक्समध्ये दिसतो.

९) हरभजन सिंग

भज्जी सध्या कोलकाता कडून आयपीएल खेळतो. पण त्याला तिथेही विशेष संधी मिळत नाही. सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये तो कॉमेंट्री करणार आहे.

१०) युसूफ पठाण

युसूफ पठाण २०१९ पर्यंत आयपीएल खेळत होता. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यावर तो सध्या अबुधाबी T-10 लीगमध्ये मराठा अरेबियन्स या संघाकडून खेळणार आहे.

११) जोगिंदर शर्मा

हा खेळाडू तोच आहे ज्याच्या हातात भारताचा पूर्ण वर्ल्डकप होता. फायनल सामान्याची शेवटची ओव्हर यानेच टाकली होती. सध्या तो क्रिकेट सोडून हरियाणा पोलीसमध्ये डीएसपी म्हणून कार्यरत आहे.

१२) आरपी सिंग

यूपीचा आरपी सिंग २०१८ साली निवृत्त झाला आहे. सध्या तो कॉमेंट्री करतो. तो अबुधाबी लीगमध्ये खेळण्याच्या बातम्या येत होत्या.

१३) श्रीशांत

हा खेळाडू कदाचित सर्वात जास्त वादग्रस्त असेल. हरभजनची थप्पड असो, रिॲलिटी शो असो की मॅच फिक्सिंग!! वादाशी त्याचे जवळचे नाते होते. सध्या भाऊ शांत आहे आणि केरळकडून खेळतो.

१४) अजित आगरकर

या संघात आगरकर पण होता. तसा अजित आगरकर खूप आधी निवृत्त झाला आहे. सध्या तो कॉमेंट्री करत आहे.

१५) पियुष चावला

पियुष चावला सध्या आयपीएलमध्ये दिसतो. मुंबई इंडियन्सकडून तो या सीझनमध्ये खेळला आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required