computer

F.R.I.E.N.D.S: २५ वर्षांनंतरही तितकीच ताजीतवानी असलेली मैत्री आणि मित्रांची गोष्ट!!

रॅचेल, रॉस, जॉय, फिबी, मोनिका आणि चॅन्डलर ही नावे माहीत नाहीत असा इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचा विद्यार्थी सापडणे कठीण आहे. अर्थात इतर शाखांचे विद्यार्थी ही मालिका पाहात नाहीत असं आमचं काही म्हणणं नाही.. काय होतं या सहा जणांच्या ग्रुपमधे ज्यामुळे केवळ अमेरिकाच नाही तर अख्ख्या जगातल्या तरुणाईला फ्रेंड्स (F.R.I.E.N.D.S.) नावाच्या सीरियलने वेड लावलं?

१० सीझन्स आणि २३६ एपिसोडस असलेल्या या सीरियलची अनेकांनी एकदोन नव्हे, तर अनेक पारायणे केली. आख्खं कॉलेज लाईफ ही सीरियल बघतच पूर्ण करणारेही अनेकजण आहेत. कॉलेज संपलं तरी ही सीरियल काही कोणाच्या मनातून उतरली नाही. आजही अनेकजण ऑफिस किंवा कॉलेजच्या रूटीनमधून वेळ काढून फ्रेंड्सचा एखादातरी एपिसोड पाहतात. या मालिकेतल्या ग्रुपसारखा आपलाही एखादा ग्रुप असावा असं प्रत्येकाला वाटत असतं.
 

अमेरिकेतील वेगवेगळ्या भागातून आलेल्या आणि कामानिमित्ताने न्यूयॉर्कमधे दोन अपार्टमेंट्समधे राहणाऱ्या सहाजणांची हि स्टोरी. त्या अपार्टमेंट्सच्या खालीच असणारे सेंट्रल पर्क नावाचे कॉफी शॉप हे त्यांचे भेटण्याचे ठिकाण. कॉफी किंवा मफिन्स घेत अफाट सेन्स ऑफ ह्युमर आणि उपहासाने एकमेकांची कळ काढत बसायचं हा त्यांचा आवडता उद्योग. परफेक्ट कॉमेडी टायमिंगमुळे यातील कॅरेक्टर्स एवढं वेड लावतात की यातलं एकही पात्र अनावश्यक वाटत नाही. मालिका बघता बघता आपण कधी त्यांच्या अपार्टमेंटमधे राहायला जातो ते सुद्धा आपल्याला कळत नाही.

परंतु केवळ सेन्स ऑफ ह्युमर आणि सरकॅझमपुरतीच ही सीरियल मर्यादित नाही. आजच्या काळातील मैत्रीची सर्वोत्तम व्याख्या या सीरियलने निर्माण केली. त्यामुळेच २५ वर्षानंतरही ही मालिका तेवढ्याच उत्सुकतेने आणि आवडीने पाहिली जाते.  नितळ आणि खरेपणाने एकमेकांशी राहणे, स्वतःच्या आधी मित्रांचा विचार करणे, मित्रासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणे, त्याच्या दुःखात त्याला त्याच्या कुटुंबाची आठवण देखील येणार नाही एवढं त्याच्याशी समरस होऊन जाणे या अशा अनेक कारणांमुळे ही सीरियल इतर सीरिअल्सपेक्षा खूप वेगळी ठरते.

ही सीरियल म्हणजेच मैत्री आहे. हिच्या पलीकडे काहीही नाही. २५ नाही तर पुढील कमीत कमी २५० वर्षं तरी हीची पारायणे आम्ही करत राहू आणिआयुष्यात आलेल्या सर्व मित्रमैत्रिणींना म्हणत राहू

"I will be there for you
because you are there for me too...!!"

#_25_years_of_friends

 

लेखक : सौरभ पारगुंडे

सबस्क्राईब करा

* indicates required