computer

गुप्ता बंधू- सहारनपूर, दक्षिण आफ्रिकेतलं प्रचंड यश, झुप्ता ते इंटरपोलची रेड नोटिस!! वाचा पूर्ण प्रकरण काय आहे..

सुरु झालेल्या प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच! तेजाचं भांडार असलेला सूर्य देखील माथ्यावर कायम तळपत नाही. अस्ताला जातोच. मग सत्ता, अधिकार यांची गोष्ट वेगळी असणार आहे का? या आज भेटू या अशा बंधूंना ज्यांनी संघर्ष करुन अधिकार प्राप्त केले, पण शिखरावर जाऊन नंतर होणारे अधःपतन त्यांना थांबवता आले नाही.
ही कहाणी आहे तीन भावांची. अजय, अतुल आणि राजेश गुप्ता!

उत्तर प्रदेशच्या सहारनपुर भागात रानी बाजार येथे एका मोडकळीस आलेल्या इमारतीत गुप्ता बंधू राहात होते. ते एकदम जगभरातल्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकले. मात्र ही काही अभिमानाची गोष्ट नव्हती. चला बघू या त्यांचा शून्यातून विश्व आणि पुन्हा विश्वाकडून शून्याकडे झालेला प्रवास.

शिवकुमार गुप्ता, अजय, अतुल आणि राजेशचे वडील, हे सहारनपूर येथे एक छोटी ‘गुप्ता अँड कंपनी’ चालवत होते. साबणचुरा विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. त्याचबरोबर एसकेजी मार्केटिंगतर्फे मादागास्कर आणि झांजिबार येथून मसाले आयात करून विकण्याचा देखील व्यवसाय होता. १९८० च्या दरम्यान शिवकुमार गुप्ता यांना दक्षिण आफ्रिका हा देश व्यावसायिकदृष्टया स्थिरसावर होण्यासाठी योग्य वाटला. त्यांच्या निरिक्षणानुसार त्यांनी काही आडाखे बांधले नि मुलांना सांगितले की काही वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकादेखील अमेरिकेइतकाच बलशाली होईल. त्यांच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवून अतुल गुप्ताने दक्षिण अफ्रिकेच्या भूमीवर व्यावसायिक जम बसवायचा या हेतूने पाऊल टाकले.

अतुलने संगणक विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केला होता. संगणक बनवणे, दुरुस्त करणे, हार्डवेअरचा मेंटेनन्स हे सर्व तो अभ्यासक्रमात शिकला होता. अतुलने अफ्रिकेत पाऊल ठेवले तो काळ असा होता जेव्हा आफ्रिकेने वर्णद्वेषातून बाहेर पडत नवे विचार अंगीकारण्याची तयारी दर्शवली होती. बाहेरून येणाऱ्यांसाठी जाचक अटी, बंधने नव्हती. त्यामुळे अतुल पाठोपाठ अजय आणि राजेश यांनीदेखील आफ्रिकेत जाऊन नशीब आजमवायचे ठरवले. १९९३ मध्ये अतुल गुप्ताने सहारा कम्प्यूटर्सची स्थापना केली. २०१६ मध्ये या कंपनीचा वार्षिक टर्न ओव्हर २२ मिलियन डॉलर्स होता आणि जवळजवळ १०,००० कर्मचारी तेथे काम करत होते. आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांचा मुलगा डुडुझेन आणि गुप्ता बंधूमधील शेंडेफळ राजेश यांची मैत्री होती आणि ते व्यावसायिक भागीदार देखील होते.

राजकारणात सर्वोच्च पद भूषवणाऱ्या कुटुंबियांशी जवळीक निर्माण झाल्यावर नशीब बदलले असे म्हणायला वाव नक्कीच आहे. २०१५/१६ मध्ये सहारा कंप्यूटर्सच्या एका कार्यक्रमात अतुल आणि झुमा यांची भेट झाली आणि दोन कुटुंबे एकमेकांच्या जवळ आली. सहारनपूरमध्ये छोटे व्यावसायिक म्हणून ओळख असलेल्या गुप्ता बंधूनी दक्षिण अफ्रिकेत चांगलेच पाय रोवले. झुमा यांच्याशी वाढत गेलेल्या सलोख्याच्या संबंधाने राजकीय क्षेत्रात देखील अप्रत्यक्षपणे त्यांचा दबदबा निर्माण होऊ लागला. केवळ संगणकच नव्हे, तर इतरही अनेक क्षेत्रांत गुप्ता या नावाने हातपाय पसरले. विमान प्रवास, ऊर्जा, खाणी, तंत्रज्ञान, माध्यमे अशा अनेक विषयात गुप्ता बंधूनी प्रवेश केला. झूमा पाठोपाठ गुप्ता हे नाव इतके अनिवार्यपणे जोडले जाऊ लागले की राजकीय समीक्षकांनी दोहोंच्या नावांचे एकत्रीकरण करुन ‘झुप्ता’ हे नवीनच नाव तयार केले.
त्यानंतर अशा चर्चा ऐकू येऊ लागल्या की गुप्ता पडद्यामागे राहून राजकीय निर्णयात देखील हस्तक्षेप करत आहेत. २०१६ मधील गंभीर राजकीय मतभेदानंतर त्या वेळचे उप-अर्थमंत्री मॅकबेसी जोनास यांनी असे आरोप केले की सहाराचा उद्योग वाढवण्यास साहाय्य केल्यास अर्थमंत्री बनवू असे गुप्ता बंधूंनी त्याला आमिष दाखवले होते. यावरून हे सिद्ध होते की गुप्ता बंधूंचे आफ्रिकेतील राजकीय घडामोडींवर नियंत्रण होते. ते कोणाला मंत्री बनवू शकत होते किंवा मंत्रीपदावरून काढू शकत होते. अर्थात अजय गुप्ताने हे आरोप फेटाळले. आपण कधीही मॅकबेसी जोनास यांना भेटलो नाही असे वक्तव्य त्याने केले. त्याच काळात माजी अर्थमंत्री प्रवीण गोर्धन यांनी आरोप केले की झूमा सरकारमधून त्यांच्या झालेल्या हकालपट्टीसाठी फक्त गुप्ता बंधू जबाबदार आहेत.

 

गुप्ता बंधूंच्या हालचालींवर कळत नकळतपणे कडक नजर ठेवली गेली. त्यातूनच उघडकीस आलेल्या एका गोष्टीने गुप्ता बंधू पुन्हा चर्चेत आले. एका कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठीचे पाहुणे घेऊन चाललेले एक विमान दक्षिण आफ्रिकेची एक राजधानी प्रिटोरिया येथील वॉटरक्लूफ विमान तळावर उतरवण्यात आले. हा तळ राजनीतिज्ञ आणि राज्याचे प्रतिनिधिमंडळ यांच्यासाठी राखीव होता. २०१७ मध्ये जवळजवळ एक लाख इमेल्स लीक झाले. या इमेल्समध्ये गुप्ता बंधूंच्या झुमा सरकारवर असणाऱ्या नियंत्रणाची माहिती होती. परिणामी गुप्ता बंधूंना मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. झूमा सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव संमत झाला आणि जेकब झूमा अध्यक्षपदावरून पायउतार झाले.
यानंतरच गुप्ता बंधूंनी दुबईला पलायन केले. सहारासारख्या खाजगी संस्थेमार्फत हातमिळवणी करुन राजकीय निर्णयप्रक्रियेवर प्रभाव टाकून राष्ट्राच्या संपत्तीचा अपहार करण्याच्या आरोप गुप्ता बंधूंवर करण्यात आला. युनायटेड अरब अमिरातीबरोबर प्रत्यार्पण करार झालेला नसल्याने गुप्ता बंधूंना ताब्यात मिळवण्याचे दक्षिण आफ्रिकेचे प्रयत्न फलद्रुप होत नव्हते. यु.ए. ई. बरोबरच्या त्यांच्या वाटाघाटींमधून काहीच हाती लागत नव्हते. अखेर आफ्रिकेने संयुक्त राष्ट्रसंघाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली.


 

अखेर जून २०२१ मध्ये करारास मंजूरी मिळून प्रत्यार्पण प्रक्रियेला सुरुवात झाली. जुलै २०२१ मध्ये इंटरपोलने तीन पैकी दोन बंधू अतुल आणि राजेश यांच्यावर दक्षिण आफ्रिकेतील भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात सहभाग असल्याच्या आरोपावरून कायदेशीर कारवाईची मागणी केली. जवळ जवळ एका वर्षानंतर युनायटेड अरब अमिरातीने राजेश आणि अतुल गुप्ताला अटक केली.
पेरावे ते उगवते म्हणतात. कष्ट आणि प्रामाणिकपणा तुम्हाला उंचीवर नेऊन ठेवतो. पण शिखरावर पोहचल्यावर ते स्थान टिकवण्याचे आव्हान भल्याभल्यांना पेलत नाही. सत्तेचा उन्माद, अधिकाराचा माज आणि अधिकाधिक संपत्तीचा हव्यास जेव्हा तुमच्या विवेकाशी तडजोड करायला भाग पाडतात तेव्हा तुमचे पतन निश्चित आहे!
इतिहास साक्षी आहे!

सबस्क्राईब करा

* indicates required