computer

मराठेशाहीतील सण आणि उत्सव-पेशवाईतील रंगोत्सव

होलिकोत्सवः होळी ...
पेशवेकाळात हा सण कनिष्ठ- वरिष्ठ जातीची माणसे एकत्र येऊन साजरा करीत असत.
शनिवारवाड्यात साजरा होणारा पेशवाईतील हा एक महत्वाचा उत्सव असे. हा उत्सव पाच दिवस चालत असे. या पाच दिवसात लोकांना मुक्तपणे वागण्याची संधी मिळत असे.करमणुकीचा आनंद लुटत असताना शिविगाळीचे प्रकारही घडत असत.शनिवारवाड्यात संगीत, गायन-वादन, नर्तन यांचे कार्यक्रम होत आणि त्यास अनेक मंडळी हजर असत.भवई गुजराथी आणि वेंकटनरसी हे त्यावेलछे दोन प्रसिध्द गायक होते. सवाई माधवरावांच्या काळात (१७७४-१७९५) हा सण कसा साजरा केला जात असे , याच्या काही नोंदी आढळतात.

" हुताशनीचे दिवशी श्रीमंत दिल्ली दरवाजेचे बाहेर सायंकाळी दोन घटिका रात्री होळीजवळ येऊन दर्शन घेऊन दरवाजेचे वर एक क्षण बसून तमाशा पाहून मग आत गेले" याच नोंदीत पुढे असे म्हटले आहे की, "वाघ बकरीचा खेळ, डफ गाणे, सोंगाड्याचे खेळ, पोरांचे नाच वगैरे होत आणि श्रीमंत काही वेळा ते पाहण्यास येत."
शिमग्याचा शेवट रंगपंचमीने होत असे. पिचकारीने केशरी रंग उडवून आणि फुलांच्या पाकळ्या , गुलाल परस्परांवर फेकून हा सण साजरा करीत.सामान्यतः शनिवार वाड्यात आणि कधी कधी हिरा बागेत अन्यथा सरदारांच्या वाड्यात महत्वाच्या व्यक्तींच्या समवेत श्रीमंत स्वतः रंगपंचमीचा खेळ खेळत असत. शिंदे , होळकर, भोसले आणि क्वचित प्रसंगी कंपनीचे अधिकारी या रंगपंचमीच्या उत्सवास आमंत्रित म्हणून उपस्थित राहत.कलावंतिणीचे ताफे नृत्य सादर करण्यासाठी येत असत. रात्री खेळ, डफगाणे, पोरांचे नाच , कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, शाहिरी गाणे तमाशे इत्यादी कार्यक्रम होत. श्रीमंत आणि त्यांचे आप्तेष्ट या कर्यक्रमांना हजर राहत."

महादजी शिंद्यांचे वास्तव्य उत्तरेत झाले असल्याने तिथल्या सारखीच मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात पुण्याची रंगपंचमी साजरी करावी, अशी त्यांची इच्छा होती. आणि त्यानुसार १७९२ साली सवाई माधवराव पेशव्यांकडून संमती मिळवली.. वस्तुतः त्यावर्षीची रंगपंचमी होऊन गेली होती. तरी देखील शिंद्यांसारख्या मातब्बर सरदारांच्या विनंतीस मान देणे पेशव्यांना आवश्यक वाटले.श्रीमंतांनी पुण्यातील सर्व सरदारांना रंगपंचमीची तयारी करण्याचा आदेश दिला.शिंद्यांनी श्रीमंतांना वानवडीस रंग खेळण्यास येण्याचे निमंत्रण दिले होते
" सरकारची स्वारी सायंकाळचे दहा घटकास वानवडीस जाण्यास अंबारीत बसली मागे खवासखान्यात महादजी शिंदे,आप्पा बळवंत बसले, वाडा डावा घालून सरकार स्वारी बुधवारातून ,कापडआळीने आदितवारात हरिपंत तात्यांचे वाड्याशी येईपावेतो वाटेने सरकारचे लोकांनी रंग करून ठेवला होता.त्यांनी एकच गर्दी रंगांची केली. त्या रंगाचे योगाने चिखल पडला आणि शेकडो पल्ले गुलाल उधळला... रास्ते वाड्यापाशी आले. तेथे रास्ते यांनी रंगाचा समारंभ केला.गच्च्यांवरून् रंगाचे बंब उडू लागले.तेव्हा स्वारीमध्ये जसा पर्जन्य पडतो तसा रंग पडू लागला. दोन घटिका तेथे रंग खेळून स्वारी वानवडीस दाखल झाली.. "

"मग श्रीमंत त्यांच्या जागी बसावयास गेले.दोन घटीका नाच आणि गाणे झाले. मग रंग खेळावयास प्रारंभ झाला.रंग खेळता खेळता रंगाचे पाट नदीस मिळाले.असा रंग द्वापार युगी श्रीकृष्ण भगवान खेळले....असा रंग खेळल्यावर सरकारची स्वारी स्नानास उठली. त्यासमयी शिंदे यांनी शेकडो कढया पाण्याच्या तापलेल्या ठेवल्या होत्या.शेकडो ब्राह्मण पाणके घंगाळ घागरी घेऊन उभे होते. मग अवघ्यांची स्नाने झाल्यावर ज्या कचेरीत रंग खेळले, त्याच मखमली डेर्‍यास फरास याने ती बिछायत काढून आणि नवी बिछायत घालून तयार केली.मग महादजी शिंदे यांनी श्रीमंतांस सर्व पोषाख, जवाहीर, शिरपेच, आणि तुरा वगैरे , गळ्यात मोत्याच्या माळा असा मान दिला.नंतर पानसुपारी अत्तर, गुलाब, हार, तुरे,गजरे दिले. इतका समारंभ होईपर्यंत तीन घटिका रात्र झाली. मग सरकारची स्वारी पुण्यास जावयास निघाली."

सवाई माधरावांच्या काळापर्यंत होळी उत्सव काहीसा मर्यादेने पाळला जात असे.पण दुसर्‍या बाजीरावाने अगदीच ताळतंत्र सोडल्याने रंगपंचमीच्या सणाला हिडीस रुप प्राप्त झाले होते. मराठ्यांच्या संपर्कात आल्याने मुसलमान राज्यकर्ते पण होळीसारखा सण मोठ्या उत्साहाने साजरा करीत आणि हिंदू प्रजेच्या आनंदात सहभागी होत. गावोगावी होळीचा सण साजरा होई. त्याचप्रमाणे गडकिल्ल्यावरही होळीचा समारंभ साजरा करण्यात येई. रंगपंचमीच्या दिवशी मात्र खास दरबार भरवून मोठा रंगसोहळा साजरा करण्यात येई. हुजर्‍यांपासून हुजुरांपर्यंत सारे लहान-थोर या समारंभात रंगून जात.
 

लेखक -डॉ.आर.एच. कांबळे

(हा विशेष लेख म्हणजे डॉ.आर.एच. कांबळे यांनी लिहिलेल्या 'मराठेशाहीतील सण आणि उत्सव' या लेखाचा भाग आहे. हा लेख साप्ताहिक कोकण मीडिया या दिपोत्सव अंकात प्रकाशित झाला होता. आम्ही  डॉ.आर.एच. कांबळे  आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांचे आभारी आहोत.)

सबस्क्राईब करा

* indicates required