computer

या आहेत IMDB नुसार टॉप १० भारतीय मालिका, यातल्या किती तुम्ही पाहिल्यात?

इंटरनेट युग अवतरल्यापासून चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातही बराच मोठा बदल झालेला आहे. कित्येक ओटीटी प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या पद्धतीचे कंटेंट घेऊन येत आहेत. युट्यूब, नेटफ्लिक्स, अमेझॉन, टीव्हीएफही काही यातील प्रसिद्ध नावे पण यापुरतेच आता हे क्षेत्र मर्यादित राहिलेले नाही. तर अशा वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होणारे वेबसिरीज, चित्रपट यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे मूल्यांकन करणारीही एक वेबसाईट आहे जिला IMDb म्हटले जाते. या वेबसाईटवर विविध चित्रपटांची माहिती, त्यातील पात्रे व्यक्तिरेखा आणि प्रेक्षकांनी त्याला दिलेली पसंती अशा सगळ्याची माहिती संकलित केली जाते. यावर्षी IMDbने संकलित केलेल्या माहितीतून भारतातील दहा सर्वोत्तम मालिकांची यादी जाहीर केली आहे, चला तर बघूया या सर्वोत्तम दहा मालिकांच्या यादीत नेमका कुठकुठल्या मालिकांचा क्रमांक लागतो.

१. स्कॅम १९९२

हंसल मेहता यांची निर्मिती असलेला स्कॅम १९९२ हा शो IMDbच्या रॅकिंगमध्ये सर्वात वर आहे. हा शो स्टॉक मार्केट दलाल हर्षद मेहताच्या जीवानावर बेतलेला असल्याने स्टॉक मार्केट सारखा किचकट आणि गुंतागुंतीचा विषय असूनही सामान्य प्रेक्षकांनाही हा विषय सहज समजेल अशा रीतीने त्याची मांडणी झालेली आहे. अभिनेता प्रतीक गांधीने यात मुख्य भूमिका साकारली आहे. शोची मांडणी, पटकथा आणि यातील कलाकारांचा अभिनय सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांनी चांगल्याच उचलून धरल्या आहेत.

२. ऍस्पिरंट

टीव्हीएफ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित झालेल्या अॅस्पिरंटने या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. २०२१ मध्ये ही सिरीज प्रदर्शित झाली होती. या शोच्या पाचही एपिसोडना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नवीन कास्तुरीया, सनी हिंदुजा, यांची मुख्य भूमिका असलेली ही सिरीज युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावर बेतलेली आहे.

३. पिचर्स

तसा हा शो खूप जुना आहे, म्हणजे २०१५ मध्ये हा पहिल्यांदा प्रदर्शित झाला होता. पण आजही हा शो तिसऱ्या क्रमांकावर आहे, यावरून प्रेक्षकांची याला किती पसंती मिळाली असेल याची कल्पना येऊ शकेल. स्वतःचा स्टार्टअप सुरु करण्यासाठी धडपडणाऱ्या उद्योजकांची कहाणी या शोच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. डिजिटली कंटेंट देण्याची नुकातिक सुरुवात झाली त्याकाळातील हा शो, सुरुवातीला युट्युबवरून प्रदर्शित झाला होता. नंतर सोनी लाइव्ह आणि टीव्हीएफ या प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित झाला.

४. कोटा फॅक्टरी

हा शो सुद्धा टीव्हीएफवरूनच प्रदर्शित झाला होता. २०१९ पासून युट्युबवर ही सिरीज स्ट्रीम होत आहे. राजस्थानच्या कोटा शहरातील कोचिंग संस्कृतीवर आधारित असलेल्या या शोमध्ये जितेंद्र कुमार, मयूर मोरे, या कलाकारांनी काम केले आहे. पाच एपिसोडमध्ये विभागलेल्या या सिरीजला युट्युबवर १ अब्जाहून जास्त व्हीव्ज आहेत. यावरून याची लोकप्रियता लक्षात येते.

५. गुल्लक

सोनी लाइव्हवरून प्रदर्शित झालेला ‘गुल्लक’ हा शो म्हणजे, एका मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबाची गोष्ट सांगणारी सिरीज आहे. अशा मध्यमवर्गीय कुटुंबाचे सामान्य जीवन आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या धम्माल घडामोडी दाखवणाऱ्या गुल्लकला भारतीय प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. याच्या पाहिल्या भागाला जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर २०२१ मध्ये याचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला.

६. रामायण

रामायण’ ही तर तशी फारच जुनी मालिका. १९८७च्या काळात पहिल्यांदा रामायण दूरदर्शनवरून प्रसारित झाली तेव्हाही तिला तुफान प्रतिसाद मिळाला होता. आता लॉकडाऊनच्या काळात पुन्हा एकदा दूरदर्शनच्या माध्यमातून रामायण प्रेक्षकांच्या भेटीला आले. याही वेळी प्रेक्षकांनी रामायण अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. पुरणकथेवर आधारित या मालिकेतील कलाकार आजही त्यांच्या भूमिकेसाठी ओळखले जातात.

७. महाभारत

जी गोष्ट रामायणची तीच बी. आर. चोप्रांच्या महाभारतची. ८० च्या उत्तरार्धात आलेल्या या मालिकांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. याचे पुनर्प्रसारण खरोखरीच इतके लोकप्रिय ठरेल याचा कुणालाही अंदाज आला नसेल, पण लॉकडाऊनच्या काळात रामायणसोबतच महाभारतही जेव्हा दुसऱ्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा लोकांनी या मालिकेलाही उदंड प्रतिसाद दिला. महाभारतात काम केलेले कलाकारही प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद आणि प्रेम पाहून भारावून गेले.

८. साराभाई व्हर्सेस साराभाई

२००० मध्ये प्रदर्शित झालेल्या या कॉमेडी शोला तेव्हा तर चांगला प्रतिसाद मिळाला नाही पण लॉकडाऊन काळात जेव्हा हा पुन:प्रदर्शित झाला तेव्हा मात्र याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. विनोदी मालिकांमध्ये या मालिकेने एक आगळेवेगळे स्थान प्राप्त केले आहे. हॉटस्टार वरून या मालिकेचा दुसरा भागही प्रदर्शित झाला पण, याला पहिल्या भागाइतकी लोकप्रियता मिळाली नाही.

९. ये मेरी फॅमिली

आई-वडील आणि तीन मुले अशा पंचकोनी मध्यमवर्गीय कुटुंबावर आधारलेली ही एक तुफान विनोदी मालिका. या कुटुंबातील मधला मुलगा फक्त बारा वर्षे वयाचा आहे. या मुलाच्या दृष्टीकोनातून या मालिकेची कथा उलगडत जाते. मोना सिंग, आकर्ष खुराना, सारख्या कलाकारांना घेऊन बनवण्यात आलेली ही मालिका २०१८ मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाली. आज तीन वर्षानंतरही या मालिकेची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. तुम्ही अजूनही टीव्हीएफवर हा शो पाहू शकता.

१०. पंचायत

सरकारी नोकरी करणारा एक तरुण आणि त्याचे जग बदलण्याचे स्वप्न यावर ही मालिका आधारलेली आहे. जितेंद्र कुमारने या मालिकेत मुख्य भूमिका साकारली असून सोबत नीना गुप्ता आणि रघुबीर यादव हे देखील प्रमुख भूमिकेत दिसतात. २०२० मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झालेली ही मालिका आजही लोकप्रिय मालिकांच्या यादीत तिचे स्थान टिकवून आहे.

तर हे आहेत दहा भारतीय शोज ज्यांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. या मालिका लोकप्रियतेचे नवे शिखर गाठत आहेत. इंटरनेटवर मनोरंजनाला तोटा नाहीच पण त्यातही चांगले आणि दर्जेदार मनोरंजन शोधणे म्हणजे दिव्यच. तर इथे ही यादी देऊन तुम्हाला चांगले मनोरंजन शोधण्याच्या कामात आम्हीही थोडीफार मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. काही चांगले पाहण्याच्या विचारात असाल तर तुम्हीही या शोज विचार नक्की करू शकता. यातील कोणत्या शोला तुम्ही प्रथम प्राधान्य द्याल ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा.

-मेघश्री श्रेष्ठी 

सबस्क्राईब करा

* indicates required