computer

MTV ते तान्हाजी : वाचा ओम राऊतची प्रेरणा, सिनेप्रवास आणि सिनेमामागच्या भूमिकेबद्दल!

मागच्या काही महिन्यांपासून ओम राऊत हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असणार. त्याचं कारण म्हणजे सध्या गाजत असलेला ‘तान्हाजी’ सिनेमा.  तान्हाजीपूर्वी त्याने आपल्या दिग्दर्शनाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्यावर आधारित ‘लोकमान्य : एक युगपुरुष’ चित्रपटापासून केली. आज आपल्या समोर ओम राऊतचे दोन सिनेमे असले तरी ज्या कष्टातून हे दोन चित्रपट तयार झाले तो प्रवास फारसा कोणाला माहित नाही. आज बोभाटाच्या या खास लेखातून ओम राऊतचा हा प्रवास आम्ही तुमच्या समोर उलगडून सांगणार आहोत.

ओम राऊतने लहानपणी दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गचा ‘ज्युरासिक पार्क’ सिनेमा पाहिला होता. तेव्हाच त्याने मनात चित्रपट दिग्दर्शक व्हायचं पक्कं केलं होतं. हेच स्वप्न उराशी बाळगून त्याने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगची पदवी मिळाल्यानंतर फिल्म्समध्ये मास्टर्स करण्यासाठी थेट अमेरिका गाठलं.

अमेरिकेतील बहुतेक कॉलेजेसमध्ये कॉम्प्युटर आणि इंजिनियरिंग करण्यासाठी आलेल्या मुलांमध्ये आशिया खंडातील मुलांचा मोठ्याप्रमाणात भरणा असतो. पण कलाक्षेत्रात मात्र उलट आहे. ओम ज्या कॉलेजमध्ये फिल्ममेकिंगचे धडे घ्यायला गेला होता तिथे तर मागच्या पाच वर्षात आलेला तो एकमेव भारतीय होता.

अशा या क्षेत्रात ओम येऊन पडला होता. त्यावेळी त्याला आपल्या वडिलांचे बोल आठवले, ‘अमेरिका हा मोठा देश आहे. तिथे सर्व वर्णाचे लोक आहेत. भारतीय त्यांच्या बेटावर राहतात, त्यात रमू नकोस, सागराचा भाग हो, त्यांच्या पाण्यात मिसळून त्यांच्या संस्कृतीचा भाग बन, तरच तो देश तुला कळेल.’

ओमने हा गुरुमंत्र आत्मसात करून स्वतःमध्ये बदल केले. चहाची जागा काळ्या कॉफीने घेतली, पोह्याच्या जागी बेगल आणि क्रीम चीज आले, क्रिकेटच्या जागी बास्केटबॉल. दादरच्या बालमोहनमधला हा विद्यार्थी अमेरिकेच्या कॉलेजबाहेरच्या कॉफीशॉप्स आणि पब्जमध्ये दिसू लागला.

(बालमोहन विद्यामंदिर)

ओम शिक्षणासोबतच कॉलेजच्या कॅम्पसमध्ये नोकरी करत होता. मिळणाऱ्या पगारातून त्याच्या शिक्षणाचा अर्धा खर्च निघायचा. कॉलेजच्या पहिल्या वर्षातील अभ्यासाचा विषय हा अमेरिकन फिल्म्स आणि त्यांचा इतिहास  होता. कधीही ऐकले नसतील अशा दिग्दर्शक, तंत्रज्ञांची नावे या अभ्यासक्रमात होती. ओमसाठी अमेरिकन चित्रपट सृष्टीतले कलाकार, तंत्रज्ञ आणि त्यांचा अमेरिकन संस्कृतीशी असलेला संबंध समजणं अवघड होतं. त्याला भीती वाटली की आपण नापास होऊ आणि कॅम्पसमधली नोकरी गमावून बसू. नोकरी गेली तर आईवडिलांवर शिक्षणाचा भार वाढणार.

अशा संकटाच्यावेळी त्याला त्याच्या डग ब्रोडी नावाच्या प्राध्यापकांनी दिलेला सल्ला मोलाचा ठरला. त्याच्या कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या या प्राध्यापकांनी त्याला घरी जेवायला बोलवलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं, ‘जगात दोन प्रकारचे दिग्दर्शक असतात, एक स्पीलबर्ग, लुकास, कपोलासारखे जे कॉलेजमध्ये दुसर्यांच्या फिल्म्स बघून फिल्म्स शिकतात आणि पुढे सर्वश्रेष्ठ फिल्ममेकर्स बनतात. आणि दुसरे जे फिल्म्स शिकत नाहीत ते वेलीस, हिचकॉकसारखे सुतार किंवा महायुद्धातले सैनिक असतात आणि तेही सर्वश्रेष्ठ फिल्ममेकर्स बनतात. तू ठरव तू कोण आहेस ते.’

यानंतर ओमने आपला आत्मविश्वास पुन्हा मिळवला आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. त्याची पहिलीच नोकरी ही जगप्रसिद्ध MTV च्या १५१५ ब्रॉडवे इमारतीत ३९ व्या मजल्यावर होती. क्रिएटिव्ह रिसोर्स टीमचा तो एकमेव  भारतीय सदस्य होता. नोकरीतले पहिले सहा महिने त्याच्यासाठी  कठीण गेले. अमेरिकन जनतेला आवडेल असं त्याला लिहीताच येत नव्हतं, पण हळूहळू जम बसला आणि या मुंबईतल्या मुलाची कला अमेरिकन प्रेक्षकांना आवडू लागली.

८ वर्ष उलटली. ओमने न्यूयॉर्कशी जुळवून घेतलं होतं. असंच एकदा ओम दरवर्षीप्रमाणे न्यूयॉर्क यांकीचा बेसबॉल सामना पाहायला गेला होता. सामना सुरु होण्यापूर्वी अमेरिकेचं राष्ट्रगीत सुरु झालं. तिथे जमलेले सगळेजण ‘गॉड ब्लेस अमेरिका’ गाऊ लागले. या क्षणी ओमला आपण या देशात परके आहोत याची जाणीव झाली. याच विचारात त्याने पुढचा संपूर्ण सामना बघितला.

पुढच्याच आठवड्यात ओमची आणि भारतीय सिनेमा वितरक कंपनी ‘युएफओ’चे सर्वेसर्वा संजय गायकवाड यांची भेट झाली. त्यांच्याशी भारत आणि भारतीय चित्रपटसृष्टी या विषयावर बोलल्यानंतर ओमने आयुष्यात पहिल्यांदाच न्यूयॉर्क ते मुंबई प्रवासाचं वनवे तिकीट काढलं. आता तो कायमचा भारतात आला होता.   

मुंबईत आल्यावर त्याने चित्रपटासंबंधी असलेले काम आणि चित्रपट वितरणाचं काम सुरु केलं. या कामातून निर्माण  झालेला पहिला चित्रपट म्हणजे महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘लालबाग  परळ’. पुढे एक हिंदी आणि एक मराठी चित्रपटाची निर्मितीही झाली.

पण ओमला मूळ प्रश्न भेडसावतच होता. ‘मी भारतात का आलो?’

तो भारतातली परिस्थिती पाहत होता. एकीकडे मल्टीनॅशनल कंपन्या आणि मुंबईतल्या मोठमोठ्या काचेच्या बिल्डींग. रस्त्यावरून फिरणाऱ्या महागड्या मोटारी. भारतात झालेलं जागतिकीकरण. या सगळ्यात भारतातली विषमता त्याला सर्वात जास्त जाणवली. आज आपल्याकडे स्वातंत्र्य आहे परंतु सुधारणा नाही. स्वराज्य आहे पण सुराज्य नाही.

आणि म्हणून ओमला त्याच्या माध्यमातून नव्या पिढीला लोकमान्य टिळकांची गोष्ट सांगण्याची गरज वाटली. अशाप्रकारे लोकमान्य एक युगपुरुष हा ओम राऊतचा पहिला सिनेमा साकार झाला.

यानंतर ओमने दिग्दर्शित केलेला तान्हाजी तुम्ही नक्कीच बघितला असेल. दोन्ही चित्रपटांमध्ये एक साम्य तुम्हाला जरूर आढळेल ते असे की मराठी माणूस आक्रमणाला, परकीय शक्तीला, जहाल उत्तर देतो. या जहाल वारशाचे चित्रीकरण तान्हाजीमध्ये पण आपल्याला बघायला मिळाले.

ओमकडून भविष्यातही अशाच दर्जेदार चित्रपटांची अपेक्षा आपण करूया. पुढच्या वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा.