computer

दानशूर, शांत, नम्र किनू रीव्हजच्या स्वभावाला कारणीभूत आहे प्रचंड दु:ख आणि संघर्ष!! कसं ते जाणून घ्या..

इंग्रजी समजो किंवा न समजो, पब्लिकनं 'मॅट्रिक्स' सिनेमा पाहिलेला असतोच. इंग्रजी समजणाऱ्या भल्याभल्यांना तो अजून समजला नाही आणि काहीजणांना प्रत्येकवेळा पाहताना त्यात वेगळंच काही समजतं. आता मॅट्रिक्सचा विषय का? कारण मॅट्रिक्स म्हटलं की डोळ्यांसमोर किनू रिव्हज येतोच येतो. आज 'जय हो' मध्ये त्याचीच गोष्ट आहे..

तो जेव्हा पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकला, तेव्हा त्याच्याकडे 'आणखी एक चिकणा दिसणारा गोड गुलाबी नट' या अर्थाने पाहिलं गेलं. दोन सुपर डुपर हिट चित्रपट देऊनसुद्धा त्याचं करियर म्हणावं तितकं यशस्वी झालं नाही. तो फक्त तीन वर्षांचा असताना त्याचे वडील त्याच्या आईला सोडून गेले. त्याच्या आईचे दोन घटस्फोट झाले, त्यामुळे त्याच्या आई बरोबर कधी या शहरात तर कधी त्या, अशी त्याची फरफट झाली; किती शाळा बदलाव्या लागल्या त्याची मोजदादच नाही. त्याचा मित्र ड्रग्जची शिकार झाला. त्याची मुलगी गर्भात असतानाच गेली. एकापाठोपाठ कोसळलेली दुःख पचवून पुन्हां उभं रहाण्यासाठी त्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक होतं.

किनु रीव्हज जेव्हा १९९१ च्या "माय ओन प्रायव्हेट इडाहो" आणि "ब्रॅम स्टोकर्स ड्रॅक्युला" या चित्रपटांमध्ये दिसला, तेव्हा 'आणखी एक देखणा नवोदित कलाकार' अशा अर्थाने त्याच्याकडे पाहिलं गेलं. काही वर्षांनंतर तो "बिल ॲंड टेड" ही मालिका, १९९४ चा ब्लॉकबस्टर "स्पीड" आणि १९९९ मधील "द मॅट्रिक्स" सारख्या ऑल टाइम हिटमुळे जगप्रसिद्ध झाला.

त्या यशानंतर त्याची कारकीर्द थोडीशी घसरली असली तरी रीव्हजने आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं. आज त्याची ओळख "जॉन विक" अशी आहे आणि तो हॉलीवूडमधील सर्वात लाडक्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा दानशूरपणा, शांत स्वभाव, नम्र वर्तन अशा गुणविशेषांमुळे तो चित्रपटसृष्टिमध्ये लोकप्रिय आहे. किनू रीव्हजच्या आयुष्यात असं काय घडलं आहे जे इतर अभिनेत्यांना भोगावं लागलं नाही?

एक म्हणजे रीव्हजचे दुःख आणि शोकांतिका. त्याला भोगाव्या लागणाऱ्या दु:खामुळे त्याचा स्वभाव मृदुभाषी, आणि शांत झाला असावा. बालपणीच्या हालअपेष्टांपासून ते प्रियजनांच्या दुःखद विरहापर्यंत त्याच्या आयुष्यात विविध समस्या उद्भवत राहिल्या आणि त्यांचा सामना करत तो इथपर्यंत येऊन पोहोचला आहे.

अगदी लहान वयातच किनू रीव्हजच्या आयुष्यात भावनिक आंदोलन सुरू झाले. तो फक्त ३ वर्षांचा होता तेव्हां त्याचे वडील सॅम्युअल रीव्हज यांनी कुटुंबाचा त्याग केला आणि पत्नी पॅट्रिशियाला त्यांच्या दोन मुलांचे संगोपन करण्यासाठी सोडून दिले. काही वर्षांनी सॅम्युअलला कोकेन आणि हेरॉइन बाळगल्याबद्दल अटक करण्यात आली आणि त्याला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. किनू रीव्हजची आई पॅट्रिशिया, वारंवार एका लग्नातून दुसऱ्या आणि एका राज्यातून दुसर्‍या राज्यात असा प्रवास करत राहिली. तिच्यासाठी असं अनिश्चित जीवन त्रासदायकच असणार आणि छोट्या किनूसाठी देखील.

पॅट्रिशिया आपल्या दोन लहान मुलांना घेऊन ऑस्ट्रेलियातून न्यूयॉर्कमध्ये गेली. १९७० मध्ये तिने ब्रॉडवेचे संचालक पॉल ॲरॉन यांच्याशी लग्न केले. काही काळानंतर हे जोडपे टोरंटोला गेले. दुर्दैवाने हे लग्न एक वर्ष टिकले आणि पुढच्याच वर्षी दोघे वेगळे झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ॲरॉन आणि किनू रीव्हजचं नातं मैत्रीपूर्ण राहिलं. तो अनेकदा किनूला करिअरचे सल्ले देत असे आणि त्याच्या उमेदीच्या काळात चित्रपटात काम मिळवण्यास मदत करत असे. पॅट्रिशियाने रॉक संगीत प्रवर्तक रॉबर्ट मिलर आणि नंतर केशभूषाकार जॅक बाँडशी लग्न केले, पण दोन्ही लग्नं टिकली नाहीत.

रीव्हजचे लहानपण शैक्षणिकदृष्ट्या देखील संघर्षपूर्ण होते. त्याने एकूण चार स्वतंत्र हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्याने उच्च शिक्षण घेतले नाही. इतकंच काय, तर त्याला डिप्लोमादेखील मिळाला नाही. खरं तर रीव्हजला एका शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. एका मुलाखतीत त्याने सांगितलं, "मी अभ्यासात ठीक होतो. माझा इंग्रजी विषय चांगला होता. मी बुद्धिबळ संघात होतो. ती खूप छोटी शाळा होती आणि मला वाटतं की माझ्यासाठी ती योग्य नव्हती. माझे शाळेतील कर्मचाऱ्यांबरोबर भांडण होत असे. मुख्याध्यापक आणि मी तर नजरेला नजर भिडवत नव्हतो. शेवटी व्हायचं तेच झालं. मला शाळेतून काढून टाकण्यात आलं".

८० च्या दशकाच्या उत्तरार्धात किनू रीव्हज काही प्रमुख, हेवा करण्याजोग्या भूमिका साकारत होता. १९८८ चा "पर्मनंट रेकॉर्ड" आणि पुढील वर्षी "बिल ॲंड टेड्स एक्सलंट ॲडव्हेंचर्स" हा एक कल्ट हिट झाला आणि त्याचे सिक्वेल आले. काही वर्षांनंतर त्याने "आय लव्ह यू टू डेथ" आणि "माय ओन प्रायव्हेट इडाहो" सारखे प्रगल्भ चित्रपट स्वीकारले.

९० च्या दशकाच्या उत्तरार्धात किनू उगवत्या-ताऱ्याच्या नावलौकिकातून बाहेर पडला आणि एक आघाडीचा नायक बनला. हे १९९४ च्या "स्पीड" या चित्रपटामुळे घडले. या सिनेमात त्याने एका तरुण पोलिसाची भूमिका केली होती, जो बाॅंब लावलेल्या बसचा वेग ताशी ५० मैल कायम ठेवून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करतो. त्यानंतर आलेल्या "द मॅट्रिक्स" या फ्युचरिस्टिक चित्रपटामधील त्याची भूमिका खूपच गाजली.

जोआकिम फिनिक्स या ऑस्कर पुरस्कार विजेत्याचा भाऊ रिव्हर फिनिक्स हा त्याचा मित्र होता. पण ड्रग्जची शिकार झाल्यामुळे तो देखील काळाने हिरावून नेला. याच सुमारास तो अभिनेत्री आणि वैयक्तिक सहाय्यक जेनिफर सायमच्या प्रेमात पडला. जेनिफर गर्भवती राहिली, पण ख्रिसमस दरम्यान सायमच्या लक्षात आलं की काही दिवसांपासून बाळाच्या हालचाली जाणवत नाहीत. दोघांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली, जिथे अल्ट्रासाऊंड चाचण्यांमधून असे दिसून आले की त्यांची मुलगी गर्भामध्येच मृत झाली होती. कां कुणास ठाऊक, पण त्याचं जेनिफर बरोबरचं नातं फार काळ टिकलं नाही. ते दोघं वेगळे झाले, तरीही एकमेकांचे चांगले मित्र बनून राहिले. एक दिवस मात्र जेनिफरच्या कारचा अपघात झाला आणि किनू परत एकाकी झाला. जवळचा मित्र गेला, मैत्रिण देखील गेली.

हे सगळं कमी होतं म्हणून की काय, त्याची बहिण किम कॅन्सरवर उपचार घेत आहे. किनूचं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे आणि शक्य असेल ते सगळं तो तिच्यासाठी करत आहे. दुःखात सुख इतकंच, की तिचा धोका टळला आहे. एकापाठोपाठ कोसळलेल्या ह्या संकटांनी किनू अंतर्बाह्य बदलला नसता तरच नवल. तो एकदा म्हणाला होता, " दुःखाचं फक्त स्वरूप बदलतं, त्याची तीव्रता नाही बदलत. ज्या व्यक्तींवर तुम्ही मनापासून प्रेम करता, त्यांच्या विरहाचं दुःख पचवून साधारण आयुष्य जगणं सोपं नसतं".

"जाॅन विक " ह्या चित्रपटात शोकाकूल, आपल्या व्यवसायात निपुण नायक म्हणून त्याचा अभिनय खूपच अर्थपूर्ण आहे. या चित्रपटाचे सगळे सिक्वेल बाॅक्स ऑफिसवर तुफान चालले आणि त्याला एक नवीन ओळख मिळवून दिली.

किनू रीव्हज परोपकारी आहे आणि काही सामाजिक संस्थांना मुक्तहस्ते मदत करतो, पण त्याच्या कार्याला प्रसिद्धी मिळावी असं त्याला वाटत नाही. या सर्व औदार्य आणि नम्रतेचा परिणाम म्हणून अलिकडच्या काळात रीव्हजची प्रतिमा मोठ्या प्रमाणात बदलली आहे. त्याचा प्रवास एक माफक प्रतिभावान ॲक्शन स्टारपासून सुरु होऊन हॉलीवूडच्या लाडक्या व्यक्तिरेखेपर्यंत पोहोचला आहे.

लेखक -चंद्रशेखर अनंत मराठे

सबस्क्राईब करा

* indicates required