computer

कारमधल्या उद्योगांमुळे झालेला गुप्तरोग आणि त्यामुळे चक्क कार विमा कंपनीकडून ४० कोटींची भरपाई मिळतेय? नेमकं प्रकरण काय आहे?

जगात काहीही घडू शकतं. फक्त आपण ते तसं घडवून आणू शकतो यावर तुमचा विश्वास हवा. नुकताच एका बाईंनी विमा कंपनीवर केलेला खटला जिंकला आहे. या खटल्याला 'बादरायणी संबंध'च फक्त म्हणता येईल. आता बादरायणी संबंध म्हणजे 'तुमच्या आणि माझ्या गाडीचे चाक बोरीच्या लाकडाचे आहे, म्हणून आपण नातेवाईक आहोत आणि तुम्ही माझं आदरातिथ्य करा' अशी एक लोककथा सांगितली जाते त्यातला तो संबंध. वाचूया मग या बाई, विमा कंपनी, खटलला आणि ४० कोटींच्या भरपाईची काय भानगड आहे!!

गोष्ट आहे अमेरिकेतील मिसौरी या राज्यातली. ही घटना २०१७ सालची असली तर खटल्याचा निकाल आता लागला आहे. बाईंकडे ह्युंदाईची जेनेसीस नावाची कार होती. कारचे अनेक उपयोग असले तरी बाईंनी कारचा अनोखा उपयोग केला, तो म्हणजे आपल्या माजी बॉयफ्रेंडसोबत कारच्या मागील सीटवर त्यांनी समागम उरकला. इथपर्यंत ठीक होते.
या घटनेनंतर काही दिवसांनी या बाईला आपल्याला human papillomavirus नावाचा गुप्तरोग झाला असल्याचे समजले. त्यांना हा रोग आपल्या माजी बॉयफ्रेंडसोबत केलेल्या सेक्समुळे झाला हे कळायला वेळ लागला नाही. त्या पुरुषाला कॅन्सर आणि एचपीव्ही नावाचा गुप्तरोग होता ही गोष्ट त्याने त्या बाईपासून लपवून ठेवली. ज्याचा परिणाम म्हणून बाईलाही तो रोग झाला.

पण बाईंनी याची कसर त्यांच्या माजी बॉयफ्रेंडसोबतच थेट कारच्या विमा कंपनीकडून काढायचे ठरवले. तसा रीतसर खटला त्यांनी दाखल केला. न्यायालयाने निकाल दिला. त्यात बॉयफ्रेंड तर दोषी ठरलाच, पण जीआयइसीओ जनरल इन्शुरन्स कंपनीला या खटल्यात सदर महिलेस तब्बल ४० कोटी रुपये द्यावे लागतील असा निकाल देण्यात आला. कंपनीकडून हा निर्णय सहजासहजी मान्य होणे सोपे नव्हते. त्यांनी वरच्या न्यायालयात दाद मागितली. तिथे ३ न्यायाधीशांसमोर हा खटला चालवला गेला, ज्यात बॉयफ्रेंड आजार लपवल्याबद्दल दोषी ठरला तर विमा कंपनीने भरपाई द्यायलाच हवी हा आदेश न्यायालयाने दिला.

आता यात विमा कंपनी कशी काय अडकली हा प्रश्न पडला ना?
या कंपनीच्या अटी आणि तरतुदींप्रमाणे कारमध्ये झालेल्या अपघातामुळे किंवा कारमध्ये घडलेल्या अप्रिय घटनेमुळे आरोग्यास धोका झाल्यास कंपनीला विम्याची रक्कम देणे भाग होते.
याच शब्दांच्या खेळात बाईंनी विमा कंपनीला अडकवले. न्यायालयाला देखील कायद्याप्रमाणे आणि दोन्ही बाजूंनी मान्य केलेल्या अटींना धरून चालावे लागते. या सगळ्या प्रकरणात अशा तऱ्हेने विमा कंपनीला त्या बाईंना ४० कोटींची भरपाई द्यावी लागली आहे.

कार विकत घेतल्यावर कारचा विमा प्रत्येकाचा असतोच. पण वेळ पडली तर हा विमा मिळवायला खूप त्रास होतो. सहजासहजी विमा मिळत नाही असाच अनुभव लोकांचा असतो. विमा कंपनीच्या अनेक नियमांची पूर्तता होत असेल तरच हा विमा मिळतो. असे असतानाही पळवाटा शोधत आणि ते ही गुप्तरोगासारखा रोग झाल्यानंतर खटला भरून तो जिंकणे म्हणजे कमाल आहे. तुम्हांला काय वाटतं?

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required