computer

मित्रो : टिकटॉकला टक्कर द्यायला आलंय भारतीय अ‍ॅप!

सध्याच्या घडीला टिकटॉकचा व्हिडिओ पाह्यला नाही असा माणूस सापडणं अवघड आहे. काहीजण त्याचे जबरा फॅन्स आहेत तर काहींची तुझंमाझं पटेना पण तुझ्यावाचून करमेना अशी परिस्थिती आहे. हे सगळं खरं असलं तरी चीनने जगभर कोरोना पसरवला म्हणून लोकांच्या टिकटॉकवरच्या रागाचं पारडं प्रेमापेक्षा जड झालंय.

याचा परिणाम म्हणून भारतातल्या घराघरात आणि गल्लीबोळात कलाकार निर्माण करणाऱ्या टिकटॉकला आता भारतात उतरती कळा लागलीय. पण त्याचं कोरोना हे एकमेव कारण नाहीय. देशभरातल्या नेटकऱ्यांना दोन गटात विभागणाऱ्या 'टिकटॉक विरूद्ध युट्यूब'च्या पेटलेल्या वादात लाखो युट्युबप्रेमींनी आपल्या फोनमधून टिकटॉक अनइन्स्टॉल करत कायमचा रामराम केला. तर अनेकांनी प्ले स्टोअरवर जाऊन टिकटॉक ॲपला ५ पैकी १ स्टार देण्याची मोहिमच सुरू केली. त्यामुळं झालं काय, तर ४.५ वर असणारी टिकटॉकची रेटिंग अगदी १.१ पर्यंत घसरली. थोड्याच दिवसात टिकटॉकने आपली रेटिंग पुन्हा ४.० च्या पुढे नेली तो वेगळा चर्चेचा मुद्दा आहे.

तर, टिकटॉकवर अनेकदा ॲसिड हल्ला, बलात्कार, अशा हिंसक विषयांवरही व्हिडीओज पब्लिश होतात. त्यामुळे पाब्लिक नाराज होते. दुसरीकडे मोदिजींनी दिलेल्या 'आत्मनिर्भर' भारताच्या संदेशामुळंही या चायनीज ॲपला भारतात आणखीन युझर्स गमवावे लागले.

आता मात्र या टिकटॉकला आणखी एक मोठा धोका निर्माण झालाय. या टिकटॉकचं स्वदेशी व्हर्जन आता प्ले स्टोअरवर दाखल झालंय. अवघ्या काही दिवसांत हे ॲप ५० लाखांहून अधिक लोकांनी इन्स्टॉल‌ केलंय. 'मित्रों' (Mitron) हे त्याचं नाव. याच शब्दाने आपले पंतप्रधान देशाला संबोधित करतात. अगदी टिकटॉकचंच क्लोन म्हणता येईल, असं हे ॲप आहे. मित्रों ॲपमध्ये टिकटॉकसारखेच लिप सिंकींगवाले शॉर्ट व्हिडीओ बनवता येतात. हॅशटॅग वापरून व्हिडीओ शोधणं, वर किंवा खाली स्क्रोल करून व्हिडीओ पाहणं, मधल्या टॅबमध्ये क्रिएट व्हिडीओ, एडिट, शेअर वाले पेज आणि तुमचं स्वतःचं प्रोफाईल. असा संपूर्ण ॲपचा इंटरफेसच टिकटॉक सारखाच आहे.

अचानक वाढलेल्या डाऊनलोड रेटमुळं हे मित्रों ॲप गुगल प्ले स्टोअरच्या 'टॉप फ्री' ॲपच्या यादीत ११व्या स्थानावर आलंय. इतकंच काय, इतक्या कमी वेळेत मित्रोंवरच्या काही क्रिएटर्सचे ८०,००० फॉलोअर्स झालेत. तर वाचक मित्रहो, तुम्ही कधी वापरणार हे 'मित्रों'?

सबस्क्राईब करा

* indicates required