नागराज मंजुळेच्या नव्या फिल्मचा टीझर बघून घ्या भाऊ....पाहा कोणत्या भूमिकेत आलाय तो !!

Subscribe to Bobhata

आजवर फँड्री, सैराट, हायवे, बाजी अशा सिनेमांमधून नागराज मंजुळे अभिनेता म्हणून आपल्या समोर आला आहे. पण या चित्रपटांमधल्या त्याच्या भूमिका अगदी लहान होत्या. ‘दि सायलन्स’ मध्ये पहिल्यांदा त्याला मुख्य भूमिका मिळाली पण तिथे त्याच्या तोंडी फारसे संवाद नव्हते. पण आता ही उणीव भरून निघेल असं दिसतंय. कारण आटपाट प्रोडक्शन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत असणार आहे. या फिल्मचं नाव आहे ‘नाळ’.

मंडळी, ‘नाळ’ची निर्मिती, चित्रपटातली मुख्य भूमिका आणि चित्रपटाच्या संवाद लेखकाची भूमिका अशा तिहेरी भूमिकेत तो दिसणार आहे. काही दिवसापूर्वीच तो पुन्हा एकदा झी स्टुडीओ सोबत काम करणार अशी बातमी आली होती. ती फिल्म कोणती असणार याचं गुपित आता उघड झालंय.

सिनेमात नागराज सोबत आणखी कोणते कलाकार असतील आणि सिनेमाची कथा काय असेल याबद्दलची सगळी माहिती गुलदस्त्यात आहे. टीझरबद्दल बोलायला गेलं तर टीझर कथेबद्दल फार काही सांगत नाही. टीझरच्या सुरुवातीला शेवरी हवेत उडताना दिसते. टीझरच्या शेवटी शेवरीला पकडण्याचा प्रयत्न करणारा मुलगा तेवढा दिसतो. कदाचित कथानक या मुलाच्या भोवती फिरणारं असू शकतं.

‘नाळ’ फिल्मचं दिग्दर्शन सिनेमाटोग्राफर सुधाकर रेड्डी यंकट्टी’ने केलं आहे आहे. देऊळ, YZ, हायवे (मराठी), सैराट आणि नुकतीच आलेली नागराजची ‘पावसाचा निबंध’ शॉर्ट फिल्म, अशा दमदार सिनेमात सुधाकर रेड्डीने सिनेमाटोग्राफर म्हणून काम केलंय. त्याच्या कामासाठी त्याला पुरस्कारही मिळाले आहेत. आता तो दिग्दर्शक म्हणून काय कमाल करतो ते बघण्यासारखं असेल.

आटपाट प्रोडक्शन्स म्हणजे एका अर्थी नागराजच्या फॅक्ट्रीतून तयार झालेली फिल्म असल्याने या फिल्म कडून अपेक्षाही वाढलेल्या आहेत. ट्रेलर येईल तेव्हा याबद्दल आणखी माहिती मिळेलच. तूर्तास ‘नाळ’चा टीझर बघून घ्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required