computer

जेव्हा एक प्रसिद्ध मॉडेल मुंबईच्या रस्त्यांवरून नग्न धावते....वाचा भारतातल्या पहिल्या 'पेड स्ट्रीकिंग'बद्दल !!

कल्पना करा, तुम्ही रस्त्याने जात आहात किंवा समुद्रकिनारी फिरत आहात…. आणि अशावेळी अचानक एक सुंदर तरुणी निर्वस्त्र, निसर्गावस्थेत तुमच्यापुढे आली तर? काय मंडळी? जोरदार सांस्कृतिक धक्का बसेल ना? हा प्रकार पाश्चात्य जगात वारंवार घडत असतो. फुटबॉल, बेसबॉल किंवा क्रिकेटची मॅच सुरु असताना अचानक नग्नावस्थेत मैदानावर धावत जाणं याला स्ट्रीकिंग असं म्हणतात. अगदी या वर्ल्डकपच्या एका सामन्यात देखील असा अर्धनग्नावस्थेत धावणाऱ्या एका मुलीने व्यत्यय आणलाच होता.

'मन:पूतं समाचरेत' म्हणजे मनाला येईल तसे वागा हा संदेश देण्यासाठी हा स्ट्रीकिंगचा निर्लज्ज प्रकार लोक करत असतात. आपल्याकडे ‘हे असलं’ काही होत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्या समजाला आज आम्ही एक धक्का देणार आहोत. ७० च्या दशकात एका प्रतिथयश मॉडेलने मुंबईच्या रस्त्यांवर चक्क नग्न धाव घेतली होती. तर ही घटना आहे सन १९७४मधली. त्या काळात असे करणे म्हणजे किती मोठे धाडस असेल! हे धाडस कुणी आणि का केलं होतं?  चला तर जाणून घेऊया…

(स्ट्रीकिंग)

ब्लिट्झ पेपरचे मालक रुसी करंजिया यांच्या मनात सिनेक्षेत्राला वाहिलेलं 'सिनेब्लिट्झ' नावाचं मासिक सुरू करण्याचा विचार बऱ्याच दिवसापासून घोळत होता. तसं पाहता बाजारात चित्रपटविषयक बरीच मासिकं होती. पण त्या सगळ्यात आपलं ‘सिनेब्लिट्झ’ वेगळं असावं आणि सर्वांपेक्षा जास्त खपावं असं त्यांना वाटत असे. जुन्या ब्लिट्झच्या साप्ताहिकात तिसऱ्या पानावर नेहमी “क्लीव्हेज” दाखवणाऱ्या मॉडेलचा एक फोटो नियमित असायचा. आंबटशौकीन मंडळी हे क्लीव्हेज बघण्यासाठी म्हणूनसुद्धा ब्लिट्झ विकत घ्यायचे. त्यामुळे वाचकांना काय ‘बघायला’ आवडते हे रुसी करंजिया यांना माहित होते. 

याच विचाराने सिनेब्लिट्झने मार्केटमध्ये येताच धमाका करावा ही त्यांची रास्त इच्छा होती. एके दिवशी त्यांच्या असं मनात आलं की समजा पहिल्याच अंकात एखाद्या मॉडेलचे नग्न छायाचित्र छापले तर? किती खळबळ उडेल! ही कल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवण्याचा चंग बांधला आणि न्यूड मॉडेल म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर एकच नाव आलं… प्रोतीमा बेदी!

(रुसी करंजिया)

प्रोतीमा ही आपल्या बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाजासाठी प्रसिद्ध होतीच. त्याशिवाय तिच्यामध्ये एक बंडखोर वृत्ती होती जी नेहमी उफाळून येत असे. कुठलेही बंधन झुगारून देणे हा तिचा स्वभाव विशेष होता. याच गुणांमुळे करंजीयांना प्रोतीमाच आठवावी यात नवल ते काय? त्यांनी प्रोतीमाला संपर्क साधला आणि अपेक्षेप्रमाणेच तिनेही असे ‘पेड स्ट्रीकिंग’ करायला होकार दिला. फोटोग्राफीसाठी त्यावेळचा नामांकित फोटोग्राफर ‘तय्यब बादशहा’ याला पाचारण केले गेले. फोटोशूट जुहू बीच आणि फ्लोरा फाउंटन या लोकेशन्सवर करण्याचे नक्की झाले. सगळी तयारी तर झाली… आणि अखेर तो दिवस उजाडला.

(सिनेब्लिट्झ)

भल्या सकाळी लोकांची गर्दी कमी असताना सर्व युनिट फ्लोरा फाउंटन येथे पोचले आणि भारतीय सिनेसृष्टीतील एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात झाली. प्रोतीमा बेदीने आपले सगळे कपडे उतरवले. त्या दिवशी जे लोक तिथे उपस्थित होते ते आयुष्यात तो दिवस विसरू शकणार नाहीत. मुंबईच्या रस्त्यांवरून स्वतःच्या मर्जीने जाहिरातीसाठी नग्न धावणारी मॉडेल त्यापूर्वी कधी लोकांनी पाहिली नव्हती.

फ्लोरा फाउंटनचे शुटिंग संपले. त्यामधील फोटो प्रोतिमा बेदीलाच आवडले नाहीत. म्हणून दुसरे फोटोशूट जुहू बीचवर करायचे ठरले. पुन्हा एकदा जुहूच्या वाळूत प्रोतीमा धावू लागली. असं म्हणतात की प्रत्येक फोटोशूट नंतर ती स्वतः फोटो बघायची. यावेळी पण तिला कुठलाच फोटो पसंत पडत नव्हता. मनासारखा फोटो येईपर्यंत ती परत परत शूट करत होती. अखेर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली तेव्हा कुठे तिला काही मोजके फोटो आवडले आणि तेच मॅगझीनमध्ये छापायचं नक्की झालं.

मंडळी, जेव्हा मार्केटमध्ये सिनेब्लिट्झचा पहिला अंक आला तेव्हा अख्ख्या मुंबईत चर्चेचा एकच विषय होता… ‘सिनेब्लिट्झमध्ये नग्न प्रोतीमा बेदी’. कव्हरवर झीनत अमान असूनही मासिकाच्या आतील प्रोतीमा बेदीचीच जास्त चर्चा झाली. इथे सांगण्याची गरज नसावी, पण सर्व अंक विक्रमी संख्येने हातोहात विकले गेले. प्रचंड प्रमाणात चर्चा होऊ लागली. या कृतीचे अनेकांनी समर्थन केले तर अनेकांनी विरोध केला. त्या काळात जर सोशल मीडिया असता तर केवढा गहजब झाला असता याची कल्पना करा मंडळी. यावर इतका वाद वाढला की स्वतः प्रोतीमाला हे शुटिंग मुंबईत झाले नाही असे सांगावे लागले.

या सर्व घटनाक्रमाबद्दल प्रोतीमाचे पती असणाऱ्या कबीर बेदीचे जिवलग मित्र महेश भट्ट यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले की,

“हे नग्न फोटोशूट पुरोगामी अभिव्यक्तीचे प्रमाण आहे. ज्याला हवं तसं राहण्याची/वागण्याची मुभा असावी हेच यातून सांगायचं होतं.”

पण एक मात्र आहे, प्रोतीमा बेदीला कधीही या घटनेचा खेद झाला नाही. तिने शेवटपर्यंत या वागण्याचे समर्थनच केले. त्यावेळी तिची मुलगी पूजा बेदी पाच वर्षांची होती. पूजाच्या शाळेत तिचे मित्र-मैत्रिणी तिला आईच्या नग्नतेवरून चिडवत असत. एके दिवशी या चिडवण्यामुळे त्रस्त होऊन ती घरी आली असता प्रोतीमाने तिला समजावले की,

“हे बघ, हे माझे आयुष्य आहे. मी काय करावे किंवा कसे राहावे हे सांगण्याचा कुणालाही अधिकार नाही. ही माझी चॉईस आहे. जेव्हा तू मोठी होशील तेव्हा तुझ्या चॉईसच्या आड मी कधीही येणार नाही. तुला जसे जगायचे तसे तू जगू शकतेस.”

(प्रोतीमा बेदी)

मंडळी, अश्या या बिनधास्त बोल्ड प्रोतीमाचा कैलास-मानसरोवर यात्रा करताना दरड कोसळून 1998साली मृत्यू झाला. ती फक्त 49 वर्षांची असताना गेली खरी, पण आपल्या या फोटोशूट मुळे ती कायम सिनेजगतात आणि लोकांच्या स्मृतीमध्ये आठवणीत राहणार आहे.

 

लेखक : अनुप कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required