रेडिओ गार्डन: पृथ्वीगोल फिरवा आणि जगभरातली रेडिओ स्टेशन ऐका..

आठवतं ना, शाळेत असताना सकाळी-सकाळी अशी मस्त झोप यायची आणि घरी आई-बाबा प्रभातरंजनसारखा भक्तीगीतांचा कार्यक्रम लाऊन झोपमोड करायचे. आणि मग घड्याळाकडं न बघतासुद्धा संस्कृत बातम्या लागल्या म्हणजे इतके वाजले, हिंदी बातम्या म्हणजे इतके आणि मराठी बातम्या? बापरे.. फारच उशीर झाला हे कळायचं. 

केबल टीव्ही आल्यावर रेडिओचा भाव जरा कमी झाल्यासारखं वाटलं पण जेव्हा मोबाईल फोन आले तेव्हा पुन्हा एकदा रेडिओचा भाव वधारला. नोकियाच्या फोनमध्ये किती रॅम, स्क्रीन साईज असले प्रश्न विचारले नाही जायचे.  एक प्रश्न मात्र नक्की विचारला जायचा, एफ एम आहे का नाही? आपल्या आधीच्या पिढीला तर रेडिओ म्हणजे सॉलिड नोस्टॉजिया देणारी गोेष्ट आहे. टीव्ही, इंटरनेट हे आत्ता आलं पण रेडिओ ची खरखर सगळ्या पिढयांनी ऐकलीय.

तर, रात्री बेरात्री इंटरनेटवर फुकट भटकत राहणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. या आमच्या सफरीतून आम्हाला रोज नवं काहीतरी गवसतं. तर आज आमच्या हाती लागली आहे भन्नाट साईट- Radio.garden. तर काय आहे या साईटीचं, एकदम सोपं आहे. एक पृथ्वीगोल बनवलाय आणि त्यावर छोटे-मोठे हिरवे गोळे आहेत. तर हे गोळे म्हणजेच त्या-त्या जागांची रेडिओ स्टेशन्स. त्यावर क्लिक करा आणि चालू करा तुमचं आवडतं चॅनल ऐकायला.  काही देशांत तर इतकी चॅनेल्स आहेत की पूर्ण देशच हिरव्या गोळ्यांनी भरलेले दिसतात. म्हणजेच, चॉईसला भरपूर वाव आहे. नाहीतर आठवतंय, विविधभारती लावायला एकेकाळी किती आटापिटा करायला लागायचा ते. तिथं दिवसभर हिंदी गाणी लागायची, पण बरेचदा त्यासोबत खूप खरखर पण सहन करायला लागायची.

या साईटच ऍप पण आहे बरं का, तर बघा एकदा यावर जाऊन, तोवर आम्ही हिंगोलीला काय प्रोग्रॅम चालू आहे ते ऐकतो..

सबस्क्राईब करा

* indicates required