computer

नागराज कॉमिक्सवर सिनेमा येतोय, त्यापूर्वी नागराज बद्दल जाणून घ्या !!

अल्लाउद्दिन खिलजी, गलीबॉयमधला मुराद, आगामी ८३ सिनेमातला कपिल देव, जयेशभाई जोरदार सिनेमातला ‘जयेशभाई’ असे वेगवेगळी पात्र वठवल्यानंतर आता रणवीर सिंग ‘नागराज’च्या भूमिकेत येणार आहे. कालपासून ही बातमी इंटरनेटवर फिरत आहे. पण आजच्या तरुण पिढीला नागराज प्रकरण माहित नाही. या सिनेमाच्या निमित्ताने बोभाटा तुमची ओळख एका जुन्या सुपरहिरोशी करून देणार आहे. उद्या समजा रणवीरचा सिनेमा आलाच तर तो भारतीय कॉमिक हिरोवर बनलेला पहिला सिनेमा असेल.

राज कॉमिक्समध्ये १९८० च्या दशकापासून नागराज या सुपरहिरोची एन्ट्री झाली. हे सुपरहिरो पात्र राजकुमार गुप्ता, मनोज गुप्ता आणि परशुराम शर्मा यांनी तयार केलं होतं. कॉमिक्ससाठी रेखाचित्र काढण्याचं काम सुरुवातीला प्रताप मुळीक आणि त्यानंतर संजय अष्टपुत्रे, चंदू आणि अनुपम सिन्हा यांनी केलं. 

काय आहे नागराजची गोष्ट ??

नागराज या नावावरूनच त्याच्यात कोणत्या ‘शक्ती’ असतील हे तुम्ही ओळखलंच असेल. नागराज  या पात्राची  कल्पना पुराणात असलेल्या ‘इच्छाधारी नाग’ संकल्पनेवर आधारित आहे. नागराजची जन्मकथा अशी की त्याला प्रोफेसर नागमणी याने दहशतवादी कारवायांसाठी तयार केलं होतं. एका देवीची सोन्याची मूर्ती चोरून आणणे हे नागराजचं पहिलं मिशन होतं. या मूर्तीची आणि मंदिराच्या रक्षणाची जबाबदारी एका आदिवासी जमातीकडे, सापांकडे आणि ३०० वर्ष वयाच्या साधू महाराजांकडे असते. या महाराजांचं नाव बाबा गोरखनाथ.

नागराज त्याच्या पहिल्या मिशनमध्ये यशस्वी होतो, पण गोरखनाथ आणि त्याच्या काळ्या मुंगुसशी झालेल्या युद्धात हरतो. गोरखनाथ यांना समजतं की नागमणीने नागराजच्या मेंदूत एक कॅप्सूल ठेवलं आहे आणि त्याद्वारे तो नागराजचं नियंत्रण करतोय. गोरखनाथ हे कॅप्सूल काढून टाकतात. नागराजवरचा नागमणीचा प्रभाव नष्ट होतो. यानंतर नागराज गोरखनाथ यांच्या आश्रयाला येतो आणि इथून पुढे तो दहशतवाद आणि गुन्हेगारी संपवण्याचं काम आपल्या शिरावर घेतो.

आजवरच्या जवळजवळ सगळ्या सुपरहिरोजचे दुहेरी आयुष्य दाखवण्यात आले आहेत. नागराज याला अपवाद कसा असणार? नागराज सामान्य माणसांचं आयुष्य जगताना एका टीव्ही चॅनेलसाठी काम करत असतो. तोच जगाला वाचवणारा नागराज आहे हे अर्थातच कोणाला माहित नसतं. हे वाचून शक्तिमानची आणि सुपरमॅनची नक्कीच आठवण येते. 

नागराजच्या निर्मात्यांनी या मूळकथेतून पुढे स्वतःची अशी दंतकथा तयार केली आहे. पुढे यात तक्षक आणि त्याची  बायको ललिता यांची कथा जोडण्यात आली. दंतकथा, विज्ञानकथा आणि अतिरंजित गोष्टी अशा वेगवेगळ्या प्रकारे नागराजची गोष्ट आजवर कॉमिक्समधून आली आहे.

आजवर दोन वेळा नागराजचं पात्र टीव्ही मालिकेच्या रूपाने आणण्याचा प्रयत्न झाला आहे. दोन्ही वेळाचा प्रयत्न फसला आहे. १९९० च्या शेवटी शेवटी पहिल्यांदा मालिकेवर काम सुरु झालं होतं. काही एपिसोड चित्रित करण्यात आले होते, पण स्पेशल इफेक्ट्स मनाजोगते न झाल्याने राज कॉमिक्सने हे एपिसोड कधीही टीव्हीवर प्रसारित केले नाहीत. युट्युबवर हे एपिसोड तुम्ही पाहू शकता.

तर,आता टीव्ही मालिका नाही तर बिग बजेट फिल्मचा विचार होतोय. राज कॉमिक्सचे मुख्य मनोज गुप्त करण जोहर सोबत या प्रोजेक्टवर बोलणी करत आहे. नागराजच्या भूमिकेसाठी रणवीरचा विचार होतोय.

मंडळी, तुम्हाला काय वाटतं हा सिनेमा चालेल का ? नागराजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? रणवीर या भूमिकेत शोभेल का?

सबस्क्राईब करा

* indicates required