computer

घोळ माशांनी घातला उत्तम घोळ, एका दिवसात मासेमाऱ्याला करोडपती बनवले!!

सर्वसामान्यांसाठी रातोरात करोडपती होणे म्हणजे फक्त केबीसी किंवा लॉटरी जिंकल्यावरच शक्य असतं! पण रोजच्या जीवनात काम करताना अचानक असं घबाड लागावं आणि पैशाचा पाऊस पडावा असं झालं तर? एक मासेमारासोबत असे नुकतेच घडले आहे. तुम्ही म्हणाल त्यांना समुद्रात दडलेला खजिना मिळाला असेल! बरोबर ओळखलंत, पण पैसे दागिन्यांचा खजिना नाही.. तर जिवंत खजिना मिळाला. घोळ माशांच्या रुपात! चला वाचूया नक्की घडलंय काय?

पालघर जिल्ह्यातील मुरबेमधील चंद्रकांत तारे असे या मासेमाराचे नाव आहे. २८ ऑगस्टला मासेमारी करताना त्याच्या जाळ्यात अंदाजे १५७ घोळ मासे आले. या माशांचा लिलाव झाला आणि त्यात त्याने तब्बल १.३३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सुमारे १२ किलो ते २५ किलो वजनाचे हे घोळ मासे सापडल्याने चंद्रकांत यांच्यासह सगळे मच्छिमार आनंदात आहेत. लिलावात मुंबईच्या १५-२०व्यापारांनी सर्वात जास्त बोली लावली होती.

या माशाचे शास्त्रीय नाव प्रोटोनिबिया डायकँथस असे आहे. घोळ मासा आणि त्याची पिल्ले कच्छच्या आखातापासून ते मुंबईपर्यंत असलेल्या समुद्रात सापडतात. घोळ माशाच्या पोटातल्या पिशवीचा वापर वैद्यकीय कामासाठी केला जातो. त्याला बोत म्हणतात. बोतला मोठी किंमत असून, नर जातीच्या बोतला तुलनेने अधिक दर असतो. उत्तर प्रदेश, बिहार येथून आलेल्या व्यापाऱ्यांकडून या बोतची खरेदी केली जाते. यातल्या एका घोळ माशाचे वजन अंदाजे १८ ते २५ किलोपर्यंत होते. यातील एका-एका माशाच्या पोटातून तब्बल ३०० ते ४०० ग्रॅम वजनाची पिशवी मिळू शकते.

या माशाला परदेशात मोठी किंमत मिळते. घोळ माशाची स्वच्छता खूप नाजूकपणे केली जाते. बोतच्या रक्तपेशी वेगळ्या करून एका बंद खोलीत बल्बच्या प्रकाशात वाळवल्या जातात. हाँगकाँग,सिंगापूर, मलेशिया, थायलंड आदी देशांत या बोतला मोठी किंमत मिळते. सौंदर्यप्रसाधने, औषधे, शस्त्रक्रियेदरम्यान टाके घालण्यासाठी लागणारा धागा यासाठी या बोतचा वापर करण्यात येतो .
 

मलेशिया, इंडोनोशिया, हाँगकाँगमध्ये या माशांची खास निर्यात होते. भारतात छोट्या घोळ माशालाही ८ ते १० हजारांपर्यंतची बोली लावली जाते. सिंगापूरमध्ये वाईन प्युरिफिकेशनमध्येदेखील याचा वापर होतो. घोळ माशातील डीएचए आणि ईपीए घटक लहान मुलांच्या आरोग्याला फायदेशीर आहे. घोळ माशात ओमेगा 3 घटक असतात. ते लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी फायदेशीर असतात. यामुळे स्मरणशक्ती चांगली होते. मुबलक प्रमाणात ओमेगा 3 घटक असल्याने मेंदूच्या कार्याला, नसांना त्यांचा फायदा होतो. घोळ माशातल्या काही घटकांमुळे दीर्घकाळ दृष्टी उत्तम राहण्यासाठी मदत होते. मसल्स टोन करण्यासाठी घोळ मासा अत्यंत फायदेशीर मानला जातो.

इतके सगळे फायदे असल्याने हे मासे चढ्या भावाने विकले जातात. लिलावात बोली लावून विकले जातात. पालघराच्या समुद्राने तारे यांचे नशीबचं पालटून टाकले आहे. पैसे मिळाल्यावर त्यांना घराचे कर्ज फेडण्याची इच्छा आहे. त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवो!
शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required