computer

११ मराठी सिनेमांचे अफलातून रिमेक्स.. तुम्ही किती पाहिलेयत?

सहसा हॉलीवूडचे सिनेमे कॉपी करून हिंदी आणि इतर भाषांत आणले जातात. पण तुम्हांला माहित आहे का, की आपल्या काही मराठी सिनेमांचे पण रिमेक्स झालेयत ते ?

आता बघा, इतिहास उगाळायचाच तर शांताबाई हुबळीकरांचा 'माणूस' आणि 'दहा वाजता' हे सिनेमे बनले तेव्हा लगेच तो सिनेमा हिंदीत पण बनवायची पद्धत होती. त्यांचे 'आदमी' आणि 'दस बजे' हे हिंदी अवतार त्यामुळे त्याच कलाकारवृंदांच्या संचाने बनवले होते. पण आता माणूस आणि दहा वाजता हे दोन्ही सिनेमे पाहिलेले लोक असण्याची शक्यता कमीच आहे. दहा वाजता काय प्रकरण आहे हे ही कुणाला माहित नाही. माणूस मात्र 'आता कशाला उद्याची बात' या गाण्यामुळं लोकांना माहित तरी आहे.

तर, आपण हा इतिहास बाजूला ठेवू आणि कोणकोणत्या मराठी सिनेमांचे रिमेक्स झाले हे पाहू...

१. घरकुल(१९७०) आणि मासूम(१९८३)

हे दोन्हीही सिनेमे उत्तम होते. घरकुलमध्ये मुंबईत राहणारं आधुनिक कुटुंब आणि त्यात येणारा नवीन आगंतुक छकुला...तर मासूममध्ये उत्तर भारतातलं सुरेख चौकोनी कुटुंब आणि त्यात येणारा हा पाचवा कोन. दोन्ही कुटुंबं  सुखवस्तू. अर्थात मराठीत मुलांना मोठं करून त्यांना एकमेकांच्या प्रेमात पाडून जरा गुंतागुंत वाढवली होती आणि मासूममध्ये आईच्या मनाची घालमेल अधिक दाखवली होती. तरीही दोन्ही सिनेमांत डावं-उजवं करण्यासारखं नाहीच !!

स्रोत
हो, घरकुलमध्ये जयश्री गडकर चक्क कार चालवताना दाखवल्या आहेत. तेव्हाच्या मराठी सिनेमांत कार चालवताना दाखवलेली एकमेव बाई असतील या !!

२. पाठलाग(१९६४) - मेरा साया(१९६६)

घरकुल-मासूम सारखी या दोन्ही सिनेमांतली गाणीही सुंदर होती.

स्रोत

पाठलाग १९६४ला आला तर मेरा साया १९६६ला. यात कथा आणि संकल्पना संपूर्ण चित्रपटभर अगदी सारखीच होती. 'तू जहाँ जहाँ चलेगा' आणि 'या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्याभवती' अशी गाणीही एकमेकांना पूरकच होती.

३. घायाळ(१९९३) - हलचल(२००४)

आता घायाळ म्हणजे कुठला सिनेमा हे तुम्हांला माहित नसेल आणि आत्तापर्यंत चार की पाच हलचल सिनेमे आले, त्यातला हा नक्की कुठला हा गोंधळ तर असेलच.

स्रोत

तर मंडळी, हा  ’I Am Sixteen’ म्हणणारा अजय-काजोलचा नाही, तर घरात बाई चालणार नाही म्हणणारा अक्षय खन्ना-परेश रावल मंडळींचा हलचल आहे. हा रिमेक बऱ्यापैकी प्रसिद्ध असला तरी मूळ सिनेमा काही कुणाला माहित नाही.

४. माहेरची साडी(१९९१) - साजन का घर(१९९४)

स्रोत
हा पण एकदम एकमेकांची कॉपी असलेला रिमेक आहे. माहेरची साडीबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. सुदैवानं हिंदीत अगदी जुही चावला-ऋषी कपूर जोडी असूनही काही या रिमेकची डाळ काही शिजली नाही आणि बरेचसे अश्रूंचे पाट वाचले.

५. तू तिथे मी(१९९८) - बागबान(२००३)

स्रोत

मोहन जोशी आणि सुहास परांजपे या जोडीपेक्षा लोकांना बच्चन-हेमामालिनी ही जोडी अधिक आवडली. पण या सिनेमात सहा महिन्यात करवा-चौथ, व्हॅलेंटाईन्स डे आणि होळी असे सगळे सण एकत्र आल्याने लोकांनी या सिनेमाची रेवडीपण उडवली.

 

६. अश्रूंची झाली फुले (१९६६)- आंसू जो बन गये फूल (१९६९) - मशाल (१९८४)

अश्रूंची झाली फुले हे वसंत कानेटकरांनी लिहिलेलं आणि आजच्या जमान्यात एकदम मेलोड्रामाटिक वाटेल असं नाटक. नाटक कदाचित १९६६च्या आधीही आलं असावं.  १९७०ला कानेटकरांना याच्या आंसू जो बन गये फूलसाठी सर्वोत्कृष्ट कथेचं फिल्मफेअर मिळालं होतं. या नाटकातली  यातली लाल्याची भूमिका खूप गाजली. चित्तरंजन कोल्हटकर आणि प्रभाकर पणशीकरांनी या नाटकाला सुरूवात केली. काशिनाथ घाणेकर, रमेश भाटकर आदि अभिनेत्यांनी या लाल्याच्या भूमिका पुढे केल्या.

स्रोत

आंसू जे बन गये फूल आपल्या पिढीला तितकासा आठवायचा नाही, पण अनिल कपूरचा मशाल बऱ्याच लोकांनी पाहिला असावा. 'जिंदगी आ रहा हूं मैं' किंवा 'मुझे तुम याद रखना और मुझे याद आना तुम' ही गाणी कित्येकांना चांगलीच आठवत असतील.

७. एक गाडी बाकी अनाडी(१९८८) - टारझन द वंडर कार(२००४)

स्रोत

हा गाडी-अनाडी आपल्यापैकी बहुतेकांनी लहानपणी नक्कीच पाहिला असेल. छोट्या प्रिया अरूणच्या भूमिकेत ऋजुता देशमुख गोड गोड दिसते. नंतर सोनीवरच्या 'जस्ट मोहोब्बत'मधल्या काही कलाकारांना घेऊन काढलेला वंडर कारही तेव्हाच्या छोट्यांना भारी आवडला होता.

८. माझा छकुला (१९९४) - मासूम (१९९६)

स्रोत

नुकतंच या मासूममधल्या हिरोचं अवघ्या ४४व्या वर्षी हृदयविकारानं निधन झालं. त्याचं-आयेशा जुल्कासोबतचं 'ये जो तेरे पायलोंकी छनछन है' तुम्हांला आठवत असेलच. तसंच या सिनेमातलं 'छोटा बच्चा जानके हमको आँख दिखा ना रे' ही चांगलंच आठवत असेल तुम्हांला. आपला छकुलाही काही कमी नव्हता म्हणा...

९. अशी ही बनवाबनवी(१९८९) - चित्रम् भलारे विचित्रम(१९९१)- बोंबाट हेंडती (१९९२)- आणऴगन (१९९५)

स्रोत

मंडळी, आपल्या या लाडक्या सिनेमाचा चक्क तेलुगू, कन्नड आणि तमिळ मध्ये सुद्धा रिमेक झालाय. आता बोला !!

१०. सैराट (२०१६)- मनसू मल्लिगे(२०१७)

स्रोत
आता खूप झालं सैराट कौतुक असं म्हटलं तरी याला विसरून कसं चालेल??

११. पोश्टर बॉईज(२०१४)-पोश्टर बॉईज(२०१७)

स्रोत

मराठीतला हा एक अफलातोन विनोदी सिनेमा आहे. यानंतर आलेला पोश्टर गर्लपण भारी होता. मराठी अनिकेत विश्वासराव, हृइषिकेश जोशी आणि दिलीप प्रभावळकरांनी धमाल केली होती. आता बघूया हिंदीत सनी पाजी, बॉबी पाजी आणि आपला श्रेयस तळपदे काय करतात ते. मराठीतला सिनेमा तळपदे कुटुंबाची निर्मिती होती आता या सिनेमाद्वारे श्रेयस दिग्दर्शनात पाऊल टाकतोय.

 

 

मग मंडळी, कशी वाटली ही यादी? तुम्हांलाही माहित आहेत का मराठी सिनेमांचे आणखी काही रिमेक्स??

सबस्क्राईब करा

* indicates required