अजब गजब गाव : या गावात गुगल, ओबामा, सोनिया गांधी, शाहरुख खान हे सगळे एकत्र राहतात !!

समजा ओबामा, अमिताभ बच्चन, अनिल कपूर, शाहरुख़ खान, सोनिया गाँधी, जितेन्द्र हे सगळे बॉलीवूड स्टार एकाच गावात राहत असतील आणि त्याच गावात गुगल, हाय कोर्ट, मिलिटरी, कंपाउंड, कॉफी, म्हैसूर पाक, अमेरिका, जपान हे सुद्धा गुण्यागोविंदाने राहत असतील तर ?...आता तुम्ही म्हणाल की ‘काय बोलताय राव, गटारीची अजून उतरली नाही का ?’....तर असं काहीही नसून आम्ही जे सांगत आहोत ते खरोखर भारतातल्या एका गावात आहे. वरील सर्व नावे ही एका गावातील माणसांची असून या गावात असली अतरंगी नावे ठेवण्याची परंपरा आहे मंडळी.

‘हक्की पक्की’ या समुदायाचे लोक कर्नाटकातील भाद्र्पूर गावात राहतात. या समुदायातील लोक आधी कर्नाटकातील जंगली भागात राहायचे पण वन विभागाच्या कायद्यांमुळे त्यांना स्थलांतर करून भाद्र्पूर इथे यावं लागलं. आता हे गाव प्रसिद्ध आहे तिथल्या माणसांच्या नावांमुळे. गुगल, गुल्कोज, हायकोर्ट अशी डोक्याला शॉट लावणारी मुलांची नावे इथे ठेवली जातात. मुलाच्या जन्माच्या वेळी जे आवडेल ते नाव त्याला दिले जाते, म्हणजे समजा एखादं मुल कंपाउंड जवळ जन्मलं तर त्याचं नाव ‘कंपाउंड’ ! म्हैसूर पाक’ नाव असलेल्या व्यक्तीने सांगितलं की त्याच्या आई वडिलांच्या मिठाईच्या प्रेमातून त्याचं नाव ‘म्हैसूर पाक’ पडलं. आता गुगल नाव कसं पडलं हे विचारू नका !

स्रोत

हक्की पक्की लोक स्वतःला महाराणा प्रतापचे वंशज मानतात त्यामुळे यांच्या सिंह हे आडनाव आढळते. पूर्वी हे लोक निसर्गावरून आपल्या मुलांना नावं ठेवत पण कालांतराने त्यांनी प्रसिद्ध गोष्टींची नावे मुलांना द्यायला सुरुवात केली. आतली खबर अशी आहे की लोक चोरी करतात आणि आपली ओळख लपवण्यासाठी हे असलं अजब गजब नाव ठेवतात.

काहीही असो पण इथली नावं मात्र हटके आहेत. राव इथे तर कॉंग्रेस गल्ली गल्लीतून पळताना दिसेल, हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट शेजारी शेजारी आहेत, म्हैसूर पाक बरोबर बँगलोर पाकही आहे. अमेरिका आणि जपान एवढ्या जवळ जवळ असतील हे गुगल वर शोधूनही सापडणार नाही. मिलिटरी फक्त नावालाच मिलिटरी आहे कारण आईचे रट्टे जेव्हा पडतात तेव्हा त्याचं नाव काहीच कामी येत नाही.

स्रोत

या गावाचं अजून एक वेगळेपण म्हणजे इथल्या माणसांचे पासपोर्ट, आधारकार्ड वर सुद्धा हेच नाव आहेत. १४ वेगवेगळ्या बोलीभाषेत हे लोक संवाद साधतात आणि चांगली गोष्ट म्हणजे इथे लग्नात मुलगा मुलीच्या घरच्यांना हुंडा देतो. हे मात्र एकदम बेष्ट आहे.

महाराष्ट्रात फासे पारधी समाजात देखील अशीच नावे ठेवली जातात. तुम्हाला नागराज मंजुळेची शॉर्ट फिल्म पिस्तुल्या आठवत असेल तर त्यातील मुख्य भूमिकेतील मुलाचं नाव पिस्तुल्या हे याच कारणावरून ठेवलेलं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required