श्वासनंतर संदीप सावंत घेऊन आले आहेत नदी वाहते : मुलाखत भाग २

मराठी चित्रपटांत एक वेगळी लाट आणणार्‍या संदीप सावंत यांचा नवा सिनेमा “नदी वाहते” या आठवड्यात रिलीज होतोय. त्यानिमित्तानं “नदी वाहते”चे निर्माते-दिग्दर्शक संदीप सावंत आणि निर्माती-प्रॉडक्शन डिझायनर नीरजा पटवर्धन या दोघांनी बोभाटा.कॉमला दिलीय एक्सक्लुझिव्ह मुलाखत. या मुलाखतीत हे दोघे निर्मिती प्रक्रिया, संशोधन, प्रत्यक्ष निर्मिती याबद्दल तर बोलतातच पण त्यांची या विषयाबद्दलची तळमळही जाणवते. 

वाचा तर मग, मेकिंग ऑफ “नदी वाहते”विषयी..

निसर्ग, सिनेमा आणि डबिंग-

“नदी वाहते”चं  डबिंग न करता सिंक साऊंड(Sync Sound) करायचं हे या टीमचं आधीच ठरलं होतं. या प्रकारात शूटिंग होत असतानाच यासाठी असलेले खास माईक्स वापरून तिथंच आजूबाजूचा आवाज टिपला जातो. डबिंगमध्ये बॅकग्राऊंडला येणारे आवाज पुन्हा घालावे लागतात. पण असे सगळेच आवाज टिपणं शक्य होत नाही आणि मग सिनेमा निसर्गावरचा असेल तर त्यात आवाजांचं इतकं वैविध्य असतं की त्याचं परिणामकारक डबिंग होऊही शकत नाही. या सिंक साऊंडची जबाबदारी सुहास राणे यांनी उचललीय.

“नदी...”मध्ये नदी, पक्षी, वारा हा सारा आसमंत महत्वाचा होता, याचा आवाज महत्वाचा होता. शूटिंगदरम्यान सुहास राणेने या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शूटिंग केलं. यात मग सायकलच्या घंटीचा आवाज असो, तांब्यातून पाणी भांड्यात ओतून घेणं असो की विविध पक्ष्यांचे आवाज, जंगलाचे आवाज असोत.. हे सगळे आवाज छान टिपले गेले आहेत. अगदी बकरीच्या गळ्यातली घंटासुद्धा इतक्या वेगवेगळ्या प्रकारे वाजते की अगदी बहार येते. सिनेमात असा आवाजाचा सलग एक पीस असा आहे की जणू काही कुणी गिटार वाजवल्यासारखंच वाटेल. सिनेमात तो तुकडा अशा ठिकाणी वाजवलाय की तो  गिटारसारखा आवाज, बकरीच्या गळ्यातली घंटा, पार्श्वसंगीत, या सगळ्याचा मिळून जे काही मिश्रण तयार झालंय, ते अफलातून आहे.

कॉश्चुम डिझाईन्समधून पात्रं उभी करणं-

नीरजांनी श्वासच्या कॉश्चुम्सवरतीही काम केलं होतं. यावेळीही त्यांनी ती धुरा सांभाळलीय. कॉश्चुम्स म्हणजे निव्वळ कपडेपट नसतो. तो पात्रांचे जडणघडण, स्वभाव, त्यांचा परिसर अशा बर्‍याच गोष्टींचा अभ्यास करून बनवावा लागतो. “नदी वाहते”ची पात्रं उभी करताना कॉश्चुम्सच्या बाबतीतही प्रचंड निरिक्षण, प्रचंड बारकावे यांचा नीरजांनी अभ्यास केला. त्यासाठी प्रत्येक पात्राची मागची-पुढची कहाणी समजून घेतली होती. त्या म्हणतात, “एखाद्या पात्राचे कपडे ठरवताना फक्त सिनेमाचा काळ, पात्राचं वय आणि कामाचं स्वरूप इतकाच विचार करून चालत नाही. तर ती कुठल्या कॉलेजात होती, काय शिकलीय, दहा वर्षांची असताना ही मुलगी काय करत होती.. हे सारे प्रश्नही अत्यंत महत्वाचे ठरतात. फक्त तिला शेतीत इंटरेस्ट आहे आणि तिचं नदीशी नातं आहे, असे ढोबळ मुद्दे घेतले तर त्यावर फक्त सपाट प्रतिमा बनते. त्यात त्रिमितीय जिवंतपण आणण्यासाठी ती फावल्या वेळेत काय करत असावी, ती तिच्या विचारांत गढली असताना ती कशाचा आणि कसा विचार करत असेल, हा सगळा विचार केल्यानंतर तिचे कपडे ठरवता येऊ शकतात.”

सिनेमात अनघा नावाचं एक पात्र आहे. तिचे कपडे अगदी साधे, सुटसुटीत, शेती करताना वापरता येतील असे दिसतात. तिच्या कपड्यांचे रंग किंवा त्यांची निवड हे तिच्या पात्राशी अगदी मिळतेजुळते आहेत. पण हे दिसताना पटकन लक्षात येणार नाही. म्हणजे रंगसंगती आणि स्वभाववैशिष्ट्य यांची थेट सांगड घातली नाहीय, पण बारकाव्यांमधून तिचं पात्र तिच्या कपड्यांसह उभं केलंय. खरंतर असं कोणतंही वेगळेपणा लक्षात येऊ नये असा कोणत्याही सिनेमाचा सहजभाव असायला हवा. अनघाचं एक  उदाहरण झालं, तसे इथं प्रत्येक पात्राच्या बाबतीतला सखोल अभ्यास करून मगच ती पात्रं उभी करण्यात आली आहेत.

शूटिंग.. शूटिंग..

निसर्ग, नदी, त्याभोवती फिरणारा सिनेमा म्हटल्यावर बरंचसं शूटिंग कोकण आणि गोव्यात होणार हे आपसूक होतं. कलाकार, तंत्रज्ञ आणि असे सगळे टीममधले लोक एकत्र करायचे म्हटले तरी खूप लोक होतात. त्यांना लोकेशन्सना घेऊन जाणं आणि शूटिंग करणं हे मोठं दगदगीचं काम होतं.

सारी टीम पहाटे पाच वाजताच एकत्र भेटत असे. बहुतेक लोकेशन्सना मोबाईल्सना रेंज नसेच. सावंतवाडी हे मध्यवर्ती ठिकाण, त्याच्या आसपास किंवा आकेरी या शूटिंगच्या हेडक्वार्टरच्या इथे सगळ्या १५-२० गाड्या एकत्र जमत. यात मग जनरेटर, लागणारी इतर इक्विपमेंट्स, केटरर, नाश्ता, एक काही म्हणू नका.. हा असा २० गाड्यांचा लवाजमा घेऊन ठरल्या लोकेशन्सना पोचायला दोनेक तास तरी सहज लागत. एकतर इतक्या सगळ्या गाड्या असल्यानं स्पीड कमी असे.. त्यात गाड्यांचा एक क्रम ठरवून दिलेला असे आणि मग त्या गाड्या त्याच ठरलेल्या क्रमाने प्रवास करत. मोबाईल्स असूनही रेंज नसल्यानं एकमेकांना ओव्हरटेक करण्याची आणि मग कोण कुठे हरवलं हे पाहण्याची चैन करताच येणं शक्य नव्हतं. मागचा आणि पुढचा आपल्या दृष्टीक्षेपात आहेत हे पाहण्याची सगळ्याच ड्रायव्हर्सना सूचना असे. असे एकदा का सात वाजता लोकेशन गाठलं की मग मात्र सूर्यास्तापर्यंत काम चाले. पॅक अपनंतर सगळेजण आपापल्या राहायच्या जागी येत पण निर्मिती विभागातल्या लोकांना पुन्हा आराम करता येईलच हे असं नसे. परत दुसऱ्या दिवशीच्या शूटसाठीची काही तयारी राहिली असेल तर ती त्यांना करावी लागत असे.. असं शूटिंगचं वेळापत्रक प्रचंड दगदगीचं होतं. अर्धावेळ गोव्यातलं जंगल तर अर्धावेळ कोकणातल्या अंतर्गत भागात, असं एकावेळेला १५ दिवसांचं शूट ही नदी वाहतेची टीम करत असे. याहून हे सलग शूटिंग करणं त्यांच्या शारीरीक क्षमतेच्या पलिकडचं होतं. नीरजा सांगतात, “मात्र या शूटिंगदरम्यान आम्ही जितके कष्ट घेतले, तितकीच मजाही आली.”

रिलीज अणि थिएटर्स-

सिनेमाचं शूटिंग आणि पोस्टप्रॉडक्शन संपून सिनेमा रिलीजच्या उंबरठ्यावर उभा आहे. “नदी वाहते” २२ तारखेला रिलीज होतोय. पण संदीप आणि नीरजा या दोघांनीही सिनेमाच्या फक्त थिएटरमधल्या रिलीजला महत्व दिलं नाहीय. त्यांनी यापूर्वीच सिनेमाचे अनेक छोटे छोटे प्रयोग तालुका आणि जिल्हा पातळीवर केलेयत. संदीप सांगता, “हे शोज करण्यामागचा हेतू हाच होता की हा सिनेमा फक्त पोस्टर्स आणि बॅनर्स लावून लोकांपर्यंत पोचणारा नाहीय.  पण आपण जितकं थेट लोकांपर्यंत पोचू, त्यांना सिनेर्मा दाखवू,  त्यांच्याशी बोलू, प्रतिक्रिया जाणून घेऊ, त्यावरती प्रश्नोत्तरे होतील, त्यामधून लोकांना सिनेमा अधिक कळेल आणि त्याची माऊथपब्लिसिटी होईल.” हा प्रयोग “नदी वाहते”ची टीम गेले एक्दोन महिन्यांपासून करतेय. यातून काहीजणांनी त्यांना सिनेमा पाहिल्यानंतर काय वाटलं हे फेसबुकवर लिहिलं,  अनेकांनी नदीविषयीचे त्यांचे अनुभव या फेसबुकवर शेअर केले आणि सिनेनिर्मिती-लोकांपर्यंत पोचणं ही प्रक्रिया चालूच राहिली.

तुमच्या गावी थिएटर नाही? फिकिर नॉट..

दुर्दैवानं अशीही काही ठिकाणं आहेत की तिथं सिनेमा रिलीज होणं किंवा थिएटरमध्ये तो लागणंच काही कारणानं शक्य नाहीय. महाराष्ट्रात जिथं थेटर आहेत, तिथं सिनेमा लागेलच. पण जिथं थिएटर्स नाहीयेत, जिथं इच्छा असूनही लोक त्याअभावी सिनेमा पाहू शकणार नाहीत.  त्यांच्यासाठी पुढचे सहा महिने ते एक वर्ष तिथं जाऊन तो सिनेमा दाखवण्याची तयारी “नदी वाहते” टीमने केलीय. मात्र त्यासाठी स्थानिक लोकांनी स्वत: पुढाकार घेऊन “सहज फिल्म” या त्यांच्या निर्मिती कंपनीला संपर्क साधण्याची गरज आहे.

संदीप आणि नीरजा म्हणतात, “शोज होऊ शकतात, आमच्याकडची जबाबदारी आम्ही घेऊ, परंतु त्या ठिकाणच्या संयोजकांनी त्यासाठी आम्हाला संपर्क करायला हवा. आम्ही आपणहून येऊ शकणार नाही.” हा प्रयोग श्वासच्या वेळेसही केला होता आणि त्यातून त्यांनी शक्य तितक्या ठिकाणी श्वास पोचवण्यासाठी प्रयत्न केले होते.

आता नदी हा विषय तर खूप महत्वाचा आहे, विषयाची व्याप्तीही खूप मोठी आहे. सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असा आणि महत्वाचा विषय आहे. त्यामुळं तो शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचायला हवा.  लोकांकडूनही  या टीमला चांगला प्रतिसाद मिळतोय. काहीजणांनी तर असंही विचारलंय की त्यांच्याकडे थिएटर नाही, परंतु लग्नाचा, ग्रंथलयाचा किंवा शाळेचा हॉल आहे, तिथं सिनेमा दाखवण्याची सोय होऊ शकते का? तुमच्याकडेही थिएटर नसेल, तर अशी काही पर्यायी व्यवस्था असेल तर [email protected] संपर्क साधून नक्की कळवा..

अर्थातच, सिनेमा पाहा, लोकांना-आपल्या मित्रांना दाखवा,  पहिल्या आठवड्यात ग्रुपने पाहा. अगदी  ग्रुप बुकिंगसाठी काही मदत हवी असेल तरी सहज फिल्म ही निर्मिती कंपनी तुम्हांला त्यासाठीही मदत करायला तयार आहे.

सखोल अभ्यास आणि इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ मेहनतीचं फळ म्हणून संदीप आणि नीरजा पुढचा सिनेमा घेऊन आले आहेत. त्यांना “नदी वाहते”साठी बोभाटा.कॉमच्या अनेकोत्तम शुभेच्छा!! चला तर मग, बुकिंग करूयात आणि नदीला भेटायला जाऊयात..

सबस्क्राईब करा

* indicates required