श्वासनंतर संदीप सावंत घेऊन आले आहेत नदी वाहते : मुलाखत भाग १

मराठी चित्रपटांत एक वेगळी लाट आणणार्‍या संदीप सावंत यांचा नवा सिनेमा “नदी वाहते” या आठवड्यात रिलीज होतोय. त्यानिमित्तानं “नदी वाहते”चे निर्माते-दिग्दर्शक संदीप सावंत आणि निर्माती-प्रॉडक्शन डिझायनर नीरजा पटवर्धन या दोघांनी बोभाटा.कॉमला दिलीय एक्सक्लुझिव्ह मुलाखत. या मुलाखतीत हे दोघे निर्मिती प्रक्रिया, संशोधन, प्रत्यक्ष निर्मिती याबद्दल तर बोलतातच पण त्यांची या विषयाबद्दलची तळमळही जाणवते. 

वाचा तर मग, मेकिंग ऑफ “नदी वाहते”विषयी..

 

संशोधन –

कोणत्याही गोष्टीला हात घालताना तिचा परिपूर्ण अभ्यास महत्वाचा असतो. इथं विषय तर प्रत्यक्ष नदी. तिला तर हवे तितके आणि हवे तसे फाटे फोडता येतात.

संदीप सावंतांचा नदी हा विषय तर ठरला होता. पण विषयाचा आवाका मोठा होता.  त्यासाठी त्यांनी पुष्कळसं वाचनही केलं होतं. पण नक्की काय करायचंय हे ठरवायला वेळ लागत होता. त्यामुळं संशोधन काळात ते अनेक लोकांना भेटले. या भेटींचा त्यांना विषयाची व्याप्ती आणि आपल्याला नक्की काय करायला हवंय याचीही स्पष्टता येण्यात मदत झाली. संदीप संशोधनाच्या सुरवातीच्या काळात औरंगाबादचे माधवराव चितळे यांना भेटले आणि त्यांच्याशी चर्चा केल्या. तसंच त्यांना हिवरे बाजारच्या पोपटराव पवारांचं दुष्काळातून हिरवंगार गांव बनवण्याच्या प्रयोगांबद्दल माहित होतं. त्यांचं कामही समजून घेतलं होतं. त्यांच्याशी  झालेल्या चर्चांमधूनही संदीपना पुढची योग्य दिशा मिळत गेली.

संदीप म्हणतात, “या भेटींनंतर आपल्याला नक्की काय हवंय, याची प्रोसेस वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू झाली. त्या अनुषंगानं  होणाऱ्या वाचनालाही विविध पैलू मिळत गेले. पर्यावरण, नदी, शेती या क्षेत्रांत काम केलेल्या असंख्य लोकांशी भेटीगाठी सुरू झाल्या. कुडाळमध्ये डॉ. प्रसाद आणि डॉ. हर्षदा देवधर, डॉ. बापू भोगटे, गोव्यामध्ये राजेंद्र केरकर यांचं या विषयाला समजून घेण्याच्या प्रक्रियेतलं योगदान अमूल्य आहे.  सिंधुदुर्गात डॉ. प्रसाद आणि डॉ. हर्षदा देवधर, डॉ. बापू भोगटे याच संदर्भात काम करतात. डॉ. हर्षदा  आणि डॉ. प्रसाद ग्रामविकासाच्या कामात सक्रीय आहेत. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान ही त्यांची संस्था आहे. बापूही या संस्थेशी निगडीत आहेत.  बापू शेती आणि शेतीशी संलग्न व्यवसाय करतात. प्रोग्रेसिव्ह शेतकरी आहेत. विषय समजून घेतलेली आणि महत्वाचं काम करत असलेली ही माणसं आहेत. गोव्यात राजेंद्र केरकरांनी पूर्णपणे स्वत:ला पर्यावरणाच्या कामात झोकून दिलंय. या सगळ्या गोष्टींमधून विषयाचा प्रवास आणि स्क्रीनप्लेची प्रोसेस सुरू झाली.”

निर्मिती, पटकथा, लोकेशन्स, कास्टिंग, नद्या, परिसरातली माणसं आणि तिथल्या परिस्थिती समजून घेणं-

संशोधनाच्या प्रक्रियेदरम्यानदेखील संदीप यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी होत होत्या. आपसूकच तिथल्या भागातल्या लोकांशी संपर्क आला. तिथं त्यांनी काही छोटीमोठी वर्कशॉप्सही घेतली होती. त्यामुळं त्या मातीतलेच काही कलाकार छोट्या-मोठ्या भूमिकांसाठी निवडता आले.  संदीप सावंतांच्याच शब्दांत सांगायचं तर, “लोकेशन्स, स्क्रीनप्ले आणि कास्टिंग हे सगळं एकत्रित घडत गेलं”.  या प्रोसेसमध्ये त्यांची स्थानिक लोकांची एक छानसं पाठबळ देणारी टीम तयार झाली.

नदी आणि संशोधन हे तर झालंच. पण सिनेमासाठी आर्थिक गणितंही होतीच. संदीप सावंतांनी प्रथमत: निर्माता शोधण्याचे प्रयत्न केले. पण मग एका क्षणी आपणच निर्मिती करायची हे त्यांनी ठरवलं. मग अर्थातच नवे प्रश्न, काही उत्तरं, त्यातून उद्भवणारे पुढचे प्रश्न हे व्याप चालू झाले. मात्र काही प्रमाणात मार्ग निघाले आणि या आर्थिक पाठबळातून शूटिंग आणि इतर काम मार्गी लागलं.

संदीप सांगतात, “जेव्हा पटकथेचा पहिला ड्राफ्ट तयार झाला, तेव्हा एक दिशा गवसल्यासारखं झालं आणि एक प्रकारचा आत्मविश्वास मिळाला. यात  १००% स्पष्टता नसली तरी आपण योग्य मार्गावर आहोत याचे संकेत मिळत होते. या अभ्यासातून पुन्हा अनेक प्रश्न पडायला लागले. मग पुन्हा आणखी भेटी!!  क्लॅरिटी मिळतेय असं वाटत असतानाच ती योग्य मुद्द्यांवर येण्यासाठी पुढचे प्रयत्न सुरू झाले. अर्थात ती या रिसर्च प्रोसेसची पुढची पायरी होती. हा प्रवास सुरू राहिला आणि त्यावेळेस “नदी वाहते” मध्ये नीरजा प्रॉडक्शन डिझायनर म्हणून सामील झाली.”

 

नीरजा आणि “नदी वाहते”ची निर्मिती प्रक्रिया-

नीरजा या प्रोजेक्टमध्ये सामील होईपर्यंत लोकेशन, रिसर्च ही सगळी मूलभूत तयारी झाली होती आणि इतर तांत्रिक लोकांशीही भेटी सुरू झाल्या होत्या. त्यांना तोपर्यंत “नदी वाहते”मध्ये काय चाललं आहे याची ढोबळ कल्पना अर्थात होतीच, पण एकदा यात सामील झाल्यानंतर नीरजांचा याबाबतीतला सखोल अभ्यास सुरू झाला. पहिल्यांदा तर विषयाची दिशा आणि अभ्यास समजून घेणं ही पहिली पायरी होती. ते समजल्याशिवाय चित्रपटाचं दृश्य समजणं शक्य नव्हतं.

आजच्या काळातला सिनेमा, नदी हा विषय, कोकणात घडतो, पर्यावरणाशी संबंधित आहे, वास्तववादी आहे इतक्या ढोबळ मुद्द्यांवर काम करणं तिच्या पद्धतीत बसत नाही. कारण सिनेमा म्हणजे फक्त तितकंच नसतं.. रंग , पोत या गोष्टी त्यांच्या कामाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या आहेत. नीरजा सांगतात, “म्हणजे फक्त वास्तववाद हा एकच मुद्दा जरी घेतला, तरी फक्त वास्तववादी म्हणून चालत नाही. तर कशा प्रकारचं वास्तव, ते कितपत दाखवायचंय, ती वास्तवता कशी दाखवायचीय हे सगळं विचारात घ्यावं लागतं. या सगळ्यासाठी पटकथेचा आत्मा समजून घेणं अधिक महत्वाचं ठरतं.” त्यामुळं संशोधनकाळात जी विविध माणसं संदीप सावंतांनी अनुभवली, त्या सगळ्यांचा त्यांनी पुन्हा अभ्यास करणं चालू केलं. त्यांची कामं समजून घेणं, त्यांचं जग समजून घेणं ही नीरजांच्या कामाच्या प्रक्रियेतली पहिली पायरी होती.

“नदी वाहते”च्या या टप्प्यापर्यंत सिनेमाची कथा आणि घटनांचा आराखडा तयार होता. यातून सिनेमा एक ते दीड वर्षांत घडतो हे निश्चित झालं होतं. म्हणजेच पुन्हा याचा एक वास्तववादी पैलू पाहायचा म्हटलं तर ऋतू, प्रत्येक ऋतूचा रंग, पोत, बदलतं जीवनमान, निसर्गातले बदल, या सगळ्यांचा विचार आणि अभ्यास करणं गरजेचं होतं. हे सगळं करण्यासाठी नीरजांना पुरेसा वेळ मिळाला हाही त्या एक महत्वाचा भाग मानतात..

निसर्ग सुंदर आहेच. प्रत्येक नदीचंसुद्धा एक वेगळंच सौंदर्य असतं. मग तो निसर्ग पाहतानाचं पहिलं भारावलेपण, त्याचं भव्य सौंदर्य पाहून दडपणं, हे सगळं बाजूला पडून त्या परिसराशी ओळख होणं, जे जे घडतंय, ते कुठल्या आसमंतात घडतंय याचा अंदाज येणं, ही पण चित्रपटनिर्मितीतली एक महत्वाची प्रक्रिया आहे. नीरजांनी ही प्रोसेस छान अनुभवली. यानंतर त्यांनी खरी लोकेशन्स पाहायला सुरूवात केली. त्या सांगतात, “खरंतर आम्ही पात्रांच्या अनुषंगानं लोकेशन्सकडे जास्त पाहिलं. अमुक एक गोष्ट घडते, ती अनघाच्या भागात घडते किंवा भाऊच्या आसमंतात घडते. मग अनघा, भाऊ.. ही सारी पात्रं नदीच्या संदर्भाने  कुठे आहेत? या सगळ्यांची एकापरीने आखणी करून घेतली होती. त्यांच्या घराचे भाग नदीच्या अनुषंगाने कुठे आहेत, हे ठरवलं होतं. त्यानंतर मग सगळे सीन्स विभागले गेले. ते कुणाच्या भागात घडतात हे ठरवलं गेलं,  मग खरे लोकेशन्स शोधले. पण त्याआधी प्रत्येक ऋतूचे रंग आणि पोत, त्यातून येणारे त्या ऋतूसोबतचे ऋणानुबंध, त्याचा लोकांच्या मनावर होणारा परिणाम या सगळ्यांचा अभ्यास केला होता”.

क्रमश:

सबस्क्राईब करा

* indicates required