computer

'सोणीये हिरिये तेरी याद' हे गाणं कळवळून गाणारा शैल ओस्वाल आहे तरी कोण ?

२००५ ते २०१० चा काळ म्हणजे ब्ल्यूटूथने गाण्यांची देवाणघेवाण करण्याचा काळ! या काळात सोशल मीडिया आजच्या इतका प्रभावी नव्हता आणि इंटरनेटही स्वस्त आणि सहज-सुलभतेने मिळत नव्हते. म्हणून जे काही डाऊनलोड करायचे ते तोलूनमापूनच असा तो काळ. पण याही काळात काही गाण्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. यातले एक गाणे म्हणजे 'सोनिये, हिरिये.. तेरी याद आंदी है.'

हे गाणे मार्केटमध्ये आले आणि चांगलेच गाजले. आजकाल जसे पोरं अरिजित सिंगची गाणे ऐकून 'सॅड' होतात, तोच सॅडनेस हे गाणे पोरांना देत होते. अनेकांना हे गाणे आणि तो काळ आठवत असेल. या गाण्याचा हिरो होता शैल. या शैलसोबत मोठा अन्याय झाला हीच भावना अनेकांच्या मनात होती. घरोघरचे प्रेमी या शैलमध्ये स्वतःला शोधत होते.

तर तुम्ही म्हणाल आज १० वर्षांनी हा शैल कसाकाय आठवला? तर तसे विशेष कारण नसले तरी हा शैल सध्या काय करतो याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर हा भाऊ तर पुरा पोचलेला निघाला. शैलेंद्र ओसवाल हे त्याचे संपूर्ण नाव. शैल हेच नाव त्याचे सगळीकडे प्रसिद्ध आहे. पठ्ठ्या अभय ओसवाल यांचा मुलगा आहे. या अभय ओसवालना कधीकाळी दुसरा अंबानी म्हटले जात होते.

शैल ओसवाल आज कोट्यवधी पैशांचा मालक असून त्याचे सिंगापूरमध्ये अनेक बिझनेस आहेत. त्याचा बिझनेस किती मोठा असेल याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की त्याचे नाव काळ्या पैशांसाठी बातम्यांमध्ये आलेल्या पॅंडोरा पेपर्समध्येही आले होते.

अभय ओसवाल यांना एकूण तीन मुले. त्यात दोन मुलगे आणि एक मुलगी. शैलची बहीण शालू प्रसिद्ध उद्योगपती आणि नेते नविन जिंदाल यांची पत्नी आहे. २०१६ साली अभय ओसवाल यांचा मृत्यू झाल्यावर या भावंडांमध्ये संपत्तीवरून मोठे भांडण झाले होते.

या शैल भावाकडे पैशांची कमतरता नाही किंवा त्याला गाणे गाऊन पैसे कमवण्याची गरज नाही असेही म्हणता येईल. पण शौक बडी चीज है म्हणतात. तसे त्याने आवड म्हणून गायलेले गाणे इतके हिट होईल असे त्यालाही वाटले नसेल. अर्थात "सोनिये, हिरिये.." काही त्याचे एकमेव गाणे नाही.

शैल ओसवालची गाणी नेहमी येतात. आता ती गाणी आल्याचं आणि गेल्याचं कुणाच्या लक्षात येत नाही हे सोडा. गेल्याच वर्षी त्याने अभिनेत्री समीक्षासोबत लग्न केले आहे. त्याचे शेवटचे आलेले गाणे म्हणजे इशारा ते याचवर्षी व्हॅलेंटाईन डेला रिलीज झाले. या गाण्याची डायरेक्टर त्याची बायको समिक्षा हीच आहे.

तर, "सोनिये, हिरिये..." फेम शैल ओसवाल अजूनही गाण्यांचे अल्बम काढतो, उद्योग करतो आणि अधूनमधून बातम्यांमध्ये दिसतो. पण जी हवा सोनिये हिरीयेने केली ती हवा मात्र आजवर झालेली नाही.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required